युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

विकसित भारत युवा नेतृत्व संवाद परिषद 2025 ला उत्साहपूर्ण संवाद, सर्जनशील स्पर्धा आणि प्रेरक सत्रांसह आरंभ

Posted On: 10 JAN 2025 6:53PM by PIB Mumbai

 

युवा व्यवहार विभागाचा उपक्रम असलेल्या विकसित भारत युवा नेतृत्व संवाद परिषदेला केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा आणि श्रम आणि रोजगार मंत्री, डॉ. मनसुख मांडविया यांच्या नेतृत्वाखाली, 10 जानेवारी 2025 रोजी, नवी दिल्लीत भारत मंडपम येथे सुरुवात झाली. राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या धर्तीवर युवा नेतृत्वाला अधिकाधिक संधी देण्याभोवती केंद्रित असलेला हा कार्यक्रम आज यशस्वीरित्या सुरू झाला. हा कार्यक्रम म्हणजे एका परिवर्तनशील व्यासपीठाची नांदी असून त्या माध्यमातून देशभरातील युवा नेत्यांना विविध विषयासंबंधी चर्चा करण्यासह सर्जनशील स्पर्धा आणि समृद्ध अनुभवांमध्ये सहभागी होण्यासाठी एकत्र आणले आहे तसेच विकसित भारताच्या दृष्टिकोनावर भर देण्यात आला आहे. अत्यंत कठोर निवड प्रक्रियेनंतर प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील सहभागींमधून निवडक प्रतिनिधींची निवड यासाठी करण्यात आली आहे.

विकसित भारत युवा नेतृत्व संवाद 2025 ला अत्यंत प्रेरणादायी सत्राने सुरुवात झाली ज्यामुळे या तीन दिवसीय कार्यक्रमासाठी एक सकारात्मक वातावरण तयार झाले. या सत्रात देशभरातील 3,000 हुन अधिक उत्साही युवा नेते सहभागी झाले होते, युवक व्यवहार सचिव मीता राजीवलोचन यांच्या प्रेरक आणि मार्गदर्शक भाषणाने सत्राचा आरंभ झाला. भविष्यातील भारताला आकार देण्यात युवा नेत्यांच्या भूमिकेबाबत त्यांनी मांडलेले विचार युवकांच्या मनावर ठसले आणि त्यांच्यात जबाबदारीची भावना आणि एक वेगळाच उत्साह निर्माण केला.

दिवसभर विविध कार्यक्रम आणि उपक्रम झाले. बीजभाषणानंतर सहभागींनी स्पर्धा, विकसित भारत या महत्वपूर्ण विषयावर प्रमुख दहा संकल्पनांवर आधारित सांस्कृतिक आणि संकल्पनेवर आधारित सादरीकरणात सहभाग घेतला.

 

विकसित भारत युवा नेतृत्व संवाद 2025 मध्ये दुपारच्या सत्रात सर्जनशील स्पर्धांची रेलचेल होती, ज्यामध्ये सहभागी युवकांना  विकसित भारताबद्दलचा त्यांचा दृष्टिकोन आणि त्यांची प्रतिभा दाखवण्याची संधी मिळाली. ‘विकसित भारत’ संकल्पनेवर आधारित चित्रकला, कथा लेखन, संगीत, नृत्य, घोषणा आणि कविता या स्पर्धांमुळे युवा नेत्यांना राष्ट्राच्या उज्वल भविष्यासाठी त्यांच्या कल्पना आणि आकांक्षा कल्पकतेने  मांडता आल्या.

 

विकसित भारत प्रदर्शनात राज्य आणि केंद्रीय मंत्रालयांच्या युवा-केंद्रित उपक्रमांचे प्रदर्शन मांडण्यात आले, यातून शिक्षण, कौशल्य विकास, उद्योजकता आणि संस्कृतीतील परस्परसंवादी अनुभव घेता आले याशिवाय  विविध राज्यांतील निवडक युवा प्रतिनिधींनी त्यांचे अभूतपूर्व नाविन्यपूर्ण प्रकल्प सादर केले.

भारताला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मार्गावर नेण्याची जबाबदारी असलेल्या  पुढच्या पिढीतील नेतृत्व, विचारवंत आणि नवोदितांना वैचारिक दृष्ट्या प्रगल्भ करण्याच्या दृष्टीने विकसित भारत युवा नेतृत संवाद 2025 हा एक मैलाचा दगड ठरला.

 

विकसित भारत युवा नेतृत्व संवाद  2025 मध्ये 11 जानेवारी 2025 रोजी होणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा

विकसित भारत युवा  नेतृत्व संवाद 2025 च्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया आणि केंद्रीय राज्यमंत्री   रक्षा खडसे यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.

***

N.Chitale/B.Sontakke/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2091977) Visitor Counter : 30