गृह मंत्रालय
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी आपल्या छत्तीसगड दौऱ्याच्या पहिल्या दिवशी, रायपूरमध्ये छत्तीसगड पोलिसांना 'राष्ट्रपती ध्वज' केला प्रदान
Posted On:
15 DEC 2024 4:56PM by PIB Mumbai
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी आज आपल्या छत्तीसगड राज्याच्या दौऱ्याच्या पहिल्या दिवशी रायपूर येथे छत्तीसगड पोलिसांना प्रतिष्ठेचा 'राष्ट्रपती ध्वज' प्रदान केला. छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साय आणि उपमुख्यमंत्री विजय शर्मा यांच्यासह अनेक प्रमुख मान्यवरांनी या सोहळ्याला हजेरी लावली.
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी आपल्या भाषणात ‘राष्ट्रपती ध्वज’ प्राप्त करणे ही अत्यंत अभिमानाची बाब असल्याचे सांगितले. हा बहुमान म्हणजे कोणत्याही सशस्त्र दलासाठी एक गौरव आहे, असेही ते म्हणाले. छत्तीसगड पोलिस दलाच्या स्थापनेच्या अवघ्या 25 वर्षांच्या आत त्यांनी हा सन्मान मिळवल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्र्यांनी त्यांचे कौतुक केले. यातून राष्ट्रपतींकडून मिळवलेला विश्वास प्रतिबिंबित होत असल्याचे त्यांनी सांगितले. शहा यांनी उत्कटता, धैर्य, शौर्य आणि समर्पण यासाठी प्रसिद्ध असलेल्या छत्तीसगड पोलिसांचे देशातील सर्वोत्कृष्ट दल म्हणून कौतुक केले. रौप्यमहोत्सवी वर्षात ‘राष्ट्रपती ध्वज’ मिळणे हा दलाच्या अथक परिश्रम, वचनबद्धता, शौर्य आणि जनतेशी असलेल्या दृढ संबंधाचे द्योतक आहे यावर त्यांनी भर दिला. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी, नक्षलवादाचा मुकाबला करण्यासाठी, अंमली पदार्थमुक्त भारताच्या मोहिमेला पुढे नेण्यासाठी , सार्वजनिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आणि राज्यातील नागरिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी छत्तीसगड पोलिसांच्या अनुकरणीय सेवेबद्दल त्यांनी दलाची प्रशंसा केली. केंद्रीय गृहमंत्र्यांनी छत्तीसगडमध्ये शांतता आणि सुरक्षा प्रस्थापित करण्याप्रति दलाच्या अतुलनीय समर्पण आणि त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित केली.
आज सरदार वल्लभभाई पटेल यांची पुण्यतिथी असल्याचे अमित शहा यांनी सांगितले. सरदार पटेल यांच्या अतुलनीय धैर्याने आणि दृढनिश्चयानेच देशाला एकसंघ केले, असे त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कलम 370 रद्द करून सरदार पटेल यांचे अपूर्ण काम पूर्ण केले आणि त्याद्वारे काश्मीर कायमचे भारताशी जोडले गेले, असेही ते म्हणाले. संपूर्ण देश आज सरदार पटेल यांना कृतज्ञतापूर्वक आदरांजली अर्पण करत आहे, असे त्यांनी सांगितले.
अमित शाह म्हणाले की, छत्तीसगड राज्याच्या निर्मितीची दीर्घकालीन मागणी अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली छत्तीसगड 31 मार्च 2026 पर्यंत नक्षलवादमुक्त होईल असा विश्वास गृहमंत्र्यांनी व्यक्त केला . मोदी सरकार छत्तीसगडच नव्हे तर देशातील इतर राज्यांमधूनही नक्षलवाद संपवण्यास वचनबद्ध असल्याचं त्यांनी यावेळी अधोरेखित केले.
त्यांनी नक्षलवाद्यांना हिंसेचा मार्ग सोडून समाजाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होण्याचे आवाहन केले तसेच प्रगतीच्या मार्गावर पुढे जाऊन छत्तीसगडच्या विकासात योगदान देण्याचे आवाहन केले. त्यांनी छत्तीसगड सरकारने लागू केलेल्या आत्मसमर्पणाच्या उत्कृष्ट धोरणाचा उल्लेख केला. यामुळे आत्मसमर्पण करणाऱ्या प्रत्येक नक्षलवाद्याचे पुनर्वसन सुनिश्चित होते, असे त्यांनी नमुद केले.
केंद्रीय गृहमंत्र्यांनी छत्तीसगड पोलिसांबद्दल विश्वास व्यक्त करताना म्हटले की, छत्तीसगड पोलिसमधील प्रत्येक अधिकारी आणि कर्मचारी विकसित छत्तीसगड आणि विकसित बस्तरचा संकल्प साकार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली 2047 पर्यंत विकसित भारत निर्माण करण्याच्या प्रवासात छत्तीसगडचे महत्त्वाचे योगदान सुवर्णाक्षरांनी नोंदवले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
केंद्रीय गृहमंत्र्यांनी छत्तीसगड पोलिसांच्या जवानांना उद्देशून सांगितले की, ‘प्रेसिडेंट्स कलर’ हे केवळ एक अलंकरण नसून सेवा, त्याग, आणि बलिदानाचे प्रतीक आहे. त्यांनी सांगितले की, हे चिन्ह असंख्य आव्हानांचा सामना करण्यासाठी दृढतेची आठवण करून देते. अमित शाह यांनी स्पष्ट केले की, ‘प्रेसिडेंट्स कलर’ हा केवळ एक सन्मान नाही तर जबाबदारीही आहे. छत्तीसगड पोलिसमधील प्रत्येक जवान ही जबाबदारी प्रामाणिकपणे पेलतील आणि कर्तव्य पार पाडताना मागे हटणार नाहीत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
***
S.Kane/S.Mukhedkar/N.Gaikwad/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2084624)
Visitor Counter : 48