माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

जागतिक स्तरावर अव्वल राहात आपल्या वारशाचे सचोटीने जतन करणे हे एफटीआयआय’चे ब्रीदवाक्य असावे: केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव


सर्व आधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेल्या एफटीआयआय’च्या चित्रपटगृहाचे तसेच सभागृहाचे अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते झाले उद्घाटन

Posted On: 11 JAN 2025 8:10PM by PIB Mumbai

मुंबई, 11 जानेवारी 2025

 

केंद्रीय माहिती आणि प्रसारण, रेल्वे तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या सभागृहाचे उद्घाटन केले.  माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत सोसायटी म्हणून नोंदणीकृत असलेल्या फिल्म आणि टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या स्वायत्त संस्थेला वैष्णव यांनी पहिल्यांदाच भेट दिली. कार्यक्रमाच्या प्रारंभी वैष्णव यांनी फित कापली तसेच विद्यार्थ्यांसह दीपप्रज्वलनही केले.

उद्घाटनानंतर खुल्या मंचावर विद्यार्थी आणि प्राध्यापकांशी संवाद साधताना केंद्रीय मंत्र्यांनी एफटीआयआय’ला जागतिक स्तरावर आणखी पुढे नेण्याचे ध्येय असल्याचे स्पष्ट केले.  “भविष्यातील उत्कृष्टतेच्या प्रवासाला सुरुवात करण्यासाठी आपली परंपरा आणि वारसा एक भक्कम पाया प्रदान करतो,” असे वैष्णव यावेळी म्हणाले.  वैष्णव यांनी प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांना समाधानकारक उत्तरे दिली आणि प्रस्तावित अभिमत विद्यापीठ दर्जाच्या विविध पैलूंचे निराकरण केले.

  

अश्विनी वैष्णव यांनी देशातील चित्रपट शिक्षणाबाबतचा आपला दृष्टीकोन स्पष्ट केला. विद्यार्थ्यांच्या करिअरच्या संधी मजबूत करणे आणि त्यांना उद्योगांशी अधिकाधिक जोडणे यावर त्यांनी भर दिला. अल्पावधीतच जागतिक स्तरावर एक प्रमुख प्रतिभा प्रदाता बनलेल्या गती शक्ती विद्यापीठाचे उदाहरण वैष्णव यांनी दिले.

हे नवीन सभागृह हे केवळ एफटीआयआय’च्या अध्यापनशास्त्रासाठी एक अमूल्य सामर्थ्य नाही तर पुण्याच्या समृद्ध सांस्कृतिक क्षेत्रात भर घालणारी वास्तू आहे, असेही ते म्हणाले.

   

सिनेमा प्रोजेक्टर, रंगमंचावरील कलाविष्कार सादरीकरणासाठी PA सिस्टीम आणि अत्याधुनिक डॉल्बी ॲटमॉस सराउंड साऊंड सिस्टीम यासारख्या सर्व आधुनिक वैशिष्ट्यांनी सुसज्ज असलेल्या या सभागृहाची आसन क्षमता 586 इतकी आहे. प्रेक्षागृहाच्या सर्वात अनोख्या वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे त्याचा नवोन्मेषी, आडवा हलवता येणारा पडदा, ज्याची रुंदी 50 फूट तर उंची 20 फूट आहे.  हा अत्याधुनिक पडदा रिमोट कंट्रोल वापरून सहजतेने समायोजित करता येतो, ज्यामुळे सभागृहाचे रूपांतर चित्रपटगृहात अगदी सहजपणे केले जाऊ शकते.  सभागृह रचनेत अष्टपैलुत्व आणि लवचिकता या संबंधात नवीन मानके स्थापित करणारे हे अग्रगण्य वैशिष्ट्य आपल्या प्रकारचे पहिले मानले जाते. एफटीआयआय’ने या वैशिष्ट्यासाठी पेटंट मिळावे, म्हणून आधीच अर्ज दाखल केला आहे.

कार्यक्रमाचा एक भाग म्हणून केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी संस्थेच्या विविध सुविधांना भेट दिली आणि प्राध्यापकांशी संवादही साधला. मंत्र्यांनी क्रिएटिव्ह इकॉनॉमीबद्दल आपले मत व्यक्त केले. "एफटीआयआय मधील प्रतिभावंत आणि परिसंस्थेच्या सहाय्याने आपण या क्षेत्रात मोठे यश संपादन करु," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

 

* * *

PIB Mumbai | M.Pange/S.Mukhedkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2092148) Visitor Counter : 39