सांस्कृतिक मंत्रालय
एक व्हावा संपूर्ण देश' हा कुंभमेळ्याचा संदेश आहे : पंतप्रधान नरेंद्र मोदी
समाजातील फूट आणि द्वेषाची भावना नष्ट करण्याचा संकल्प करण्याचे पंतप्रधानांचे नागरिकांना आवाहन.
देशभरातील आणि जगभरातील भाविक पहिल्यांदाच डिजिटल महाकुंभाचे साक्षीदार होणार : पंतप्रधान
Posted On:
29 DEC 2024 6:01PM by PIB Mumbai
महाकुंभ मेळ्याचे वैशिष्ट्य केवळ त्याच्या भव्यतेतच नव्हे तर त्यातील वैविध्यात देखील आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ च्या 117 व्या भागात देशवासियांशी साधलेल्या संवादात म्हटले आहे. कुंभमेळ्यात कोट्यवधी लोक एकावेळी एकत्र येतात. लाखो संत, हजारो परंपरा, शेकडो पंथ, अनेक आखाडे, प्रत्येकजण या कार्यक्रमाचा एक भाग बनतो. कुंभमेळ्यात कुठेही भेदभाव दिसून येत नाही, कोणी मोठा नाही, कोणी लहान नाही, हे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. विविधतेतील एकतेचे असे दृश्य जगात कुठेही दिसणार नाही. म्हणूनच आपला कुंभमेळा हा एकतेचा महाकुंभही आहे. यंदाच्या महाकुंभातूनही एकतेच्या महाकुंभाचा मंत्र दृढ होणार आहे. नागरिकांनी या कुंभमेळ्यात एकतेचा संकल्प घेऊन सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले. आपण समाजातील फूट आणि द्वेषाची भावना नष्ट करण्याचा संकल्प केला पाहिजे. थोडक्यात सांगायचे तर महाकुंभ मेळ्याचा संदेश, एक व्हावा संपूर्ण देश! असा आहे, असे पंतप्रधान म्हणाले. संपूर्ण देश एक होवो असा महाकुंभाचा संदेश असून वेगळ्या पद्धतीने सांगायचे झाले तर 'गंगेचा अखंड प्रवाह, दुभंगता कामा नये आपला समाज' अशा शब्दात मांडता येईल. गंगेच्या अखंड प्रवाहाप्रमाणे आपला समाज देखील अखंड रहावा , असे त्यांनी सांगितले.
यावेळी देशभरातील आणि जगभरातील भाविक प्रयागराजमध्ये डिजिटल महाकुंभाचे साक्षीदार असतील , असे पंतप्रधान म्हणाले.
‘डिजिटल नेव्हिगेशन’ च्या मदतीने तुम्हाला विविध घाट, मंदिरे आणि साधूसंतांच्या आखाड्यांपर्यंत पोहोचता येणार आहे. अशाच प्रकारे ‘नेव्हिगेशन’ प्रणाली तुम्हाला वाहनतळामध्ये गाडी पार्किंगच्या स्थानी पोहोचण्यासाठीही मदत करणार आहे. कुंभमेळ्यामध्ये प्रथमच एआय चॅटबॉट म्हणजे कृत्रिम प्रज्ञेव्दारे संवाद साधणा-या तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. कुंभमेळ्यासंबंधित सर्व प्रकारची माहिती या चॅटबॉटव्दारे 11 भारतीय भाषांमध्ये उपलब्ध असणार आहे. कोणालाही या ‘चॅटबॉट’द्वारे मजकूर टाइप करून किंवा बोलून कोणत्याही प्रकारची मदत मागता येईल. संपूर्ण कुंभमेळा परिसर एआय-चलित कॅमेऱ्यांनी व्यापण्यात आला आहे. कुंभ मेळाव्यामध्ये जर कोणाची आपल्या नातेवाईकांशी चुकामूक झाली, इतक्या प्रचंड गर्दीमध्ये एकमेकांना सापडणे अवघड झाले तर या कॅमे-यांच्या मदतीने त्यांना शोधता येणार आहे. ‘लॉस्ट अँड फाऊंड केंद्रा’ मार्फत डिजीटल सुविधाही भाविकांना मिळणार आहे. भाविकांना त्यांच्या मोबाईल फोनवर सरकारद्वारा मान्यताप्राप्त टूर पॅकेज, निवास आणि उपलब्ध ‘होम स्टे’ची माहिती देखील दिली जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना आवाहन केले आहे की, सर्वांनी महाकुंभला भेट देत असताना, या सुविधांचा लाभ घ्यावा आणि #EktaKaMahakumb सह त्यांचा सेल्फी अपलोड करावा.
देशाला संबोधित करताना, पंतप्रधानांनी भारतीय संस्कृतीचे तेज आज जगाच्या कोनाकोपऱ्यात कसे पसरत आहे, यावर प्रकाश टाकला. त्यांनी ताजमहालच्या एका भव्य पेंटिंगचा उल्लेख केला जो इजिप्तमधील एका 13 वर्षांच्या दिव्यांग मुलीने तिच्या तोंडाने बनवला आहे. पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, काही आठवड्यांपूर्वी, इजिप्तमधील सुमारे 23 हजार विद्यार्थ्यांनी एका चित्रकला स्पर्धेत भाग घेतला होता, जिथे त्यांना भारतीय संस्कृती आणि दोन्ही देशांमधील ऐतिहासिक संबंध दर्शविणारी चित्रे काढायची होती. या स्पर्धेत सहभागी झालेल्या तरुणांचे कौतुक करताना पंतप्रधान म्हणाले की, “ या सर्वांच्या सर्जनशीलतेचे जेवढे कौतुक करावे, तितके कमीच आहे.”
***
S.Kane/B.Sontakke/S.Bedekar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2089837)
Visitor Counter : 13