रेल्वे मंत्रालय
रेल्वेने मौनी अमावस्येच्या दिवशी प्रयागराज येथून 364 गाड्या चालवल्या: रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव
Posted On:
30 JAN 2025 7:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 जानेवारी 2025
भारतीय रेल्वेने मौनी अमावस्येच्या दिवशी संगमात पवित्र स्नान करून घरी परतणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी प्रयागराज मधील विविध स्थानकांवरून 364 निर्गमन गाड्या चालवल्या, प्रयागराज महाकुंभ दरम्यान एकाच दिवसात चालवण्यात आलेल्या गाड्यांचा हा नवा विक्रम आहे. त्याचबरोबर या काळात 77 आगमन गाड्याही रेल्वेकडून चालवण्यात आल्या. निर्गमन गाड्यांमध्ये 142 नियमित आणि 222 महाकुंभ मेळा विशेष गाड्यांचा समावेश होता.
नवी दिल्लीत माध्यमांशी संवाद साधताना केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज सांगितले की, मौनी अमावस्येच्या दिवशी प्रयागराजहून 364 गाड्या चालवण्यात आल्या. रेल्वेच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथक रेल भवनातील वॉर रूममधून संपूर्ण परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे, राज्य सरकारबरोबर सातत्याने समन्वय राखत गाड्या चालवल्या जात आहेत. संगम स्नानासाठी आलेल्या सर्व भाविकांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. रेल्वेने प्रवाशांच्या गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी मोठे प्रतीक्षा कक्ष उभारले आहेत जिथे बसून ते त्यांच्या भागात जाणाऱ्या गाडीची प्रतीक्षा करू शकतात. त्यानंतर प्रशासनाने दिलेल्या सूचनेनुसार गाडी पकडण्यासाठी रेल्वे स्थानकाकडे रवाना व्हायचे आहे.
भाविक त्यांच्या घरी सुरक्षितरित्या आणि आरामात पोहचावेत यासाठी भारतीय रेल्वे आज 360 विशेष गाड्या चालवत आहे.
मेळ्याच्या संपूर्ण कालावधीत, रेल्वेने सुमारे 13,450 गाड्या चालवण्याची योजना आखली आहे, यामध्ये 10,028 नियमित गाड्या आणि 3400 हून अधिक विशेष गाड्यांचा समावेश आहे.
* * *
S.Kakade/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2097707)
Visitor Counter : 15