राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पंचायती राज संस्थांमधील अनुसूचित जमातीच्या महिला प्रतिनिधींशी साधला संवाद

Posted On: 06 JAN 2025 8:51PM by PIB Mumbai

नवी दिल्ली , 6 जानेवारी 2025

पंचायती राज संस्थांमधील अनुसूचित जमातीच्या महिलांच्या गटाने आज (6 जानेवारी 2025) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवन येथील सांस्कृतिक केंद्रात भेट घेतली. राष्ट्रीय महिला आयोगाने आदिवासी विकास मंत्रालय आणि लोकसभा सचिवालयाच्या सहयोगाने आयोजित केलेल्या 'पंचायत से संसद' या कार्यक्रमात भाग घेण्यासाठी या महिला प्रतिनिधी नवी दिल्लीत आल्या आहेत.

पंचायती राज संस्था या आपल्या लोकशाहीचा आधारस्तंभ आहे. या संस्था अगदी तळागाळातील स्तरावर शासन आणि समुदाय विकासाकरता एक मंच उपलब्ध करून देतात, असे राष्ट्रपती यावेळी उपस्थितांना संबोधित करताना म्हणाल्या. महिला सक्षमीकरणामध्ये या संस्थांनी अत्यंत महत्वाची भूमिका बजावली आहे. देशभरातील पंचायती राज संस्था आणि ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडून आलेल्या सदस्य म्हणून सुमारे 14 लाख महिला कार्यरत आहेत, हे प्रमाण एकूण निवडून आलेल्या प्रतिनिधींच्या 46 टक्के आहे. हा सहभाग अधिक वाढावा यासाठी अनेक राज्यांनी आरक्षणाचे प्रमाण 50 टक्क्यांपर्यंत वाढवले आहे, असे त्यांनी सांगितले.

भारत सरकार देशाच्या आणि नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करत आहे. नागरिकांच्या कल्याणासाठी अनेक योजना राबवल्या जात  आहेत. पंचायती राज संस्थांच्या प्रतिनिधींनी पात्र नागरिकांना सर्व योजनांचा लाभ घेता यावा याकरता जनजागृती करावी जेणेकरून ते  लाभार्थी बनतील  असे आवाहन त्यांनी केले. याशिवाय बालकांचे लसीकरण वेळेत व्हावे, गरोदर मातांना पोषणयुक्त आहार मिळावा आणि मुलांना मध्यातच अभ्यास सोडावा लागू नये यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन देखील त्यांनी केले. हुंडा, घरगुती हिंसाचार आणि अंमली पदार्थांचे व्यसन याविरोधात त्यांनी मोहीम उभारावी, असे ही त्या म्हणाल्या.

महिला प्रतिनिधींनी पंचायतींमध्ये निवडून आलेल्या प्रतिनिधी म्हणून आपली जबाबदारी निर्भयपणे पार पाडावी, असा सल्ला राष्ट्रपतींनी दिला. पंचायत प्रतिनिधी म्हणून त्यांना गावकऱ्यांमधील वाद मिटवण्याचा अधिकार आहे. त्यांनी आपल्या या अधिकाराचा अत्यंत जबाबदारपणे वापर करावा आणि पंचायत स्तरावरच गावकऱ्यांमधील वाद मिटवण्याचा प्रयत्न करावा, यामुळे लोकांच्या साधनसंपत्तीची आणि वेळेची बचत तर होईलच शिवाय आपापसातील सौहार्द वाढीस लागेल, असे त्यांनी सांगितले.

राष्ट्रपतींचे भाषण पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

 

S.Kane/B.Sontakke/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2090748) Visitor Counter : 32