सांस्कृतिक मंत्रालय
महाकुंभ 2025 मधील मकर संक्रांत
कालातीत उत्सव, जीवन व्यापून जाणारा क्षण
Posted On:
14 JAN 2025 9:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 14 जानेवारी 2025
मकर संक्रांतीची पहाट, हिवाळ्याची अखेर आणि उन्हाळ्याची सुरुवात समजल्या जाणाऱ्या या सणाच्या दिवशी, प्रयागराजमधील त्रिवेणी संगमाचा किनारा, दिव्य वैभवाची प्रचीती देत होता. महाकुंभ 2025 चे पहिले अमृत स्नान मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर सुरू झाले. गंगा, यमुना आणि सरस्वती या नद्यांच्या पवित्र संगमाने लाखो भाविक आणि संतांना ओढ लावली, आणि त्यांनी कडाक्याच्या थंडीत या ठिकाणी पवित्र स्नान केले. पहिल्या अमृतस्नानादरम्यान 3.5 कोटींहून अधिक भाविकांनी पवित्र संगमात डुबकी मारली, आणि पहिल्या दोन दिवसांत पवित्र संगमात स्नान करणाऱ्या भाविकांची संख्या 5 कोटींच्या पुढे गेली. आत्म्याची शुद्धी आणि आशीर्वादाचे प्रतीक असलेली ही श्रद्धामय कृती, भारतीय संस्कृती आणि परंपरेचे सार प्रतिबिंबित करते.
भाविकांनी अमृत स्नाना दरम्यान, पवित्रता आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली. मकर संक्रांत सूर्यदेवाला समर्पित असल्यामुळे भाविकांनी पुण्य आणि मोक्ष प्राप्तीचा आशीर्वाद घेण्यासाठी सूर्याला अर्घ्य दिले. वैज्ञानिकदृष्ट्या, हा सण सूर्याचे उत्तर गोलार्धात संक्रमण दर्शवितो, जो मोठा दिवस आणि लहान रात्र सुरु होण्याचे संकेत देतो.
पवित्र स्नानानंतर भाविकांनी तीळ, खिचडी आणि इतर पवित्र वस्तू अर्पण करून घाटावर पूजा केली. ते गंगा आरती मध्ये देखील सहभागी झाले. परंपरेनुसार त्यांनी दान कर्म केले, तीळ आणि खिचडी दान करून उत्सवाचे पावित्र्य जपले.
कॅलिफोर्नियाचे रहिवासी असलेले अमेरिकेचे नागरिक सुदर्शन यांनी कुंभमेळ्याप्रति श्रद्धा भाव व्यक्त केला. ते म्हणाले, 'मी सहा वर्षांपूर्वी अर्धकुंभात आलो होतो आणि मला त्या ठिकाणी खूप चांगला अनुभव मिळाला. म्हणूनच, या कुंभ मेळ्यासाठी मी पुन्हा आलो आहे, कारण आपल्याला इतरत्र कोठेही न आढळणाऱ्या ऊर्जेशी संपर्क साधण्याची ही एक खास संधी आहे, आणि म्हणूनच मी आदरांजली वाहण्यासाठी आणि माझा जीवन प्रवास सुरळीत राहावा, असा आशीर्वाद मागण्यासाठी येथे आलो आहे." कुंभमेळ्याच्या उत्सवात अध्यात्मिक जाणीव जागृती झाल्याच्या अशा अनेक कथा आहेत.
महाकुंभ हा काही सामान्य उत्सव नाही. त्रिवेणी संगमाच्या काठाला श्रद्धा आणि देवत्वाच्या जिवंत धाग्यात बांधणारी ही घटना आहे. ब्रह्म मुहूर्तापासून, जेव्हा सूर्यप्रकाशाच्या पहिल्या किरणांनी पाण्याला स्पर्श केला, तेव्हापासून रात्रीच्या गडद अंधारापर्यंत भक्तांचा एक अखंड ओघ वाहत असून प्रत्येकजण पवित्र स्नानाद्वारे शुद्धीकरण आणि आशीर्वादाच्या शोधात होता.सामूहिक भक्तीच्या उबदारपणापुढे जानेवारीतील थंडीचा कडाका क्षुल्लक वाटत होता.
लाखोंच्या या मेळाव्यात आखाड्यांचे स्नान विशेष लक्ष वेधून घेत होते. पंचायती आखाडा महानिर्वाणीच्या नागा साधूंनी शाही थाटात अमृत स्नान केले. भाले, त्रिशूळ आणि तलवारीनी सजलेल्या भव्य मिरवणुकीत गर्दीतून ते पुढे जात होते. घोडे आणि रथांवर आरूढ झालेल्या, त्यांच्या तपस्वी रूपांनी एक आध्यात्मिक उर्जा उत्सर्जित केली जिने प्रेक्षकांना मोहित केले. भजन मंडळांनी भजन गायले आणि भक्तांनी “हर हर महादेव” आणि “जय श्री राम” चा जयघोष केला, तेव्हा हवेत एक दिव्य लय साधली.
कुटुंबांनी या समृद्ध कलाकृतीत आणखी भर घातली. पवित्र संगमाची पहिली झलक दाखवण्यासाठी वडिलांनी मुलांना आपल्या खांद्यावर बसवले होते.तर काही ठिकाणी आपल्या वृद्ध मातापित्याना मुले गर्दीच्या घाट परिसरातून पुढे जाण्यासाठी मार्ग दाखवत होती जेणेकरून त्यांनाही पवित्र स्नान करता येईल. भारतीय संस्कृतीच्या चिरंतन मूल्यांचा हा जिवंत दाखला होता , आदर, कर्तव्य आणि एकतेचा मिलाफ होता.
भाविकांचे व्यापक वैविध्य
यात्रेकरूंच्या निरनिराळ्या विविधतेने-विविध भाषा बोलणारे, वैविध्यपूर्ण पारंपारिक पोशाख परिधान करणारे आणि अनोख्या सांस्कृतिक प्रथांचा अवलंब करणाऱ्या या सर्वांनी चित्तथरारक एकोप्याचे दर्शन घडवले. विविधतेतील ही एकता हा महाकुंभाच्या सर्वात गहन पैलूंपैकी एक आहे. येथेच भारताचा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारसा जिवंत होतो, सनातन परंपरेचे भगवे ध्वज तिरंगा ध्वजासोबत फडकतात जे देशाची एकता आणि अखंडतेचे प्रतीक आहे.
प्रशासनाच्या काटेकोर नियोजनाने महाकुंभ शांततेत आणि सुव्यवस्थितपणे पार पडेल हे सुनिश्चित केले. संगमाकडे जाणाऱ्या प्रत्येक रस्त्याला बॅरिकेड्स लावले होते आणि सुरक्षा राखण्यासाठी तसेच गर्दीचे प्रभावी व्यवस्थापन करण्यासाठी कसून तपासणी करण्यात येत होती. पोलीस आणि सुरक्षा दल जत्रा परिसरात गस्त घालत होते , त्यांची उपस्थिती महाकुंभ नगरच्या विस्तीर्ण परिसरात यात्रेकरूंसाठी एक आश्वासक दृश्य आहे. भक्तांना सहानुभूती आणि कार्यक्षमतेने मार्गदर्शन करणाऱ्या स्वयंसेवकांच्या प्रयत्नांनी मेळयात शांतता राहील याची काळजी घेतली.
बर्याच लोकांसाठी संगमाकडे जाणारी यात्रा सणाच्या खूप आधीच सुरू झाली होती. अढळ श्रद्धेने प्रेरित भाविक त्यांच्या डोक्यावर लहान - मोठे गाठोडे घेऊन मैलोनमैल चालत होते. काहींनी रात्रीच पवित्र स्नान सुरू केले.थंड पाण्याचा सामना करत तार्यांनी सजलेल्या आकाशाखाली त्यांनी हे स्नान केले. जसजसा सूर्य आकाशात चढत गेला, नागवासुकी मंदिर आणि संगम क्षेत्र भक्तीचे केंद्रबिंदू बनले. वयोवृद्ध भक्त, महिला, आणि तरुण एकत्र येऊन प्रार्थना करत पवित्र विधींचा भाग बनत होते.
महा कुंभ हा भारतीय संस्कृती आणि आध्यात्मिकतेचा आरसा आहे. मकर संक्रांतीला अमृत स्नान हे आयुष्यात आशीर्वाद आणि सकारात्मकता आमंत्रित करण्याचा मार्ग मानला जातो. संगमाच्या पवित्र पाण्यातल्या स्नानाने पापं धुतली जातात आणि मोक्ष प्राप्त होतो, असा भाविकांचा विश्वास आहे.
संध्याकाळी, संगमाचे काठ अजूनही उत्साहाने गजबजलेले होते. भाविकांनी दिवे प्रज्वलित करून ते वाहत्या पाण्यात सोडले ज्यांच्या लुकलुकणाऱ्या ज्योती आशेचे प्रतीक आणि प्रार्थना परमात्म्यापर्यंत वाहून नेत असल्याचा भाव पोहोचवत होत्या. गंगा, यमुना आणि सरस्वतीचा संगम संध्याकाळच्या प्रकाशात चमकत होता, जणू स्वर्ग पृथ्वीला स्पर्श करत असल्यासारखा भासत होता. प्रयागराजला गेलेल्या लोकांसाठी, 2025 च्या महा कुंभातील मकर संक्रांत ही केवळ पाहण्यासारखी घटना नव्हती, तर ती एक अनुभूती होती—जगण्यासाठी, अनुभवण्यासाठी, आणि मनात कोरून ठेवण्यासाठी—एक असा क्षण, जो पृथ्वी आणि दिव्यतेला जोडणारा पूल होता.
एका संताच्या शब्दात, “महा कुंभ केवळ एक पर्व नाही; तो आपल्या शाश्वताशी असलेल्या जोडणीची आठवण आहे. हे असे स्थान आहे जिथे मानवतेचे असंख्य धागे एकत्र येऊन दिव्यता आणि एकतेचे वस्त्र विणतात.”
संदर्भ
माहिती आणि जनसंपर्क विभाग (डीपीआयआर), उत्तर प्रदेश सरकार
https://x.com/myogiadityanath/status/1879136547015962892?t=_aa-G1RJWaVKe7tUdOhi6A&s=08
https://x.com/MahaKumbh_2025/status/1879047867521999200
https://x.com/MahaKumbh_2025
पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा
N.Chitale/R.Agashe/S.Kane/G.Deoda/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2092924)
Visitor Counter : 24