राष्ट्रपती कार्यालय
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला राष्ट्रीय मतदार दिन सोहळा
Posted On:
25 JAN 2025 2:46PM by PIB Mumbai
15 व्या राष्ट्रीय मतदार दिनानिमीत्त आज (25 जानेवारी 2025) नवी दिल्ली इथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम झाला. निवडणुका सुरळीत पार पाडण्यासाठी अनुकरणीय कामगिरी केलेल्या राज्य आणि जिल्हा अधिकाऱ्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते सर्वोत्कृष्ट निवडणूक पद्धती पुरस्कार प्रदान केले गेले. यावेळी देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी राष्ट्रपतींना 'इंडिया व्होट्स 2024 : अ सागा ऑफ डेमोक्रसी' या पुस्तकाची पहिली प्रतही भेट दिली.
यावेळी राष्ट्रपतींनी उपस्थितांना संबोधितही केले. आपली लोकशाही ही केवळ जगातील सर्वात जुनी लोकशाही नाही तर ती जगातील सर्वात मोठी, वैविध्यपूर्ण, तरुण, सर्वसमावेशक आणि संवेदनशील लोकशाहीही आहे ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे असे राष्ट्रपती म्हणाल्या. आधुनिक काळातल्या जगासाठी भारताची लोकशाही म्हणजे एक सर्वोत्तम उदाहरण असल्याचे त्या म्हणाल्या. जगभरातील अनेक देश आपल्या निवडणूक पद्धती आणि व्यवस्थापनातून शिकवण घेत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
आपल्या निवडणुकांमध्ये देशाच्या सर्वसमावेशक लोकशाहीची प्रभावी झलक दिसून येते असे त्यांनी सांगितले. निवडणुकीत महिलांचा वाढता सहभाग हे आपल्या समाजाच्या आणि देशाच्या सर्वांगीण विकासाचे महत्त्वाचे निदर्शक आहे असे त्या म्हणाल्या. 85 वर्षांवरील ज्येष्ठ मतदार, दिव्यांग मतदार आणि दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी मतदारांसाठी मतदान प्रक्रिया सुलभ व्हावी, याकरता निवडणूक आयोगाने विशेष प्रयत्न केले आहेत. अशा प्रयत्नांमधून निवडणूक आयोगाने सर्वसमावेशक आणि संवेदनशील निवडणूक व्यवस्थापनाचे उत्तम उदाहरण घालून दिले आहे अशा शब्दांत त्यांनी निवडणूक आयोगाच्या प्रयत्नांचे कौतुक केले.
मतदानाशी संबंधित आदर्श आणि जबाबदाऱ्या हे आपल्या लोकशाहीचे महत्वाचे पैलू आहेत. निवडणूक आयोगाची मतदार प्रतिज्ञा ही सर्व नागरिकांसाठी मार्गदर्शक ठरू शकते असे त्यांनी सांगितले. मतदारांनी लोकशाहीवर अढळ विश्वास ठेवण्यासोबतच, सर्व प्रकारच्या संकुचित विचारसरणी, भेदभाव आणि प्रलोभनाच्या पलीकडे जात आपला मतदानाचा हक्क बजावण्याचा ठाम निर्धारही करायला हवा असे आवाहन त्यांनी केले. सुजाण मतदारच आपल्या लोकशाहीला बळकटी देत असतात ही बाबही त्यांनी नमूद केली.
भारत निवडणूक आयोगाच्या स्थापना दिनाचे औचित्य साधून 2011 सालापासून दरवर्षी 25 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केला जातो आहे. मतदार कायमच केंद्रस्थानी असलेला घटक आहे ही बाब ठळकपणे अधोरेखित करणे, नागरिकांमध्ये निवडणूक प्रक्रिये विषयी जनजागृती करणे आणि लोकशाही प्रक्रियेत त्यांचा सक्रिय सहभाग देण्यासाठी प्रवृत्त करणे हे या कार्यक्रमाचे उद्दीष्ट आहे.
Please click here to see the President's Speech -
***
N.Chitale/T.Pawar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2096115)
Visitor Counter : 64