पंतप्रधान कार्यालय
भारतीय हवामान विभागाच्या 150 व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण.
Posted On:
14 JAN 2025 2:53PM by PIB Mumbai
केंद्रीय मंत्री मंडळातील माझे सोबती डॉ. जितेंद्र सिंह जी, जागतिक आरोग्य संघटनेच्या महासचिव प्रोफेसर सेलेस्ते साउलो जी, परदेशातून आलेले आपले विशेष अतिथी गण, पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉक्टर एम रविचंद्रन जी, भारतीय हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय मोहपात्रा जी, इतर महानुभाव, सर्व वैज्ञानिक आणि विविध विभाग तसेच संस्थांचे अधिकारी, बंधू आणि भगिनींनो.
आज आपण भारतीय हवामान विभाग, आयएमडी च्या स्थापनेचे 150 वे वर्ष साजरे करत आहोत. भारतीय हवामान विभागाची ही 150 वर्षे म्हणजे केवळ भारतीय हवामान विभागाचा प्रवास आहे, असे नाही. हा आपल्या देशातील आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा देखील एक गौरवशाली प्रवास आहे. भारतीय हवामान विभागाने 150 वर्षांमध्ये केवळ अनेक कोटी भारतीयांची सेवा केली नाही तर हा विभाग भारतीय वैज्ञानिकांच्या प्रवासाचा प्रतीक देखील बनला आहे. या उपलब्धी संदर्भात आज एक विशेष टपाल तिकीट आणि नाणे देखील जारी करण्यात आले आहे. 2047 मध्ये जेव्हा देश स्वातंत्र्यप्राप्तीची शंभर वर्षे साजरी करत असेल, तेव्हा भारतीय हवामान विभागाचे स्वरूप काय असेल? या संदर्भातील एक दृष्टिकोन दस्तऐवज देखील जारी करण्यात आला आहे. मी तुम्हा सर्वांना आणि सर्व देशवासीयांना या गौरवपूर्ण क्षणासाठी अनेक अनेक शुभेच्छा देत आहे. भारतीय हवामान विभागाच्या 150 वर्षांच्या या प्रवासासोबत तरुणांना जोडण्यासाठी राष्ट्रीय हवामानशास्त्रीय ओलंपियाड चे आयोजन देखील करण्यात आले होते. यामध्ये हजारो विद्यार्थ्यांनी भाग घेतला. यामुळे हवामानशास्त्रामध्ये युवकांची रुची आणखी वाढेल. मला आत्ताच यापैकी काही तरुण मित्रांबरोबर संवाद साधण्याची संधी मिळाली, आणि आज मला हे देखील सांगण्यात आले की देशामधल्या सर्व राज्यातील आपले तरुण येथे उपस्थित आहेत. या कार्यक्रमात रुचि दाखवण्यासाठी मी त्यांना विशेष रुपाने शुभेच्छा देतो. या सर्व सहभागी युवकांना आणि विजेत्या विद्यार्थ्यांना देखील खूप खूप शुभेच्छा.
मित्रांनो,
1875 मध्ये भारतीय हवामान विभागाची स्थापना मकर संक्रांतीच्याच आसपासच, 15 जानेवारीला झाली होती. भारतीय परंपरेत मकर संक्रांतीला किती महत्त्व आहे, हे आपण सर्वजण जाणतोच. आणि मी तर गुजरातचा रहिवासी आहे, त्यामुळे माझा सर्वात प्रिय सण मकर संक्रांत हाच होता, कारण आज गुजरातमधील सर्व लोक आपल्या घराच्या छतावर असतात आणि संपूर्ण दिवस ते पतंग उडवण्याचा आनंद लुटतात. मी जेव्हा कधी तेथे राहत होतो तेव्हा मला देखील पतंग उडवण्याचा मोठा शौक होता. पण आज मी इथे तुमच्या सोबत आहे.
मित्रांनो,
आज सूर्य धनु राशिमधून कॅप्रीकॉन म्हणजेच मकर राशि मध्ये प्रवेश करतो. सूर्य हळूहळू उत्तर दिशेला सरकू लागतो. आपल्या इथे भारतीय परंपरेत याला उत्तरायण असे संबोधले जाते. पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात आपण हळूहळू वाढणारी सूर्यप्रकाशाची तीव्रता अनुभवू लागतो. आपण शेतीच्या कामांची तयारी करू लागतो. आणि म्हणूनच हा दिवस भारतीय परंपरेत इतका महत्त्वपूर्ण मानण्यात आला आहे. उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत, पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत, वेगवेगळ्या सांस्कृतिक रंगात हा सण साजरा केला जातो. या सणानिमित्त मी सर्व देशवासीयांना मकर संक्रांतिसोबत जोडल्या गेलेल्या अनेक वेगवेगळ्या पर्वानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो.
मित्रांनो,
कोणत्याही देशातील वैज्ञानिक संस्थांची प्रगती त्या देशाची विज्ञानाप्रती जागरूकता दर्शवते. वैज्ञानिक संस्थांमध्ये संशोधन आणि नवोन्मेष या बाबी नव्या भारताच्या स्वभावाचा भाग आहेत. म्हणूनच, गेल्या दहा वर्षात भारतीय हवामान विभागाच्या पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञानाचा देखील अभूतपूर्व विस्तार झाला आहे. डॉपलर वेदर रडार, ऑटोमॅटिक वेदर स्टेशन्स, रनवे वेदर मॉनिटरिंग सिस्टीम, जिल्हानिहाय पर्जन्य निरीक्षण केंद्रे अशा अनेक आधुनिक पायाभूत सुविधांच्या संख्येत अनेक पटीने वाढ झाली आहे, या सुविधांचे आद्ययावतीकरण देखील करण्यात आले आहे. आणि, आत्ताच डॉ. जितेंद्र सिंह यांनी आपल्याला आकडेवारी देखील सांगितली की, पूर्वी आपण कोठे होतो आणि आज कुठे पोहोचलो आहोत. हवामानशास्त्राला भारताच्या अंतराळ तंत्रज्ञान आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा देखील पुरेपूर लाभ मिळत आहे. आज देशाजवळ अंटार्टिकामध्ये मैत्री आणि भारती नावाच्या दोन हवामान वेधशाळा आहेत. मागच्या वर्षी अर्क आणि अरुणिका सुपर संगणक सुरू करण्यात आले आहेत. यामुळे हवामान विभागाची विश्वसनीयता पूर्वीपेक्षा अनेक पटीने वाढली आहे. भविष्यात भारत हवामानाबदल विषयक प्रत्येक परिस्थितीसाठी तयार राहील, भारत एक हवामान स्मार्ट राष्ट्र बनेल यासाठी आम्ही ‘मिशन मौसम’ चा प्रारंभ केला आहे. मिशन मौसम हे शाश्वत भविष्य आणि भविष्यातील सज्जता यासंबंधात भारताच्या वचनबद्धतेचे देखील प्रतीक आहे.
मित्रांनो,
विज्ञानाची प्रासंगिकता केवळ नव्या उंचीवर पोहोचणे यात नाही. विज्ञान तेव्हाच प्रासंगिक बनते जेव्हा ते सामान्यातील सामान्य माणसाच्या जीवनाचा आणि त्या माणसाचे आयुष्य सुकर बनवण्याचा, त्यांच्या जीवन सुलभीकरणाचा माध्यम बनेल. भारताचा हवामान विभाग याच कसोटीवर खरा उतरतो आहे. हवामानाबाबतची माहिती अचूक असावी आणि ती प्रत्येक व्यक्तीपर्यंत देखील पोहोचावी यासाठी भारतात हवामान विभागाने विशेष अभियाने चालवली आहेत, ‘सर्वांसाठी पूर्व चेतावणी’ ही सुविधा आज देशातील 90% राहून अधिक लोकसंख्येपर्यंत पोहोचत आहे. कोणतीही व्यक्ती कोणत्याही वेळी मागच्या दहा दिवसांच्या आणि पुढच्या दहा दिवसांच्या हवामानाबद्दलची माहिती मिळवू शकते. हवामानाशी संबंधीत अंदाज थेट व्हाट्सअप द्वारे देखील पोहोचवला जात आहे. आम्ही मेघदूत मोबाईल ॲप सारख्या सेवांचा देखील प्रारंभ केला आहे, या ॲपवर देशातील सर्व प्रादेशिक भाषांमध्ये हवामानासंबंधी माहिती उपलब्ध असते. याचे फलित तुम्ही पाहू शकता, दहा वर्षांपूर्वीपर्यंत देशातील केवळ दहा टक्के शेतकरी आणि पशुपालक यांना हवामानासंबंधी सूचना उपलब्ध होत असत. आज ही संख्या 50 टक्क्यांहून अधिक झाली आहे. इतकेच नव्हे तर, वीज पडण्यासंबंधी सूचना देखील लोकांना मोबाईलवर मिळणे शक्य झाले आहे. पूर्वी देशातील लाखो मच्छीमार जेव्हा समुद्रात मासेमारीसाठी जात असत तेव्हा त्यांच्या कुटुंबीयांची चिंता नेहमीच वाढलेली असे. काहीतरी अभद्र घडेल असे त्यांना वाटत असे. मात्र आता भारतीय हवामान विभागाच्या सहयोगाने मच्छीमारांना देखील पूर्व चेतावणी मिळते. या रियल टाईम अद्यावत माहितीमुळे लोकांची सुरक्षा होत आहे आणि सोबतच शेती तसेच नील अर्थव्यवस्था यासारख्या क्षेत्रांना देखील बळ मिळत आहे.
मित्रांनो,
हवामान शास्त्र, कोणत्याही देशाच्या आपत्ती व्यवस्थापन क्षमतेचा सर्वात महत्त्वाचे सामर्थ्य स्थळ आहे. आज येथे आपत्ती व्यवस्थापन क्षेत्राशी संबंधित लोक मोठ्या प्रमाणावर उपस्थित आहेत. नैसर्गिक आपत्तींचा प्रभाव कमी करण्यासाठी आपल्याला हवामान शास्त्राची क्षमता महत्तम करण्याची गरज असते. भारताने नेहमीच याचे महत्त्व जाणले आहे. आज आपण त्या संकटांची दिशा देखील परावर्तित करण्यात सफल होत आहोत, ज्यांना पूर्वी नियती म्हणून सोडून दिले जात असे. 1998 मध्ये कच्छच्या भागातील कांडला बंदरात आलेल्या चक्रीवादळाने किती नुकसान केले होते हे तुम्हाला आठवत असेलच. त्यावेळी मोठ्या संख्येने जीवितहानी झाली होती. याच प्रकारे 1999 मध्ये ओदिशात सुपर सायक्लोन मुळे हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागला होता.
गेल्या काही वर्षांमध्ये देशात अनेक मोठी चक्रीवादळे आली , आपत्ती आली. परंतु, बहुतांश भागांमध्ये आपण जीवित हानी शून्य किंवा अगदी कमी राखण्यात यशस्वी झालो. या यशामध्ये हवामान विभागाची मोठी भूमिका आहे. विज्ञान आणि सज्जतेच्या या एकजुटीमुळे लाखो कोटी रुपयांचे आर्थिक नुकसानही देखील कमी होते. यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत एक प्रकारची लवचिकता निर्माण होते, गुंतवणूकदारांचा विश्वास देखील वाढतो आणि माझ्या देशात याचा मोठा फायदा होतो. काल मी सोनमर्गमध्ये होतो, आधी तो कार्यक्रम लवकर होणार होता, मात्र हवामान खात्याने दिलेल्या सर्व माहितीवरून समजले की ती वेळ माझ्यासाठी योग्य नाही , तेव्हा हवामान विभागाने मला सांगितले की साहेब, 13 तारीख ठीक आहे. त्यामुळे काल मी तिथे गेलो, तापमान उणे 6 अंश होते, पण जितका वेळ मी तिथे होतो, तो पूर्ण वेळ तिथे एकही ढग नव्हता, स्वच्छ सूर्यप्रकाश होता. हवामान खात्याकडून मिळालेल्या माहितीमुळे मी इतक्या सहजतेने कार्यक्रम आटोपून परतलो.
मित्रांनो,
विज्ञान क्षेत्रातील प्रगती आणि त्याच्या पूर्ण क्षमतेचा वापर हा कोणत्याही देशाच्या जागतिक प्रतिमेचा सर्वात मोठा आधार असतो. आज तुम्ही पहा, आपल्या हवामानशास्त्रीय प्रगतीमुळे आपली आपत्ती व्यवस्थापन क्षमता तयार झाली आहे. याचा लाभ संपूर्ण जगाला होत आहे. आज आपली आकस्मिक पूर मार्गदर्शन प्रणाली नेपाळ, भूतान, बांगलादेश आणि श्रीलंका या देशांनाही माहिती पुरवत आहे. आपल्या शेजारी देशात कधी कोणती आपत्ती उद्भवल्यास, मदत करण्यासाठी भारत सर्वप्रथम पोहचतो. यामुळे जगात भारताविषयीचा विश्वासही वाढला आहे. विश्वबंधू म्हणून भारताची प्रतिमा जगात अधिक मजबूत झाली आहे. यासाठी मी हवामानशास्त्र विभागाच्या शास्त्रज्ञांचे विशेष कौतुक करतो.
मित्रांनो,
आज भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या 150 वर्षांच्या निमित्ताने मी हवामानशास्त्र संबंधी भारताचा हजारो वर्षांचा अनुभव आणि त्याचे कौशल्य यावर देखील चर्चा करेन. विशेषतः मी हे स्पष्ट करेन की या संरचनात्मक व्यवस्थेला दीडशे वर्षे झाली आहेत ,मात्र त्याआधीही आपल्याकडे ज्ञान होते आणि त्याची परंपरा होती. विशेषत: आपले जे आंतरराष्ट्रीय पाहुणे, त्यांच्यासाठी याबद्दल जाणून घेणे खूप रंजक असेल. तुम्हाला माहित आहे की, मानवी उत्क्रांतीमध्ये ज्या घटकांवर आपण सर्वात जास्त प्रभाव पाहतो, त्यामध्ये हवामान देखील एक प्रमुख घटक आहे. जगाच्या प्रत्येक भूभागात, मानवाने हवामान आणि वातावरण समजून घेण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. या दिशेने भारत हा एक असा देश आहे जिथे हजारो वर्षांपूर्वी देखील हवामानशास्त्राच्या क्षेत्रात पद्धतशीर अभ्यास आणि संशोधन झाले होते. आपल्याकडे पारंपारिक ज्ञान लिपिबद्ध केले गेले , त्यावर संशोधन केले गेले. आपल्या देशात वेद, संहिता आणि सूर्य सिद्धांत यांसारख्या ज्योतिषशास्त्रीय ग्रंथांमध्ये हवामानशास्त्रावर खूप काम झाले होते. तामिळनाडूतील संगम साहित्य आणि उत्तरेकडील घाघ भड्डरीच्या लोकसाहित्यातही बरीच माहिती उपलब्ध आहे. आणि, हवामानशास्त्र ही केवळ एक स्वतंत्र शाखा नव्हती. यामध्ये खगोलशास्त्रीय गणना होती , हवामान अभ्यास होता , प्राण्यांचे वर्तन होते आणि सामाजिक अनुभव देखील होता. ग्रहांच्या स्थितीवर येथे किती गणितीय कार्य झाले हे संपूर्ण जगाला माहीत आहे. आपल्या ऋषीमुनींनी ग्रहांची स्थिती जाणून घेतली . आम्ही राशि, नक्षत्र आणि हवामानाशी संबंधित गणना केली. कृषी पाराशर, पाराशर रुची आणि बृहत संहिता या ग्रंथांमध्ये ढगांची निर्मिती आणि त्यांचे प्रकार यांचा सखोल अभ्यास झालेला दिसून येतो. कृषी पाराशरमध्ये म्हटले आहे-
अतिवातम् च निर्वातम् अति उष्णम् चाति शीतलम् अत्य-भ्रंच निर्भ्रंच षड विधम् मेघ लक्षणम्॥
म्हणजेच, वातावरणाचा अधिक किंवा कमी दाब, जास्त किंवा कमी तापमान यामुळे ढगांचे लक्षण आणि पाऊस प्रभावित होतो. तुम्ही कल्पना करू शकता, शेकडो -हजारो वर्षांपूर्वी, आधुनिक यंत्रसामग्री नसताना, तत्कालीन ऋषींनी , विद्वानांनी किती संशोधन केले असेल. काही वर्षांपूर्वी मी याच विषयाशी संबंधित एक पुस्तक प्री-मॉडर्न कच्छी नेव्हिगेशन टेक्निक्स अँड व्हॉयेजेस या पुस्तकाचे प्रकाशन केले होते. हे पुस्तक म्हणजे गुजरातच्या खलाशांच्या समुद्र आणि हवामानाशी संबंधित शेकडो वर्षांच्या ज्ञानाची लिखित प्रत आहे. आपल्या आदिवासी समाजाकडे देखील अशा ज्ञानाचा खूप समृद्ध वारसा आहे. यामागे निसर्गाचे आकलन आणि प्राण्यांच्या वर्तनाचा खूप बारकाईने केलेला अभ्यास आहे.
मला आठवते की अनेक वर्षांपूर्वी,50 वर्षांहून अधिक काळ झाला असेल, मी गीरच्या जंगलात थोडा वेळ घालवण्यासाठी गेलो होतो. तर तिकडे सरकारी लोक एका आदिवासी मुलाला दरमहा 30 रुपये देत होते , तेव्हा मी विचारले हे काय आहे? या मुलाला हे पैसे का दिले जात आहेत? त्यावर तो म्हणाला, या मुलामध्ये एक विशिष्ट प्रकारची क्षमता आहे, दूर जंगलात कुठेही आग लागली तर सर्वात आधी कुठेतरी आग लागल्याची जाणीव त्याला होते, त्याच्यात ती संवेदना होती. आणि तो त्वरित यंत्रणेला सांगायचा आणि म्हणून आम्ही त्याला 30 रुपये देत होतो. म्हणजे त्या आदिवासी मुलांमध्ये जी काही क्षमता होती , तो सांगायचा की साहेब, मला या दिशेने कुठून तरी वास येत आहे.
मित्रांनो,
आज वेळ आहे, आपण या दिशेने अधिक संशोधन करायला हवे. जे ज्ञान प्रमाणित आहे,त्याला आधुनिक विज्ञानाशी जोडण्याचे मार्ग शोधा.
मित्रांनो,
हवामान खात्याचे अंदाज जितके अचूक होत जातील तितकेच त्याच्या माहितीचे महत्व वाढत जाईल. आगामी काळात भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या डेटाची मागणी वाढेल. विविध क्षेत्रांमध्ये, उद्योगांमध्ये आणि सर्वसामान्यांच्या जीवनातही या डेटाची उपयुक्तता वाढेल. म्हणूनच , भविष्यातील गरजा लक्षात घेऊन आपल्याला काम करावे लागेल. भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तींची आव्हाने देखील आहेत, जिथे आपल्याला पूर्वसूचना प्रणाली विकसित करणे आवश्यक आहे. आपले शास्त्रज्ञ, संशोधन करणारे विद्वान आणि भारतीय हवामानशास्त्र विभाग सारख्या संस्थांनी यासाठी नवीन प्रगतीच्या दिशेने काम करावे अशी माझी इच्छा आहे. जगाच्या सेवेसोबतच भारत जगाच्या सुरक्षेतही महत्त्वाची भूमिका पार पाडेल. याच भावनेसह , मला विश्वास आहे की आगामी काळात भारतीय हवामानशास्त्र विभाग नवी उंची गाठेल. 150 वर्षांच्या या गौरवशाली प्रवासासाठी मी पुन्हा एकदा आयएमडी आणि हवामानशास्त्राशी संबंधित सर्वांचे अभिनंदन करतो. आणि या 150 वर्षात ज्या-ज्या लोकांनी या प्रगतीला गती दिली आहे , ते देखील तितकेच अभिनंदनास पात्र आहेत, जे येथे आहेत त्यांचे देखील मी अभिनंदन करतो आणि जे आता आपल्यामध्ये नाहीत त्यांचे पुण्यस्मरण करतो. पुन्हा एकदा मी तुम्हा सर्वांचे खूप-खूप आभार मानतो.
***
Jaydevi PS/S Kane/S. Mukhedkar/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2092990)
Visitor Counter : 26