आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांच्या हस्ते हत्तीपाय रोगाच्या (Lymphatic Filariasis) प्रादुर्भावाचे अस्तित्व असल्याचे निश्चित केलेल्या 13 राज्यांमध्ये हत्तीपाय रोगाच्या निर्मूलनासाठी राष्ट्रीय सामूहिक औषधोपचार (MDA) मोहीमेचा प्रारंभ


येत्या 10 फेब्रुवारीपासून हत्तीपाय रोग या आजाराने ग्रस्त जिल्ह्यांमधील साडेसतरा कोटी लोकसंख्येला औषधे मोफत उपलब्ध करून दिली जाणार: जगत प्रकाश नड्डा

Posted On: 10 FEB 2025 2:57PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 10 फेब्रुवारी 2025 

 

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी आज येथे राज्यांचे आरोग्य मंत्री आणि हत्तीपाय रोगाच्या (Lymphatic Filariasis) प्रादुर्भावाचे अस्तित्व असल्याचे निश्चित केलेल्या 13 राज्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमात त्यांनी हत्तीपाय रोगाच्या निर्मूलनासाठी वर्षभराच्या कालावधीकरता राष्ट्रीय सामूहिक औषधोपचार (Nationwide Mass Drug Administration - MDA) मोहीमेचा प्रारंभ केला. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांमध्ये महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री प्रकाशराव आबिटकर हे देखील सहभागी झाले होते.

राष्ट्रीय सामूहिक औषधोपचार (MDA) मोहीम ही भारताच्या हत्तीपाय रोग निर्मूलन धोरणाचा एक मुख्य भाग आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाअंतर्गचे  राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण केंद्राच्या (National Center for Vector Borne Diseases Control - NCVBDC) नेतृत्वाअंतर्गत ही मोहीम राबवली जाणार आहे. या मोहीमेअंतर्गत घरोघरी जाऊन फायलेरिया  प्रतिबंधक औषधोपचार करण्यावर भर दिला जाणार आहे. या माध्यमातून या रोगाचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येक पात्र व्यक्ती निर्धारित औषधांचे सेवन करेल याची सुनिश्चिती केली जाणार आहे. Lymphatic Filariasis हा आजार सामान्यत: हत्तीपाय रोग म्हणून ओळखला जातो. हा एक परजीवी विषाणुंमुळे होणारा आजार असून, या विषाणुंनी संक्रमित डासांद्वारे या आजाराचा प्रसार होतो. या आजाराची लागण झाल्याने,  लिम्फोडेमा अर्थात अवयवांची सूज आणि हायड्रोसील  अर्थात अंडकोषांना सूज अशाप्रकारचे शारीरिक अपंगत्व येऊ शकते, त्याच बरोबरीने या आजाराने ग्रस्त व्यक्ती आणि कुटुंबांवर एकप्रकारचा दीर्घकाळ टिकणारा भारच पडत असतो.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांना या कार्यक्रमाला संबोधितही केले. हत्तीपाय रोगमुक्त भारतासाठी केंद्र सरकार वचनबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रत्येक नागरिकाचा सहभाग आणि सक्रिय सामाजिक सहभाग आवश्यक असल्याची बाबही त्यांनी यावेळी अधोरेखीत केली.

हत्तीपाय रोगाची लागण झालेल्या व्यक्तींच्या शारिरीक क्षमतांवर नकारात्मक परिणाम होतात, त्यामुळे त्यांचे जीवनमानही बिघडते असे त्यांनी सांगितले. शाश्वत विकासाची ध्येय उद्दिष्टे गाठण्याच्या 2030 या वर्षाच्या कालमर्यादेआधीच या रोगाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पंचसूत्री धोरण राबवायला हवे असे आवाहनही त्यांनी केले. त्यादृष्टीनेच येत्या 10 फेब्रुवारीपासून या आजाराने ग्रस्त जिल्ह्यांमधील साडेसतरा कोटी लोकसंख्येला ही औषधे मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत अशी माहिती त्यांनी दिली. या मोहीमेची व्याप्ती वाढवण्याची गरजही यावेळी त्यांनी ठळकपणे अधोरेखीत केली. त्यादृष्टीने या आजाराने ग्रस्त जिल्ह्यांनी स्थानिक पातळीवरील पात्र लोकसंख्येपैकी किमान 90% पेक्षा जास्त लोक फायलेरिया प्रतिबंधक औषधांचे प्रत्यक्ष सेवन करतील याची सुनिश्चिती करायला हवी अशी सूचनाही त्यांनी केली.

   

राष्ट्रीय सामूहिक औषधोपचार (MDA) मोहीमेविषयी:

राष्ट्रीय सामूहिक औषधोपचार (MDA) ही मोहीम आंध्र प्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगड, गुजरात, झारखंड, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओदिशा, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या 13 राज्यांमधील 111 जिल्ह्यांमध्ये राबवली जाणार आहे.

या राष्ट्रीय सामूहिक औषधोपचार (MDA) मोहीमेअंतर्गत हत्तीपाय रोगग्रस्त क्षेत्रातील सर्व पात्र व्यक्तींना, त्यांच्यामध्ये या आजाराची लक्षणे दिसत असतील किंवा नसतील तरी देखील, फायलेरिया प्रतिबंधक औषधे दिली जाणार आहेत. ही संपूर्ण प्रक्रिया संपूर्ण वैद्यकीय देखरेखीअंतर्गत पार पाडली जाणार आहे. 

या औषधोपचारपद्धतीत खाली नमूद बाबींचा अंतर्भाव असणार आहे:

  • दुहेरी औषध उपचार पद्धती (DA): डायइथायलकार्बामाझिन सायट्रेट (DEC) आणि अल्बेंडाझोल
  • तिहेरी औषध उपचार पद्धती (IDA): आयव्हरमेक्टिन, डायइथायलकार्बामाझिन सायट्रेट (DEC) आणि अल्बेंडाझोल

खाली नमूद गटांतील व्यक्तींना या औषधांचे सेवन करण्यास प्रतिबंध आहे:

  • 2 वर्षांखालील लहान मुले
  • गर्भवती महिला
  • गंभीर आजाराने ग्रस्त व्यक्ती

या कार्यक्रमाला केंद्रीय आरोग्य सचिव पुण्य सलिला श्रीवास्तव,, तसेच केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी आणि विविध राज्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव, प्रधान सचिव यांच्यासह राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे (NHM) व्यवस्थापकीय संचालक उपस्थित होते.

 

* * *

JPS/T.Pawar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2101288) Visitor Counter : 31