गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी छत्तीसगड मधल्या जगदलपूर येथील शहीद स्मारकावर शहीद जवानांना वाहिली श्रद्धांजली आणि शहीद जवानांच्या कुटुंबियांची आणि नक्षली हिंसाचार पीडितांची घेतली भेट


नक्षली हिंसाचार पीडितांना पाठबळ देण्यासाठी मोदी सरकार वचनबद्ध

Posted On: 16 DEC 2024 9:52PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 16 डिसेंबर 2024

 

नक्षलवाद्यांसोबत लढताना आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शहीदांना केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज छत्तीसगड मधल्या जगदलपूर इथे श्रद्धांजली वाहिली. शहीद जवानांच्या कुटुंबीयांची आणि नक्षलवादी हिंसाचारात बळी पडलेल्यांच्या कुटुंबीयांचीही त्यांनी भेट घेतली.

हे स्मारक केवळ या वीरांना श्रद्धांजलीच वाहणार नाही तर भावी पिढ्यांनाही प्रेरणा देईल, अशी आशा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्या भाषणात व्यक्त केली. सध्याचे छत्तीसगड सरकार गेल्या वर्षी स्थापन झाल्यापासून नक्षलवादाचे  उच्चाटन करण्याच्या कटिबद्धतेवर ठाम असल्याचे अमित शाह यांनी यावेळी अधोरेखित केले. निष्पाप जीवांची आणखी हानी टाळण्यासाठी या समस्येचे समूळ उच्चाटन करणे आवश्यक आहे यावर त्यांनी भर दिला.

   

हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकार सर्वसमावेशक त्रिसूत्रीचा अवलंब करत असल्याचे त्यांनी नमूद केले. या संदर्भात केंद्रीय गृहमंत्र्यांनी महत्त्वाची माहिती सामाईक केली. छत्तीसगडमध्ये एका वर्षात, 287 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले, अंदाजे 1,000 जणांना अटक झाली आणि 837 जणांनी आत्मसमर्पण केले, असे त्यांनी सांगितले. यातून या भागामध्ये शांतता आणि सुरक्षा पुनर्प्रस्थापित करण्यासाठीची सरकारचा अढळ निर्धार प्रदर्शित होत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गेल्या वर्षी छत्तीसगडमध्ये नक्षलवादाशी लढा देताना अभूतपूर्व कामगिरी झाल्याचे नमूद केले. 31 मार्च 2026 नंतर माता दंतेश्वरीच्या या पवित्र भूमीवर नक्षलवादाच्या नावाने रक्ताचा एक थेंबही सांडणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली.

   

यापूर्वी नक्षलवादाने ग्रस्त असलेल्या भागांमध्ये विकासाला चालना देण्यासाठी छत्तीसगड सरकारने टप्प्याटप्प्याने राबवण्यात येणारी योजना तयार केली असल्याची माहिती अमित शाह यांनी दिली.

ही योजना गावांचे कल्याण आणि बाधित समुदायांच्या उन्नतीवर लक्ष केंद्रित करत असल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भक्कम पाठबळाने आणि सहकार्याने हे उपक्रम राबवले जात आहेत यावर शाह यांनी भर दिला. पंतप्रधान मोदींनी नक्षलग्रस्त भागात 15,000 घरे बांधण्यास मंजुरी दिल्याचे त्यांनी नमूद केले. याव्यतिरिक्त, नक्षल हिंसाचारामुळे प्रभावित कुटुंबांना प्राधान्याने मदत सुनिश्चित करून प्रत्येक गावात सरकारी कल्याणकारी योजनांची 100% संपृक्तता साध्य करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. 

   

पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील नक्षलमुक्त भारताच्या मोहिमेला पीडित कुटुंबांचा मोठा पाठिंबा मिळत आहे, असे त्यांनी सांगितले. या कुटुंबांचे पुनर्वसन आणि प्रगतीसाठी सरकारच्या वचनबद्धतेची पुष्टी करत, या कुटुंबांना सर्वसमावेशक मदत देण्यासाठी केंद्रीय गृह, आदिवासी कार्य आणि ग्रामीण विकास मंत्रालये एकत्रितपणे काम करत असल्याचे देखील त्यांनी नमूद केले.

 

* * *

N.Chitale/S.Patil/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2085049) Visitor Counter : 18