शिक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

महिला नेत्यांसाठी आयोजित एक दिवसीय कार्यशाळेचे धर्मेंद्र प्रधान यांनी केले उद्घाटन


एनईपी 2020 च्या दृष्टिकोनाला अनुसरून आयोजित ही कार्यशाळा शिक्षणाच्या प्रत्येक स्तरावर महिलांच्या सक्षमीकरणावर भर देते - धर्मेंद्र प्रधान

Posted On: 13 DEC 2024 2:24PM by PIB Mumbai

 

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज नवी दिल्ली येथे, विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) आयोजित केलेल्या ‘महिला नेतृत्व : विकसित भारत @ 2047 साठी शैक्षणिक उत्कृष्टतेला आकार देण्यात योगदान’ या एकदिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन केले.

Image

Image

Image

धर्मेंद्र प्रधान यांनी उपस्थितांना संबोधित करताना, ही कार्यशाळा, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या दृष्टिकोनानुसार, शिक्षणाच्या प्रत्येक स्तरावर महिलांच्या सक्षमीकरणावर कसा भर देते यावर प्रकाश टाकला. महिला उच्च शिक्षणात शैक्षणिक दर्जा कसा उंचावत आहेत हे दर्शविणे आणि त्यांना नेतृत्वाच्या भूमिकेसाठी सुसज्ज करणे आणि प्रेरित करणे हे कार्यशाळेचे उद्दिष्ट आहे, असे प्रधान यांनी नमूद केले.

नारी शक्ती हे सामर्थ्य, लवचिकता आणि आशेचे प्रतीक असून महिलांना आदराने वागवणे हे भारतीय संस्कृतीचे  अंगभूत मूल्य आहे, असेही ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करताना ते म्हणाले की, गेल्या 10 वर्षात  महिला विकासाकडून महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाकडे जाणारा परिवर्तनशील बदल घडवून आणण्यासाठी काम करणाऱ्या आघाडीचे नेतृत्व पंतप्रधानांनी केले आहे.

उदयोन्मुख नवीन जागतिक व्यवस्था ज्ञानाद्वारे चालविली जाईल आणि अशा काळात महिला आपल्या समोरील अनेक आव्हाने पार करत आहेत, स्त्री-पुरुष समानता रुजवत आहेत  आणि STEM सह सर्वच बाबतीत त्यांचा सहभाग वाढत आहे, असे त्यांनी सांगितले. सर्व क्षेत्रात महिलांसाठी समान संधी निर्माण करणे महत्त्वाचे आहे, असेही ते म्हणाले.  कार्यशाळेतील विचारमंथन, संवाद आणि अनुभवांचे आदानप्रदान  यामुळे यासाठी एक मार्गदर्शक आराखडा मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

व्यवस्था आणि जीवन निवडीसह निर्णयक्षम संरचना यामध्ये महिलांच्या सहभागाच्या  सुनिश्चितीसह  महिला सक्षमीकरणाचे भारतीय प्रारुप तयार केले पाहिजे यावर प्रधान यांनी भर दिला. विकसित भारताचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दिशेने आपण वाटचाल करत असताना नारी शक्ती अधिक निर्णयक्षमतेची भूमिका घेईल, असे ते म्हणाले. महिला समानता आणि सक्षमीकरणामुळेच आपला समाज आणि राष्ट्रही सक्षम बनू शकते, असे प्रधान म्हणाले.

***

S.Kakade/S.Mukhedkar/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2084214) Visitor Counter : 35