लोकसभा सचिवालय
भारतीय आणि स्कॉटीश संसदेने आपल्या कृत्रिम प्रज्ञा व डिजिटल तंत्रज्ञानाच्या वापराच्या अनुभवातून शिकणे आवश्यक: लोकसभा सभापती
Posted On:
09 JAN 2025 10:27PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 जानेवारी 2025
लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी भारतीय आणि स्कॉटीश संसदेने त्यांच्या कृत्रिम प्रज्ञा वापराच्या अनुभवातून शिकणे गरजेचे आहे या मुद्द्यावर भर दिला. ते म्हणाले की, कृत्रिम प्रज्ञा व डिजिटल तंत्रज्ञानाचा उपयोग करुन भारताच्या संसदेला उत्पादकता वाढविणे शक्य झाले आहे. स्कॉटलंडचे पंतप्रधान जॉन स्विनी यांच्यासोबतच्या बैठकीत बिर्ला यांनी हा मुद्दा मांडला. युनायटेड किंग्डमच्या आपल्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात आज बिर्ला यांनी स्कॉटलंडमध्ये स्विनी यांच्यासोबत लोकशाहीची मूल्ये आणि द्विपक्षीय सहकार्याबाबत चर्चा केली. हरित उर्जा, माहिती तंत्रज्ञान, कृत्रिम प्रज्ञा आणि अन्य क्षेत्रातील सहकार्याबाबत दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनण्यासंदर्भातल्या भारताच्या उद्दीष्टाचा बिर्ला यांनी पुनरुच्चार केला.
भारताच्या नवीन शैक्षणिक धोरणामुळे परदेशी विद्यापीठांना भारतात शिक्षण क्षेत्रात येण्याच्या नव्या संधी खुल्या झाल्या आहेत आणि स्कॉटलंडमधील विद्यापीठांना याचा लाभ घेता येईल असे बिर्ला यांनी नमूद केले. स्कॉटलंडच्या पंतप्रधानांनी आपण भारत भेटीसाठी उत्सुक असल्याचे सांगून दोन्ही देशांमधली संसदीय व्यवस्था गतीमान आहे असे मत व्यक्त केले.
लोकसभा सभापतींनी स्कॉटलंडच्या संसदेतील विविध पक्षांच्या नेत्यांसोबतही संवाद साधला. भारताची लोकशाही ही जगातल्या सशक्त लोकशाहींपैकी एक आहे अशा शब्दांत भारतीय लोकशाहीची प्रशंसा करुन बिर्ला म्हणाले की अर्थपूर्ण चर्चा, संवाद आणि विचारमंथन हे भारताच्या संसदीय कार्यपद्धतीचे खास पैलू आहेत.
तत्पूर्वी काल बिर्ला यांनी लंडनमधील भारतीय समुदायाशी संवाद साधला.
लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी लंडनमधील महात्मा गांधींच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करुन अभिवादन केले.
* * *
S.Kane/S.Joshi/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2091643)
Visitor Counter : 26