सांस्कृतिक मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

महाकुंभ : सीमांच्या मर्यादांपलीकडचा उत्सव

Posted On: 13 JAN 2025 9:56PM by PIB Mumbai

नवी दिल्ली , 13 जानेवारी 2025


पिनारचा महाकुंभाचा प्रवास एका स्वप्नाने सुरू झाला. भारताच्या समृद्ध सांस्कृतिक रचनेबद्दल उत्सुक असलेली ती एक तुर्की नागरिक, जिने महाकुंभाचे वर्णन करणाऱ्या श्रद्धा, परंपरा आणि मानवतेच्या गूढ संगमाच्या कथा फार पूर्वीपासून ऐकल्या होत्या. जानेवारी 2025 मध्ये, गंगा, यमुना आणि सरस्वती नद्या जिथे एकत्र येतात त्या पवित्र स्थानावर म्हणजे संगमाच्या वाळूवर उभे राहिल्यावर तिचे स्वप्न प्रत्यक्षात आले.

पारंपरिक भारतीय पोशाख परिधान करून, पिनारने गंगेत पवित्र डुबकी मारली, जी सनातन धर्मात सखोल महत्त्व असलेली शुद्ध करण्याची एक क्रिया आहे. कपाळावर उभा टिळा लावून पवित्र जलामध्ये   ती या क्षणाच्या दिव्यत्त्वात स्वतः पूर्णपणे बुडून गेली. "येथील वातावरण दिव्य आणि भव्य आहे," तिने सांगितले, तिचा आवाज कमालीच्या विस्मयाने भरलेला होता. पिनारसाठी, हा केवळ खंडांदरम्यानचा प्रवास नव्हता तर एक गहन आध्यात्मिक जागृती होती.

या कार्यक्रमाची ऊर्जा आणि त्याचे पावित्र्य याबद्दल तिचे भारावलेपण स्पष्ट दिसत होते. ध्यान आणि टिळा  लावण्यासारख्या विधींमध्ये सहभागी झाल्यामुळे तिला भारताच्या अनेक शतकांच्या प्राचीन परंपरांची सखोल अनुभूती झाली. "संगमाच्या वाळूवर चालणे आणि गंगेत पवित्र डुबकी मारणे हे अनुभव मी कधीही विसरणार नाही," असे तिने सनातन धर्माबद्दल तिला नव्याने झालेले आकलन आणि आदर प्रतिबिंबित करत सांगितले.

2025 च्या महाकुंभाने केवळ भारतातील सर्वात मोठा आध्यात्मिक मेळा म्हणून नव्हे तर लाखोंना आकर्षित करणारा जागतिक सांस्कृतिक कार्यक्रम म्हणून आपले स्थान भक्कम केले आहे. मानवतेचा अमूर्त वारसा म्हणून नामांकित केलेला, महाकुंभ सनातन संस्कृतीचे सार प्रदर्शित करतो आणि  जगभरात कुतूहल निर्माण केले आहे. यावर्षी जागतिक अभ्यागत आणि ऑनलाईन वापरकर्त्यांमध्ये सारख्याच प्रमाणात वाढलेल्या उत्सुकतेच्या ओघातून या कार्यक्रमाने जागतिक पातळीवर उमटवलेला ठसा स्पष्ट दिसून येत आहे. विविध खंडांमधून या भव्य कार्यक्रमाचे महत्त्व जाणून घेण्यासाठी आणि या आध्यात्मिक चैतन्याची अनुभूती घेण्यासाठी लोक सक्रीयपणे माहिती जाणून घेत आहेत.

या जागतिक उत्सुकतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने डिजिटल परिवर्तनाचा अंगिकार केला आहे. महाकुंभ 2025 म्हणजे डिजिटल महाकुंभ या स्वरुपात सादर केला आहे. https://kumbh.gov.in/, ही वेबसाईट या उपक्रमाचा केंद्रबिंदू आहे ज्यावर या महाकुंभाची सर्वसमावेशक माहिती आणि सर्व पैलू उपलब्ध आहेत. परंपरा आणि आध्यात्मिक महत्त्वापासून ते प्रवास मार्गदर्शक तत्त्वे आणि निवास पर्यायांपर्यंत, हे पोर्टल भाविक आणि पर्यटकांसाठी वन-स्टॉप डेस्टिनेशन म्हणजे एकाच ठिकाणी सर्व प्रकारची माहिती देणारे मार्गदर्शक स्थान आहे. प्रमुख आकर्षणे, प्रमुख स्नान उत्सव, काय करावे आणि काय करू नये आणि मीडिया गॅलरीज यांची अतिशय सविस्तर माहिती असल्याने वापरकर्त्यांना परिपूर्ण अनुभव मिळत आहे.

या डिजिटल उपक्रमाचा अतिशय उल्लेखनीय परिणाम एकट्या जानेवारीच्या पहिल्या आठवड्यातच पहायला मिळाला. ज्यावेळी 183 देशातील 33 लाख अभ्यागतांनी या वेबसाईटचा वापर केला. जगभरातील 6206 शहरांमधील अभ्यागतांनी या वेबसाईटला भेट दिली. भारताखालोखाल, अमेरिका, ब्रिटन, कॅनडा आणि जर्मनीमधील अभ्यागतांची संख्या सर्वाधिक होती. या मंचाची व्याप्ती भौगोलिक आणि सांस्कृतिक सीमा ओलांडून कार्यक्रमाचे सार्वत्रिक आकर्षण अधोरेखित करत आहे.

वेबसाइट लाँच झाल्यापासून वेबसाइटचे व्यवस्थापन करणाऱ्या तांत्रिक टीमने ट्रॅफिकमध्ये लक्षणीय वाढ नोंदवली आहे, महोत्सव जसजसा नजीक येऊन ठेपला तसतशी  दैनंदिन वापरकर्त्यांची संख्या लाखाच्या वर पोहोचली.  या साइटला भेट देणारे केवळ ती वरवर न पाहता, महाकुंभमेळ्याचा समृद्ध इतिहास आणि आध्यात्मिक महत्त्व जाणून घेण्यासाठी, त्यातील साइटवर दिलेली माहिती  शोधण्यात बराच वेळ घालवतात. डिजिटल महाकुंभ उपक्रम आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त असून त्यात प्राचीन परंपरांचा अनोखा संगम दिसून येतो. या साइटवर विश्वसनीय माहिती उपलब्ध असून भाविकांनी आणि पर्यटकांना कोणतीही समस्या न येता  महाकुंभच्या आध्यात्मिक पैलूंवर लक्ष केंद्रित करता येईल, याकडे उत्तर प्रदेश सरकारचा कटाक्ष आहे.

महाकुंभ 2025 जसजसा सुरु होत  आहे तसतसे या पर्वाच्या भव्यतेची अनुभूती घेत असलेल्या लोकांमध्ये विस्मय आणि आदराची भावना निर्माण होत आहे. पिनार सारख्या अभ्यागतांसाठी हा केवळ एक महोत्सव नसून त्यापलीकडे एक परिवर्तन आणणारा प्रवास आहे ज्यामुळे सांस्कृतिक बंध निर्माण होतात आणि अध्यात्मिकता वाढीला लागते. महाकुंभ मेळ्याचे उदात्त स्वरूप आपल्याला मानवतेला एकत्र आणण्यासाठी चिरस्थायी श्रद्धेत असलेल्या सामर्थ्याची जाणीव करून देते. आपल्या नद्या, वाळू आणि पवित्र विधींच्या माध्यमातून हा महोत्सव पावित्र्य, भक्ती आणि अर्थाचा शोध घेण्याच्या मानवी जिज्ञासेचा कालातीत संदेश देतो. आपली जागतिक व्याप्ती आणि डिजिटल नवोन्मेष यांच्या साथीने महाकुंभ केवळ आपल्या परंपरांचे जतन करत नाही तर या परस्परांशी जोडलेल्या जगात त्या पुढे नेत आहे.

या वर्षी, संगम स्थळी  लाखो लोक एकत्र येत असताना, एक आध्यात्मिक केंद्र म्हणून महाकुंभमेळ्याचे महत्व पुन्हा एकदा दृढ होते, जीवन आणि देवत्वाच्या या उत्सवात प्राचीन विधी परंपरा आणि आधुनिक आकांक्षा एकत्र येत आहेत.

संदर्भ :

माहिती आणि जनसंपर्क विभाग (DPIR), उत्तर प्रदेश सरकार

www.kumbh.gov.in

पीडीएफसाठी इथे क्लिक करा :

N.Chitale/S.Patil/B.Sontakke/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(Release ID: 2092658) Visitor Counter : 39