उपराष्ट्रपती कार्यालय
सध्याची संस्थात्मक आव्हाने अर्थपूर्ण संवाद व योग्य अभिव्यक्तीच्या कमतरतेतून निर्माण होत आहेत - उपराष्ट्रपती
लोकशाही केवळ यंत्रणांच्या आधारे चालत नाही तर ती अभिव्यक्ती व संवाद यांच्या संतुलनावर केंद्रित मूल्यांवरही आधारित असल्याचे उपराष्ट्रपतींकडून अधोरेखित
भारतीय लोकशाहीचा प्रवास म्हणजे विविधता व प्रचंड लोकसंख्या असलेला देशही कशी प्रगती करतो याचे उदाहरणच आहे - उपराष्ट्रपती
अहंकार कुणालाही सुखावत नाही, अहंकारी व्यक्तीचेच सर्वात जास्त नुकसान होते - उपराष्ट्रपती
स्वमूल्यांकन अतिशय महत्त्वाचे आहे, आत्मपरीक्षण न करणाऱ्या संस्था किंवा व्यक्तीची अधोगती होणे निश्चित असते - उपराष्ट्रपती
नागरी सेवेत रुजू होणाऱ्या नव्या अधिकाऱ्यांनी तंत्रज्ञान कुशल, बदल घडविणारे, पारंपरिक प्रशासकीय मर्यादांपलिकडची दृष्टी असलेले अधिकारी बनावे - उपराष्ट्रपती
IP&TAFS संस्थेच्या 50 व्या स्थापना दिनानिमित्त नवी दिल्लीत ICWA इथे झालेल्या कार्यक्रमात उपराष्ट्रपतींचे प्रमुख अतिथी म्हणून संबोधन
Posted On:
14 DEC 2024 12:15PM by PIB Mumbai
संस्थात्मक आव्हानांकडे लक्ष वेधताना उपराष्ट्रपती जगदीप धनखड म्हणाले, ‘सध्या संस्थाअंतर्गत किंवा संस्थाबाह्य आव्हाने बरेचदा अर्थपूर्ण संवाद व योग्य अभिव्यक्ती यांच्या कमतरतेमुळे निर्माण होत आहेत. अभिव्यक्ती व अर्थपूर्ण संवाद हे दोन्हीही लोकशाहीतील अमूल्य रत्ने आहेत. अभिव्यक्ती व संवादकौशल्य एकमेकांना पूरक आहेत. या दोन्हीतला योग्य ताळमेळ हे यशाचे गमक आहे.’
अंतस्थ मूल्यांचे महत्त्व अधोरेखित करताना धनखड म्हणाले, ‘लोकशाही केवळ यंत्रणांच्या आधारे उभी नाही तर अंतस्थ मूल्यांवर आधारित आहे...ती अभिव्यक्ती व संवाद यांच्या सुयोग्य संतुलनाभोवती केंद्रित असली पाहिजे. अभिव्यक्ती व संवाद ही दोन कौशल्ये लोकशाहीच्या चैतन्यस्वरुपाला आकार देतात. त्यांची प्रगती कोण्या एका व्यक्तीच्या स्थानावरुन ठरविली जात नाही तर त्याचा समाजाला किती लाभ झाला यावरुन ठरते. विविधता व प्रचंड मोठी लोकसंख्या यामुळे देशाच्या प्रगतीला कशी चालना मिळते याचे भारतीय लोकशाही म्हणजे उत्तम उदाहरण आहे. प्रगतीपथावरुन पुढे वाटचाल करताना आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की सुदृढ लोकशाही व आर्थिक उत्पादकता हे वेगवेगळे घटक नसून देशाच्या विकासातले अभिन्न साथीदार आहेत. IP&TAFS च्या 50 व्या स्थापना दिनानिमित्त नवी दिल्ली इथे आयोजित समारंभात प्रमुख अतिथी म्हणून बोलताना धनखड म्हणाले, आपल्यातला अहंकार दडपून टाकता येत नाही, अहंकारावर नियंत्रण मिळविण्यासाठी आपल्याला कठोर मेहनत करावी लागेल. अहंकारमुळे कोणाचेच भले होत नाही मात्र अहंकारी व्यक्तीचे सर्वात मोठे नुकसान होते.’
आत्मपरीक्षणाचे महत्त्व विशद करताना धनखड म्हणाले, ‘मित्रांनो, आत्म परीक्षण अतिशय महत्त्वाचे आहे. व्यक्ती अथवा संस्थेची अधोगती घडवून आणायची असेल; तर त्याचा खात्रीशीर मार्ग म्हणजे त्या व्यक्तीला आत्मपरीक्षणापासून लांब ठेवणे. जर तुम्ही आत्मपरीक्षणास तयार नसाल, तर तुमची अधोगती होणे निश्चित आहे. आणि म्हणूनच आत्मपरीक्षण अर्थात स्वतःचे तटस्थ दृष्टीने मूल्यांकन करणे आवश्यक आहे.’
नागरी सेवेतील अधिकाऱ्यांना संबोधित करताना ते पुढे म्हणाले की, ‘सध्याच्या नागरी सेवा अधिकाऱ्यांनी तंत्रज्ञान कुशल, बदलांना सामोरे जाणारे तसेच पारंपरिक मर्यादा ओलांडून वेगळा विचार करणारे असले पाहिजे. सेवा हा आपला स्थायीभाव आहे. प्रशासकीय अधिकारी, वित्त सल्लागार, नियामक व लेखा परीक्षक म्हणून तुम्ही भविष्यातल्या आव्हानांचा सामना करण्यास सज्ज असले पाहिजे. आपण आपली काम करण्याची पद्धत बदलून तिला अत्याधुनिक स्वरुप देणे ही काळाची गरज आहे.’
‘मी तुम्हाला सांगतो, तुम्ही माझ्यापेक्षा खूपच सजग आहात. आपण औद्योगिक क्रांतीच्या आणखी एका वळणावर पोहोचलो आहोत. डिजिटल तंत्रज्ञानानाने आपले आयुष्य व्यापून टाकले आहे. घरात, कार्यालयात सगळीकडे ते आपल्यासोबत असते. डिजिटल तंत्रज्ञानामुळे आव्हानांबरोबरच संधीही निर्माण होत आहेत. कृत्रिम बुद्धीमत्ता, इंटरनेट ऑफ थिंग्ज, मशिन लर्निंग, ब्लॉकचेन व यासारख्या कित्येक गोष्टी...ज्या आपल्या अवतीभोवती उदयाला येत आहेत, त्यांच्यापासून निर्माण झालेल्या आव्हानांचा अंदाज घेत त्यांना संधीमध्ये परावर्तित करणे गरजेचे आहे. देशातल्या प्रत्येक व्यक्तीच्या मग ती स्त्री असो वा पुरुष त्यांच्या महत्त्वाकांक्षेशी ही संधी निगडीत असावी. यामुळे इतर सेवा क्षेत्रे तुमचे अनुकरण करू शकतात हे सांगण्यात मला आनंद होत आहे. आपल्या सेवा अजून गतीमान असणे आवश्यक आहे. तंत्रज्ञानात, सामाजिक व्यवस्थेत वेगाने होणारे बदल स्वीकारुन आपल्या लोकशाहीचा गाभा असलेली सर्वसमावेशकता कायम राखली गेली पाहिजे. राष्ट्र उभारणीतील आपली जबाबदारी आता आणखी वाढली आहे. कारण देशाला 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याचे स्वप्न साकार करण्याच्या दृष्टीने आपण भविष्याची आखणी व रचना केली पाहिजे.’
वेगवेगळ्या विभागांमधले सहकार्य व समन्वय यावर भर देताना ते म्हणाले, ‘सध्याच्या परस्परावलंबी जगात वेगवेगळ्या विभागांमधले सहकार्य महत्त्वपूर्ण ठरते. आपल्या सर्वांमध्ये तसेच एकमेकांसोबत समन्वय असणे आवश्यक आहे. मी नेहमीच प्रत्येकाला हे सांगत आलो आहे की सत्तेच्या विभागणीचे तत्त्वज्ञान हे दुसरे तिसरे काही नसून न्यायव्यवस्था, कार्यकारी व्यवस्था व कायदेमंडळ अर्थात संसद या तिघांनी एकत्वाच्या भावनेने समन्वयाने काम केले पाहिजे. त्यांच्यातील वातावरण सलोख्याचे असणे गरजेचे आहे.’
‘विश्वास ठेवा, मतभेद कुटुंबातील असोत की यंत्रणांमधले, ते फलदायी असतात. ते अपयशाप्रमाणे आपल्याला पुढे जाण्यात मदत करतात. अपयश हा अडसर नाही तर तो पुढच्या वेळी यशस्वी होण्याची प्रेरणा देणारा प्रेरक घटक आहे,’ असे ते पुढे म्हणाले.
नागरी सेवा अधिकाऱ्यांनी डिजिटल दरी दूर करण्याचे काम करावे अशी विनंती करुन धनखड म्हणाले, ‘ग्रामीण भागात तंत्रज्ञानाचा स्वीकार होईल अशा प्रकारे नाविन्यपूर्ण आर्थिक रचना करुन डिजिटल भेद संपवण्यावर भर द्या. मंत्र्यांनी याला प्राधान्य दिल्याचे मला समाधान आहे. जगात सर्वाधिक तरुणांची संख्या असलेला देश, हे आपल्या लोकशाहीचे अख्ख्या जगाला हेवा वाटावा असे वैशिष्ट्य आहे. तुमच्या डिजिटल नवकल्पना, कौशल्य विकास व डिजिटल उद्योजकता याद्वारे या तरुण पिढीच्या हुशारीला चांगल्या संधी मिळवून देणाऱ्या असणे गरजेचे आहे.’
दूरसंवाद आणि ईशान्य प्रदेश विकास मंत्री ज्योतीरादित्य शिंदे, डिजिटल दूरसंवाद आयोगाचे वित्तविषयक सदस्य मनिष सिन्हा आणि अन्य मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते.
***
S.Kane/S.Joshi/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2084450)
Visitor Counter : 38