पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले ओदिशामध्ये आयोजित 18 व्या प्रवासी भारतीय दिन अधिवेशनाचे उद्घाटन
जगभरात वसलेल्या भारतीय समुदायासाठीच्या प्रवासी भारतीय एक्स्प्रेस या विशेष पर्यटक रेल्वे गाडीला पंतप्रधानांनी दाखवला हिरवा झेंडा
प्रवासी भारतीय दिवस हा भारत आणि जगभरात वसलेल्या भारतीय समुदायाच्या परस्पर नात्याला अधिक दृढ करणारी संस्था बनली आहे : पंतप्रधान
भविष्य हे युद्धात नाही तर ते बुद्धात आहे : पंतप्रधान
भारत ही केवळ लोकशाहीची जननी नाही ; तर लोकशाही हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे : पंतप्रधान
21 व्या शतकातील भारत हा अतुलनीय वेग आणि मोठ्या व्याप्तीसह प्रगती करत आहे : पंतप्रधान
आजचा भारत केवळ स्वतःचेच मुद्दे ठामपणे मांडत नाही तर तो ग्लोबल साउथ अंतर्गत येणाऱ्या देशांचा आवाजही बळकट करत आहे : पंतप्रधान
कुशल प्रतिभेची जगाची मागणी पूर्ण करण्याची क्षमता भारतात आहे : पंतप्रधान
कोणत्याही संकटाच्या काळात जगभरात वसलेले भारतीय कुठेही असले तरी त्यांना मदत करणे ही आमची जबाबदारी आहे असेच आम्ही मानतो : पंतप्रधान
Posted On:
09 JAN 2025 5:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 जानेवारी 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ओदिशातील भुवनेश्वर इथे आयोजित केलेल्या 18 व्या प्रवासी भारतीय दिन अधिवेशनाचे उद्घाटन केले. यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या अधिवेशनासाठी आलेल्या प्रतिनिधींचे तसेच जगभरात विविध देशांमध्ये वसलेल्या भारतीय समुदायाच्या (Indian diaspora) नागरिकांचे स्वागत केले. या अधिवेशनाचे उद्घाटन गीत या पुढे, विविध वसेलेल्या भारतीय समुदायाच्या, जगभरात होणाऱ्या विविध कार्यक्रमांमध्येही वाजवले जाईल, असा विश्वासही पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला. ग्रॅमी पुरस्कार विजेते कलाकार रिकी केज आणि त्यांच्या पथकाने या गाण्याच्या माध्यमातून जगभरात वसलेलेल्या भारतीय समुदाच्या संवेदना आणि भावना संयतरित्या टिपत त्याचे उत्कृष्ट सादरीकरण केल्याबद्दल अभिनंदनही केले.
त्रिनिदाद आणि टोबॅगो प्रजासत्ताकाच्या अध्यक्ष महामहिम क्रिस्टीन कार्ला कांगालू यांनी या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे या नात्याने, या कार्यक्रमासाठी आपला व्हिडिओ संदेश पाठवला होता. या संदेशातील सौहार्दपूर्ण आणि जिव्हाळ्याच्या शब्दांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे आभार मानले. या संदेशातून क्रिस्टीन कार्ला कांगालू यांनी भारताच्या प्रगतीबद्दल देखील आपले विचार मांडले आणि त्यांच्या बोलण्याचा या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वांवर प्रभाव पडला असल्याचे म्हणत पंतप्रधानांनी त्यांच्या संदेशाची प्रशंसा केली. आता भारतात विविधांगी सण - उत्सव आणि मेळाव्यांचा हंगाम आला असल्याचे त्यांनी सांगितले. येत्या दिवसांमध्येच उत्तर प्रदेशात प्रयागराज इथे महाकुंभ मेळ्याचा प्रारंभ होईल, त्यानंतर लगेच मकर संक्रांत, लोहडी, पोंगल आणि माघ बिहू हे सणही येणार आहेत अशी माहिती त्यांनी उपस्थितांना दिली. या सगळ्यामुळे आता भारतात सर्वत्रच उत्साह आणि आनंदाचे वातावरण असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
1915 साली आजच्याच दिवशी महात्मा गांधी परदेशातील आपल्या प्रदीर्घ वास्तव्यानंतर भारतात परतले होते, याची आठवण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी उपस्थितांना करून दिली. अशा अद्वितीय क्षणाला जगभरात वसलेला भारतीय समुदाय आज भारतात उपस्थित आहे, यामुळे इथल्या सणासुदीच्या उत्साहात अधिकची भर पडली असल्याची भावनाही पंतप्रधानांनी यावेळी बोलून दाखवली. प्रवासी भारतीय दिनाचे या वर्षीचे हे पर्व आणखी एका कारणासाठी विशेष आहे, कारण देशाचे माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दीला काही दिवस लोटल्यानंतर लगेचच या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे, आणि प्रवासी भारतीय दिनाला सुरुवात होण्यामागे अटलबिहारी वाजपेयी यांचे द्रष्टे विचार सर्वात महत्वाचे ठरले होते असे पंतप्रधान यावेळी म्हणाले. आज प्रवासी भारतीय दिवस म्हणजे जगभरात वसलेला भारतीय समुदाय आणि भारताचे परस्पर नाते अधिक दृढ करणारी संस्था बनली आहे, अशा शब्दांत पंतप्रधानांनी या दिनाचे महत्व अधोरेखित केले. या निमित्ताने आपण सर्वच जण एकत्र येऊन भारत, भारतीयत्व, आपली संस्कृती आणि आपल्या प्रगतीचा सोहळा साजरा करण्यासोबतच आपल्या मुळांशी जोडले जात आहोत ही बाबही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवर्जून नमूद केली.
आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सगळे जण ज्या ओदिशाच्या महान भूमीवर एकत्र आलो आहोत, ती ओदिशाची भूमी ही भारताच्या समृद्ध वारशाचे प्रतिबिंब आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओदिशाचा गौरव केला. ओदिशात प्रत्येक पावलागणिक आपण आपला वारसा पाहू शकतो असे ते म्हणाले. ओदिशातील उदयगिरी आणि खंडगिरी इथली ऐतिहासिक लेणी, तसेच कोणार्कचे भव्य सूर्यमंदिर अथवा ताम्रलिप्ती, माणिकपटणा आणि पालूर या प्राचीन बंदरांना भेट दिल्यानंतर प्रत्येकाला अभिमानाने भारून गेल्यासारखे वाटेल असे पंतप्रधान म्हणाले. शेकडो वर्षांपूर्वी ओदिशातील व्यापारी आणि व्यावसायिक प्रदीर्घ सागरी प्रवास करून बाली, सुमात्रा आणि जावा यांसारख्या ठिकाणी पोहोचले होते हा इतिहासही पंतप्रधानांनी उपस्थितांना सांगितला. या प्रवासाच्या स्मरणार्थ आजही ओदिशामध्ये बाली यात्रा सोहळा साजरा केला जातो अशी माहितीही त्यांनी दिली. ओदिशातील धौली हे महत्त्वाचे ऐतिहासिक स्थळ शांततेचे प्रतीक आहे असे त्यांनी उपस्थितांना सांगितले. ज्यावेळी एका बाजूला जगभरातील साम्राज्ये तलवारीच्या ताकदीवर स्वतःचा विस्तार करत होती, त्याचकाळात सम्राट अशोका यांनी मात्र या भूमीत आल्यानंतर शांततेचा मार्ग निवडला होता हा इतिहासही पंतप्रधानांनी उपस्थितांसमोर मांडला. याच वारशामुळे भारताला जगाला हा संदेश देण्याची प्रेरणा मिळाली आहे की, भविष्य हे युद्धात नाही तर बुद्धांमध्ये आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले. त्यामुळेच आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने ओदिशाच्या या भूमीत सगळ्यांचे स्वागत करणे आपल्यासाठी खूपच खास बाब असल्याची भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी बोलून दाखवली.
जगभरात वसेलेल्या भारतीय समुदायाला आपण कायमच भारताचे राजदूत असेच मानत आलो आहोत ही बाब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवर्जून नमूद केली. आपण जगात कुठेही जातो तेव्हा तिथे तिथे वसलेल्या भारतीयांना भेटून आणि त्यांच्याशी संवाद साधून आपल्याला प्रचंड आनंद होत असल्याचेही त्यांनी उपस्थितांना सांगितले. या सर्वांकडून मिळणारे प्रेम आणि आशीर्वाद अविस्मरणीय आहेत आणि हा अनुभव त्यांच्या आयुष्यात कायमचा कोरला गेला आहे अशी भावनाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी बोलून दाखवली.
जगभरात वसेलेल्या या भारतीय समुदायाने आपल्याला जागतिक पटलावर मान अभिमानाने उंच राखण्याची संधी मिळवून दिली असे सांगून, त्याबद्दल आपण या सगळ्यांचे मनापासून आभारी असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले. गेल्या दशकभराच्या काळात आपण जगभरातील असंख्य प्रमुख नेत्यांची भेट घेतली आहे, या सर्वच नेत्यांनी तिथे तिथे वसलेल्या भारतीय समुदायाने त्या त्या ठिकाणची सामाजिक मूल्ये जपण्यासाठी आणि तिथल्या तिथल्या समाजात दिलेल्या योगदानासाठी कायमच या समुदायाची प्रशंसा केली असल्याचा अनुभव पंतप्रधानांनी उपस्थितांसोबत सामायिक केला.
भारत ही केवळ लोकशाहीची जननीच नाही, तर लोकशाही हा भारतीय जीवनाचा अविभाज्य भाग आहे असे गौरोवोद्गारही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी काढले. भारतीय नागरिक अगदी नैसर्गिकरित्या विविधतेचा स्वीकार करतात आणि स्थानिक नियम आणि परंपरांचा आदर करत ते त्यांनी स्वतःला जोडून घेतलेल्या समाजात अगदी सहजपणे मिसळून जातात अशा शब्दांत पंतप्रधानांनी आपल्या नागरिकांच्या स्वभाव वैशिष्ट्यांची प्रशंसा केली. भारतीय समुदाय हा तो जिथे वसला आहे, त्या देशांची प्रामाणिकपणे सेवा करतात, त्या त्या देशांच्या प्रगतीत आणि समृद्धीतही स्वतः हातभार लावतात आणि त्याचवेळी भारताला देखील कायमच आपल्या हृदयात खोलवर जपून ठेवतात असे पंतप्रधान म्हणाले. हा संपूर्ण समूदाय आजवर भारताचे प्रत्येक आनंदाचे क्षण आणि यश मोठ्या उत्साहाने साजरे करत आला आहे ही बाबही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी अधोरेखित केली.
आज एकविसाव्या शतकातील भारताच्या विकासाचा अतुलनीय वेग आणि व्याप्तीविषयीचा उल्लेखही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संबोधनात केला. भारताने केवळ गेल्या 10 वर्षांच्या काळात देशभरातील 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढले आहे, आणि त्याचवेळी जागतिक पटलावर भारताच्या अर्थव्यवस्थेने 10 व्या स्थानावरून जगातील पाचव्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था बनण्याएवढी झेप घेतली आहे असे पंतप्रधान यावेळी म्हणाले. आता लवकरच भारत जगातली तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल, असा विश्वास देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी व्यक्त केला.
शिव-शक्ती बिंदूपर्यंत चांद्रयान मोहीम पोहोचणे आणि डिजिटल इंडियाच्या सामर्थ्याची जगाला ओळख यांसारख्या भारताच्या उल्लेखनीय कामगिरीवर भर देत मोदी म्हणाले की भारतातील प्रत्येक क्षेत्र नवीन शिखर गाठत आहे, नवीकरणीय ऊर्जा, विमान वाहतूक, इलेक्ट्रिक मोबिलिटी, मेट्रो नेटवर्क आणि बुलेट ट्रेन प्रकल्प या क्षेत्रात विक्रम मोडत आहे . भारत आता "मेड इन इंडिया" लढाऊ विमाने आणि वाहतूक विमाने तयार करत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. त्यांनी अशा भविष्याची कल्पना मांडली जिथे लोक प्रवासी भारतीय दिवसासाठी "मेड इन इंडिया" विमानांमधून भारतात प्रवास करतील.
यशस्वी कामगिरी आणि भविष्यातील संधी यामुळे भारताची वाढती जागतिक भूमिका अधोरेखित करत पंतप्रधान म्हणाले, “आजचा भारत केवळ स्वतःचे मत ठामपणे मांडत नाही तर ग्लोबल साउथचा आवाजही तितक्याच जोरकसपणे मांडत आहे”. आफ्रिकन युनियनला जी -20 चा स्थायी सदस्य बनवण्याच्या भारताच्या प्रस्तावाला एकमताने देण्यात आलेला पाठिंबा "मानवता प्रथम " प्रति भारताच्या वचनबद्धतेला दुजोरा देतो.
प्रमुख कंपन्यांच्या माध्यमातून जागतिक विकासात व्यावसायिक योगदान देणाऱ्या भारतीय प्रतिभावंतांना जागतिक स्तरावर मान्यता मिळत आहे यावर मोदी यांनी भर दिला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून प्रवासी भारतीय सन्मान प्राप्त करणाऱ्यांना शुभेच्छा देताना त्यांनी अधोरेखित केले की जागतिक स्तरावरील कौशल्याच्या गरजा पूर्ण करत भारत पुढील अनेक दशकांपर्यंत जगातील सर्वात तरुण आणि सर्वात कुशल लोकसंख्या असलेला देश म्हणून कायम राहील. अनेक देश आता कुशल भारतीय तरुणांचे स्वागत करतात आणि परदेशात जाणारे भारतीय स्किलिंग , री-स्किलिंग आणि अप-स्किलिंग च्या सातत्यपूर्ण प्रयत्नांद्वारे उच्च कुशल असतील याची काळजी घेण्यासाठी भारत सरकार वचनबद्ध आहे.
भारतीय समुदायासाठी सोयी आणि सुविधांच्या महत्त्वावर भर देत आणि त्यांची सुरक्षा आणि कल्याण याला सर्वोच्च प्राधान्य असल्याचे सांगून पंतप्रधानांनी नमूद केले की "संकटाच्या परिस्थितीत भारतीय समुदायाला मदत करणे ही भारताची जबाबदारी आहे जी भारताच्या परराष्ट्र धोरणाचे मुख्य तत्व प्रतिबिंबित करते." ते पुढे म्हणाले की, मागील दशकात जगभरातील भारतीय दूतावास आणि कार्यालये संवेदनशील आणि सक्रिय झाली आहेत.
पूर्वी लोकांना लांबचा प्रवास करावा लागायचा आणि वाणिज्य दूतावासाच्या सुविधांपर्यंत पोहचण्यासाठी अनेक दिवस वाट पाहावी लागायची याची आठवण करून देत मोदी म्हणाले की, या समस्यांचे निराकरण केले जात आहे आणि गेल्या दोन वर्षांत चौदा नवीन दूतावास आणि वाणिज्य दूतावास उघडण्यात आले आहेत. मॉरिशसमधील 7व्या पिढीतील आणि सुरीनाम, मार्टीनिक आणि ग्वाडेलूपमधील 6व्या पिढीतील भारतीय वंशाच्या व्यक्तींना (पीआयओ) सामावून घेण्यासाठी ओसीआय कार्डची व्याप्ती वाढवली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
भारताच्या वारशाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून विविध देशांमध्ये त्यांनी मिळवलेल्या यशाचा उल्लेख करत , पंतप्रधानांनी जगभरातील भारतीय समुदायाचा महत्त्वपूर्ण इतिहास अधोरेखित केला. आपल्या सामायिक वारसा आणि वारशाचा भाग म्हणून अशा रंजक आणि प्रेरणादायी कथा सामायिक केल्या पाहिजेत, प्रदर्शित केल्या पाहिजेत आणि जतन केल्या पाहिजेत असे आवाहन त्यांनी केले. गुजरातमधील अनेक कुटुंबे ओमानमध्ये अनेक शतकांपूर्वी स्थायिक झाल्याचा "मन की बात" मध्ये अलीकडे उल्लेख केल्याचे नमूद करत मोदी यांनी त्यांच्या 250 वर्षांचा प्रवास प्रेरणादायी असल्याचे सांगत कौतुक केले आणि या समुदायासंबंधी हजारो दस्तावेजांचे डिजिटायझेशन करण्यासाठी एक प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते अशी माहिती दिली. ते पुढे म्हणाले की या व्यतिरिक्त, एक "ओरल हिस्ट्री प्रोजेक्ट" आयोजित करण्यात आला होता , ज्यात समाजातील ज्येष्ठ सदस्यांनी त्यांचे अनुभव कथन केले. यातील अनेक कुटुंब आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत हे पाहून त्यांना आनंद झाला.
विविध देशांमधील समुदायासोबत असेच प्रयत्न करण्याची गरज असल्याचे सांगून मोदींनी "गिरमिटिया" बंधू-भगिनींचे उदाहरण दिले. त्यांची भारतातील मूळ गावे आणि शहरे कोणती आणि ते कोणत्या ठिकाणी स्थायिक झाले याची माहिती मिळवण्यासाठी डेटाबेस तयार करण्याचे आवाहन त्यांनी केले. त्यांच्या जीवनाचे दस्तऐवजीकरण, त्यांनी आव्हानांना संधींमध्ये कसे रूपांतरित केले, हे चित्रपट आणि माहितीपटांद्वारे दाखवले जाऊ शकते असे त्यांनी नमूद केले. . पंतप्रधानांनी गिरमिटिया वारशाचा अभ्यास आणि संशोधन करण्याचे महत्त्व अधोरेखित केले आणि यासाठी विद्यापीठ अध्यासन स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडला. . नियमितपणे जागतिक गिरमिटिया परिषदा आयोजित करण्याचे आवाहन त्यांनी केले आणि या शक्यतांचा शोध घेण्याचे आणि या उपक्रमांना पुढे नेण्यासाठी काम करण्याचे निर्देश आपल्या टीमला दिले.
“आधुनिक भारत विकास आणि वारसा हा मंत्र घेऊन प्रगती करत आहे”, असे पंतप्रधान म्हणाले. जी -20 बैठकीदरम्यान, भारताच्या विविधतेचा प्रत्यक्ष अनुभव जगाला देण्यासाठी देशभरात विविध सत्रे आयोजित करण्यात आली होती असे त्यांनी नमूद केले. काशी-तमिळ संगम, काशी तेलुगू संगम, आणि सौराष्ट्र तमिळ संगम यांसारख्या कार्यक्रमांचा त्यांनी अभिमानपूर्वक उल्लेख केला. पंतप्रधानांनी आगामी संत तिरुवल्लुवर दिनाचा उल्लेख केला आणि त्यांच्या शिकवणींचा प्रसार करण्यासाठी तिरुवल्लुवर संस्कृती केंद्रे स्थापन करण्याची घोषणा केली. सिंगापूरमध्ये पहिले केंद्र सुरू झाले असून अमेरिकेतील ह्यूस्टन विद्यापीठात तिरुवल्लुवर अध्यासन स्थापन करण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले. तमिळ भाषा आणि वारसा तसेच भारताचा वारसा जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचवणे हा या प्रयत्नांचा उद्देश असल्याचे मोदी यांनी सांगितले.
भारतातील वारसा स्थळांना जोडण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजना अधोरेखित करत पंतप्रधान म्हणाले की रामायण एक्स्प्रेस सारख्या विशेष रेल्वेगाड्यांमुळे भगवान राम आणि सीता माता यांच्याशी संबंधित स्थळांपर्यंत पोहचता येते. ते पुढे म्हणाले की भारत गौरव गाड्या देखील देशभरातील महत्त्वाच्या वारसा स्थळांनाही जोडत आहेत तर वंदे भारत सारख्या मध्यम वेगवान गाड्या भारतातील प्रमुख वारसा केंद्रांना जोडतात. पंतप्रधानांनी विशेष प्रवासी भारतीय एक्सप्रेस ट्रेनच्या शुभारंभाचा उल्लेख केला, जी सुमारे 150 लोकांना पर्यटन आणि श्रद्धेशी संबंधित सतरा स्थळांची भेट घडवून देईल. त्यांनी प्रत्येकाला ओदिशातील अनेक महत्त्वाच्या स्थळांना भेट देण्यासाठी प्रोत्साहित केले आणि प्रयागराजमधील आगामी महाकुंभाचा विशेष उल्लेख करत लोकांना या दुर्मिळ संधीचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
1947 मध्ये भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात भारतीय समुदायाच्या महत्त्वपूर्ण भूमिकेची पंतप्रधानांनी दखल घेतली आणि नमूद केले की हा समुदाय आजही भारताच्या विकासात योगदान देत आहे, ज्यामुळे भारत हा जगातील सर्वोच्च रेमिटन्स (परदेशातून पैसे पाठवणे ) प्राप्तकर्ता देश बनला आहे. 2047 पर्यंत भारताला एक विकसित राष्ट्र बनवण्याचे ध्येय आहे यावर त्यांनी भर दिला. मोदी यांनी भारतीय समुदायाच्या आर्थिक सेवा आणि गुंतवणूकीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी गिफ्ट सिटी परिसंस्थेचे महत्त्व अधोरेखित केले आणि विकासाच्या दिशेने भारताचा प्रवास बळकट करण्यासाठी त्याचा लाभ घेण्यास प्रोत्साहित केले. “भारतीय समुदायाचा प्रत्येक प्रयत्न भारताच्या प्रगतीत योगदान देतो”,असे मोदी म्हणाले. वारसा पर्यटनाच्या संधींवर भर देत, भारत हे केवळ प्रमुख मेट्रो शहरांपुरते मर्यादित नाही तर भारताचा वारसा दर्शविणारी द्वितीय आणि तृतीय श्रेणीतील शहरे आणि गावांचाही त्यात समावेश आहे, असे सांगून पंतप्रधानांनी या समुदायाला या लहान शहरे आणि गावांना भेट देण्याचे आणि त्यांचे अनुभव सामायिक करून जगाला या वारशाशी जोडण्याचे आवाहन केले. पुढल्यावेळी भारत भेटीवर येताना आपल्या किमान पाच बिगर -भारतीय वंशाच्या मित्रांना घेऊन येण्यासाठी आणि त्यांना देशाच्या विविध भागात भेट देऊन भारताबाबत अधिक जाणून घेण्यासाठी प्रेरित करण्याबाबत त्यांनी समुदायाला प्रोत्साहित केले.
भारताला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी "भारत को जानीये" या प्रश्नमंजुषा कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याचे आवाहन परदेशस्थ भारतीय नागरीकांमधील युवा सदस्यांना मोदींनी केले.पंतप्रधानांनी त्यांना "स्टडी इन इंडिया" कार्यक्रम आणि ICCR शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रेरीत केले.परदेशात ज्या ज्या ठिकाणी भारतीय राहतात अशा देशांतून भारताचा खरा इतिहास पोहोचवण्याचे महत्त्व पंतप्रधानांनी अधोरेखित केले.त्यांनी नमूद केले की या देशांतील सध्याच्या पिढीला भारताची समृद्धी, दिग्विजय आणि संघर्षांची माहिती नसेल. भारताचा खरा इतिहास जगासोबत सामायिक करण्याचे आवाहन त्यांनी परदेशस्थ भारतीय नागरीकांना यावेळी केले.
“भारत आता विश्वबंधूत्व राखणारा देश म्हणून ओळखला जात आहे”, असे उद्गार पंतप्रधानांनी काढले आणि परदेशस्थ भारतीय नागरीकांनी त्यांचे प्रयत्न वाढवून हे जागतिक हितसंबंध मजबूत करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले.विशेषत: परदेशस्थ भारतीय नागरीकांनी आपापल्या देशात स्थानिक रहिवाशांसाठी पुरस्कार सोहळे आयोजित करावेत,असे त्यांनी सुचवले. साहित्य, कला आणि हस्तकला, चित्रपट आणि नाट्य अशा विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींना हे पुरस्कार दिले जाऊ शकतात, असे पंतप्रधानांनी यात नमूद केले.भारतीय दूतावास आणि वाणिज्य दूतावासांच्या सहकार्याने परदेशस्थ भारतीय नागरीकांनी स्थानिक नागरीकांना प्रमाणपत्रे प्रदान करावीत यासाठी त्यांना प्रोत्साहित केले.यामुळे स्थानिक लोकांशी वैयक्तिक संबंध विकसीत होतील आणि भावनिक बंध दृढ होतील,असे त्यांनी नमूद केले.
स्थानिक भारतीय उत्पादनांना जागतिक किर्ती मिळवून देण्यात परदेशस्थ भारतीय नागरिकांच्या असलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर भर देत मोदी यांनी त्यांना "मेड इन इंडिया" खाद्यपदार्थांची पाकिटे, कपडे आणि इतर वस्तू स्थानिक ठिकाणी किंवा ऑनलाइन पद्धतीने खरेदी करण्याचे आवाहन केले आणि ही उत्पादने त्यांच्या स्वयंपाकघरात, बैठकीच्या खोलीत समाविष्ट करण्याचे आणि भेटवस्तू देण्याचे आवाहन केले. विकसित भारताच्या उभारणीसाठी हे महत्त्वपूर्ण योगदान असेल, असे पंतप्रधानांनी यावेळी नमूद केले.
भूमाता आणि पृथ्वीमातेशी संबंधित आणखी एक आवाहन करत, पंतप्रधानांनी त्यांच्या अलीकडील गयाना भेटीचा उल्लेख केला, जिथे त्यांनी गयानाच्या राष्ट्रपतींसोबत "एक पेड माँ के नाम" उपक्रमात भाग घेतला.भारतात लाखो लोक आधीच हे करत आहेत,असे त्यांनी नमूद केले.त्यांनी परदेशस्थ भारतीय नागरिकांना ते कुठेही असले तरी, आपल्या आईच्या नावाने,एक झाड किंवा रोपटे लावण्यासाठी प्रेरीत केले. ते भारतातून परतल्यावर विकसित भारताचा संकल्प त्यांच्यासोबत घेऊन जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भाषणाचा समारोप करताना, पंतप्रधानांनी सर्वांना चांगले आरोग्य आणि समृद्धी लाभो,असे म्हणत 2025 सालच्या शुभेच्छा दिल्या आणि भारतात परतल्यावर त्यांचे स्वागत असेल, असे नमूद केले.
या कार्यक्रमात ओडिशाचे राज्यपाल डॉ. हरी बाबू कंभामपती, ओडिशाचे मुख्यमंत्री श्री मोहन चरण मांझी, केंद्रीय मंत्री श्री एस. जयशंकर, श्री अश्विनी वैष्णव, श्री धर्मेंद्र प्रधान, श्री जुआल ओरम आणि केंद्रीय राज्यमंत्री, श्रीमती शोभा करंदलाजे, श्री किर्तीवर्धन सिंग, श्री पवित्रा मार्गेरिटा आदी मान्यवर उपस्थित होते.
पार्श्वभूमी
प्रवासी भारतीय दिन (PBD) अधिवेशन हा भारत सरकारचा एक उल्लेखनीय उपक्रम आहे, जो परदेशस्थ भारतीय नागरिकांना जोडण्यासाठी, हितसंबंध जपण्यासाठी तसेच एकमेकांशी संवाद साधण्यासाठी सक्षम करण्यात एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ प्रदान करतो.
भुवनेश्वर येथे दिनांक 8 ते 10 जानेवारी 2025 दरम्यान ओडिशा राज्य सरकारच्या सहकार्याने 18 व्या प्रवासी भारतीय दिन अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. विकसित भारत या उपक्रमात ‘परदेशस्थ भारतीय नागरीकांचे योगदान’ "(Diaspora's Contribution to a Viksit Bharat") ही यंदाच्या पीबीडी(PBD)अधिवेशनाची संकल्पना आहे. पीबीडी (PBD) अधिवेशनात सहभागी होण्यासाठी पन्नासहून अधिक देशांतील ‘परदेशस्थ भारतीय नागरिकांनी मोठ्या संख्येने नोंदणी केली आहे.
प्रवासी भारतीय एक्स्प्रेसच्या उद्घाटनाच्या प्रवासाला, दिल्लीच्या निजामुद्दीन रेल्वे स्थानकावरून निघून तीन आठवड्यांच्या कालावधीत भारतातील अनेक पर्यटन आणि धार्मिक महत्त्वाच्या स्थळांचा प्रवास करणारी,परदेशस्थ भारतीय नारिकांसाठी खास तयार करण्यात आलेली पर्यटक गाडी, प्रवासी भारतीय एक्स्प्रेस या गाडीच्या उद्घाटनाच्या पहिल्या फेरीला दूरस्थपणे हिरवा झेंडा दाखवून पंतप्रधानांनी या दिनाचा शुभारंभ केला.प्रवासी तीर्थ दर्शन योजना या अंतर्गत प्रवासी भारतीय एक्स्प्रेस ही गाडी चालविण्यात येईल.
* * *
S.Tupe/Tushar/Sushma/Sampada/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2091504)
Visitor Counter : 24
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Bengali-TR
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam