पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 जानेवारी रोजी दिल्लीतील विविध विकासकामांची पायाभरणी आणि उद्घाटन करणार
अशोक विहार येथील स्वाभिमान अपार्टमेंट्स येथे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी नव्याने बांधलेल्या 1,675 सदनिकांचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होणार
नौरोजी नगर येथील वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि सरोजिनी नगर येथील जीपीआरए टाईप-II क्वार्टर्स या दोन नागरी पुनर्विकास प्रकल्पांचे उद्घाटन पंतप्रधान करणार
द्वारका येथे सीबीएसईच्या एकात्मिक कार्यालय संकुलाचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार
पंतप्रधानांच्या हस्ते रोशनपुरा, नजफगड येथे वीर सावरकर महाविद्यालयाची पायाभरणी केली जाणार
Posted On:
02 JAN 2025 10:18AM by PIB Mumbai
'सर्वांसाठी घरे' या आपल्या वचनबद्धतेनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 जानेवारी 2025 रोजी दुपारी 12:10 च्या सुमारास दिल्लीतील अशोक विहार येथील स्वाभिमान अपार्टमेंट्स येथे थेट त्या जागेवर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांतर्गत झोपडपट्टी धारकांसाठी बांधण्यात आलेल्या सदनिकांना भेट देणार आहेत. त्यानंतर दुपारी 12:45 च्या सुमारास त्यांच्या हस्ते दिल्लीत अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी होणार आहे.
पंतप्रधान दिल्लीतील अशोक विहार येथे स्वाभिमान अपार्टमेंट्स मधील झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत नव्याने बांधण्यात आलेल्या 1,675 सदनिकांचे उद्घाटन करणार असून पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या हस्ते घराच्या किल्ल्या प्रदान केल्या जाणार आहेत. या नव्याने बांधलेल्या सदनिकांचे उद्घाटन म्हणजे दिल्ली विकास प्राधिकरण (डीडीए ) च्या दुसऱ्या यशस्वी इन-सिटू अर्थात थेट त्या जागेवर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाची पूर्तता आहे.
दिल्लीतील जेजे क्लस्टरमधील रहिवाशांना योग्य सोई आणि सुविधांनी सुसज्ज चांगले आणि आरोग्यदायी राहणीमान प्रदान करणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे.
सरकारने सदनिकांच्या बांधकामासाठी खर्च केलेल्या प्रत्येक 25 लाख रुपयांमागे, पात्र लाभार्थ्यांना एकूण रकमेच्या 7% पेक्षा कमी रक्कम द्यावी लागते ज्यामध्ये नाममात्र योगदान म्हणून 1.42 लाख रुपये आणि पाच वर्षांच्या देखभालीसाठी 30,000 रुपये यांचा समावेश आहे.
नौरोजी नगर येथील वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि सरोजिनी नगर येथील जनरल पूल रेसिडेन्शिअल एकोमोडेशन टाईप-II क्वार्टर्स या दोन नागरी पुनर्विकास प्रकल्पांचे उद्घाटन देखील पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.
नौरोजी नगर येथील 600 हून अधिक जीर्ण वसाहतींच्या जागी,सुमारे 34 लाख चौरस फूट क्षेत्रावर प्रगत सुविधांसह व्यावसायिक उंच इमारती बांधून तेथे झालेल्या जागतिक व्यापार केंद्रामुळे (वर्ल्ड ट्रेड सेंटर) या परिसराचा कायापालट झाला आहे.या प्रकल्पात शून्य कचरा (झिरो-डिस्चार्ज)संकल्पना, सौर ऊर्जा निर्मिती आणि पावसाच्या पाण्याची साठवण करणारी यंत्रणा यासारख्या तरतुदींसह हरीत इमारतींच्या प्रकल्प पद्धतींचा समावेश केलेला आहे.
सरोजिनी नगर येथील GPRA टाईप-II वसाहतींमध्ये 28 टॉवर्स उंच अत्याधुनिक इमारतींचा समावेश आहे; ज्यात आधुनिक सुविधा आणि जागेचा कार्यक्षम वापर करणारी 2,500 निवासस्थाने आहेत.या प्रकल्पाच्या आराखड्यात पावसाचे पाणी साठवण्याची यंत्रणा, सांडपाणी आणि जलशुद्धीकरण प्रकल्प आणि सौरऊर्जेवर चालणारे कचरा कमी करणारी यंत्रे (वेस्ट कॉम्पॅक्टर) यांचा समावेश आहे जेणेकरून पर्यावरणाविषयी जागरूक राहण्यास प्रोत्साहन मिळते.
द्वारका, दिल्ली येथे सुमारे 300 कोटी रुपये खर्चून बांधलेल्या सीबीएसईच्या एकात्मिक कार्यालय संकुलाचे उद्घाटनही पंतप्रधान करणार आहेत.यामध्ये कार्यालये, सभागृह, प्रगत माहिती केंद्र (डेटा सेंटर), सर्वसमावेशक जल व्यवस्थापन प्रणाली यांचा समावेश आहे. येथील पर्यावरणपूरक इमारती उच्च पर्यावरणीय मानकांनुसार बांधण्यात आल्या आहेत आणि इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिलच्या (IGBC) प्लॅटिनम रेटिंग मानकांनुसार त्यांचे डिझाइन करण्यात आले आहे.
दिल्ली विद्यापीठात 600 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या तीन नवीन प्रकल्पांची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. त्यात पूर्व दिल्लीतील सूरजमल विहार येथील पूर्वेकडील आवारातील (ईस्टर्न कॅम्पस) शैक्षणिक वसाहती आणि द्वारका येथील पश्चिमेकडील आवारातील(वेस्टर्न कॅम्पस) शैक्षणिक वसाहतींचा समावेश आहे.
***
JPS/SampadaP/BS/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2089544)
Visitor Counter : 47
Read this release in:
Malayalam
,
Assamese
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada