पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान 4 जानेवारी रोजी नवी दिल्ली येथे ग्रामीण भारत महोत्सव 2025 चे करणार उद्घाटन


महोत्‍सवाची संकल्‍पना : विकसित भारत 2047 साठी  लवचिक ग्रामीण भारताची निर्मिती  करणे

ग्रामीण भारताची  उद्योजकता आणि सांस्कृतिक वारसा साजरे करणे महोत्सवाचे उद्दिष्ट

Posted On: 03 JAN 2025 5:56PM by PIB Mumbai


नवी दिल्ली – दि.  03 जानेवारी, 2025

नवी दिल्ली येथील भारत मंडपममध्‍ये उद्या - 4 जानेवारी रोजी सकाळी 10:30 वाजता  पंतप्रधान  नरेंद्र मोदी ग्रामीण भारत महोत्सव 2025 चे उद्घाटन करणार आहेत. यावेळी ते उपस्थितांना संबोधित करणार आहेत.

ग्रामीण भारताची उद्योजकता आणि सांस्कृतिक वारसा साजरा करणारा, हा महोत्सव 4 ते 9 जानेवारी या कालावधीत होणार आहे. विकसित भारत 2047 साठी एक लवचिक ग्रामीण भारत निर्माण करणे  आणि "गाव बढे, तो देश बढे" या संकल्पनेवर  या महोत्‍सवाचे  आयोजन करण्‍यात आले आहे.

या महोत्सवामध्‍ये विविध विषयांवर  चर्चा, कार्यशाळा आणि मास्टरक्लासच्या माध्यमातून महोत्सवाच्या उद्दिष्टानुसार  ग्रामीण पायाभूत सुविधा वाढवणे, स्वावलंबी अर्थव्यवस्था निर्माण करणे आणि ग्रामीण समुदायांमध्ये नवोन्मेषी कल्पनांना बळ  देण्‍यात येणार आहे. आर्थिक स्‍थैर्य, आणि वित्तीय सुरक्षेला प्रोत्साहन देण्‍याचाही उद्देश यामागे आहे. यामध्‍ये ईशान्य भारतावर विशेष लक्ष केंद्रित करून, ग्रामीण भागातील जनतेमध्‍ये शाश्वत कृषी पद्धतींना पाठिंबा देण्‍यात येणार आहे. आर्थिक समावेशन आणि आर्थिक सुरक्षेला प्रोत्साहन देणे असाही उद्देश महोत्‍सवाच्या आयोजनामागे आहे. 

उद्योजकतेच्या माध्यमातून ग्रामीण महिलांचे सक्षमीकरण करणे यावर या  महोत्सवात प्रामुख्‍याने भर दिला जाईल. सहयोगी आणि सामूहिक ग्रामीण परिवर्तनासाठी पथदर्शी कार्यक्रम तयार करण्यासाठी सरकारी अधिकारी, या क्षेत्रातील विचारवंत धुरीण , ग्रामीण उद्योजक, कारागीर आणि विविध क्षेत्रातील भागधारकांना एकत्र आणण्‍यात येणार आहे.  ग्रामीण उपजीविका  वाढवण्यासाठी तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण पद्धतींचा फायदा घेण्याबाबत चर्चेला  प्रोत्साहन दिले जाणार आहे. तसेच प्रत्यक्ष कलासादरीकरणाच्या  माध्‍यमातून भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे प्रदर्शन करण्‍यात येणार आहे. 

***

S.Kane/S.Bedekar/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2089987) Visitor Counter : 56