गृह मंत्रालय
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली आयलंड डेव्हलपमेंट एजन्सीची (आयडीए) सातवी बैठक संपन्न
Posted On:
03 JAN 2025 5:56PM by PIB Mumbai
केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली येथे आयलंड डेव्हलपमेंट एजन्सी (आयडीए), अर्थात बेट विकास संस्थेची सातवी बैठक पार पडली. बैठकी दरम्यान केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी अंदमान-निकोबार बेटे आणि लक्षद्वीपमध्ये सुरू असलेल्या विकास प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेतला. गृह मंत्रालय, अंदमान आणि निकोबार बेटे प्रशासन आणि लक्षद्वीप प्रशासनाने डिजिटल कनेक्टिव्हिटी, हवाई कनेक्टिव्हिटी आणि बंदर विकासासह विविध विकास प्रकल्पांवर सविस्तर सादरीकरण केले. अंदमान निकोबार बेटे आणि लक्षद्वीपमध्ये सौर आणि पवन ऊर्जा उपक्रम पुढे नेण्याचे महत्त्व केंद्रीय गृहमंत्र्यांनी अधोरेखित केले. या भागात सौर पॅनेल आणि पवनचक्क्यांच्या माध्यमातून 100% अक्षय ऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट साध्य करण्यावर त्यांनी भर दिला. केंद्रीय नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने दोन्ही बेट समूहांवरील सर्व घरांवर सौर पॅनेल बसवून 'पीएम सूर्य घर' योजना राबवावी, असे निर्देशही शाह यांनी दिले.
केंद्रीय मंत्री अमित शाह म्हणाले की, ही बेटं दिल्लीपासून दूर असली तरी ती आमच्या हृदयाच्या जवळ आहेत, या ठिकाणी पायाभूत सुविधांचा विकास आणि पर्यटन सुविधा वाढवणे हे सरकारचे प्राधान्य आहे. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार या बेटांची संस्कृती आणि वारसा जपत असून, इथल्या विकासकामांना गती देत आहे. दोन्ही बेट समूहांवरील पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी सर्वसमावेशक दृष्टिकोनाच्या गरजेवर त्यांनी भर दिला, आणि सर्व संबंधित केंद्रीय मंत्रालयांनी इथले पर्यटन, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या क्षेत्रांशी संबंधित उपक्रमांना सहकार्य करावे असे आवाहन केले. या बेटांवरील प्रलंबित प्रश्न सोडवावेत आणि निर्माणाधीन प्रकल्प जलदगतीने पूर्ण करावेत, असे स्पष्ट निर्देशही शहा यांनी दिले.
***
S.Kane/R.Agashe/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2089975)
Visitor Counter : 27