दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
बीएसएनएलच्या विनाव्यत्यय संचार सेवेने प्रयागराज येथील महाकुंभ 2025 मध्ये यात्रेकरूंना आणि सुरक्षा दलांना दिला दिलासा
Posted On:
02 FEB 2025 3:23PM by PIB Mumbai
आत्मनिर्भर भारत उपक्रमांतर्गत, भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) महाकुंभ 2025 मध्ये संचार निगडित पायाभूत सुविधा मजबूत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे, जेणेकरून विश्वसनीय दूरसंचार सेवा सुनिश्चित करता येईल. बीएसएनएलने कुंभमेळा परिसरात एक समर्पित ग्राहक सेवा केंद्र स्थापन केले आहे, जिथे यात्रेकरू आणि भक्तगण यांना थेट मदत, तक्रार निवारण आणि अखंड दूरसंचार सेवा मिळत आहेत.
कुंभ मेळ्या दरम्यान, देशभरातील विविध भागांतून आलेल्या यात्रेकरूंना त्यांच्या संबंधित मंडळामधून मोफत सिमकार्ड दिले जात आहे. जर एखाद्या यात्रेकरूचे सिमकार्ड हरवले किंवा खराब झाले, तर त्यांना त्यांच्या मूळ राज्यात परत जाण्याची आवश्यकता नाही. बीएसएनएलने संपूर्ण देशभरातील सर्व सर्कल्समधून सिमकार्ड्स कुंभमेळा परिसरात उपलब्ध करून दिली आहेत. ही सेवा पूर्णतः मोफत असून, त्यामुळे यात्रेकरूंना त्यांचे कुटुंब आणि आप्तस्वकीय यांच्याशी सहज संपर्क साधता येईल. बीएसएनएलने लाल रोड सेक्टर-2 येथे एका शिबिराच्या स्वरूपात कार्यालय स्थापन केले आहे, जिथून सर्व दूरसंचार सेवा व्यवस्थापित केल्या जात आहेत.
कुंभ परिसरात फायबर कनेक्शन, लीज्ड लाइन कनेक्शन आणि मोबाइल रिचार्जसाठी मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली आहे. सार्वजनिक सुविधांचा विचार करून, विविध राज्यांतील सिमकार्ड्स उपलब्ध करून देण्यात आली आहेत, याचा लाभ फक्त यात्रेकरूंनाच नाही, तर तिथे तैनात सुरक्षा दलांनाही होत आहे.
महाकुंभ 2025 दरम्यान अखंड दूरसंचार सेवा सुनिश्चित करण्यासाठी एकूण 90 बीटीएस टॉवर्स कुंभमेळा परिसरात सक्रिय करण्यात आले आहेत. या उपक्रमाद्वारे बीएसएनएल लाखो यात्रेकरू, प्रशासकीय अधिकारी, सुरक्षा दल आणि स्वयंसेवी संस्थांसाठी अखंड दूरसंचार सेवा उपलब्ध करून देत आहे, ज्यामुळे हा भव्य सोहळा सुरळीत पार पडण्यास मदत मिळत आहे.
***
S.Kane/G.Deoda/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2098937)
Visitor Counter : 31