वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
भारत आणि युरोपीय संघ यांचे संतुलित, महत्त्वाकांक्षी आणि परस्परांना लाभदायी अशा मुक्त व्यापार कराराचे उद्दिष्ट : पीयूष गोयल
Posted On:
12 DEC 2024 9:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 डिसेंबर 2024
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी यूरोपियन आयोगातील ऑस्ट्रिया, बेल्जियम, बल्गेरिया, झेक प्रजासत्ताक, एस्टोनिया, इटली, आयर्लंड, लॅटिव्हिया, लिथुआनिया, माल्टा, पोलंड, पोर्तुगाल, रोमानिया, स्लोव्हाक प्रजासत्ताक, स्पेन आणि स्वीडन या देशांच्या राजदूतांच्या प्रतिनिधीमंडळाशी संवाद साधला. या बैठकीला वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री जितिन प्रसाद, वाणिज्य सचिव, डीपीआयआयटी सचिव आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
भारत आणि युरोपीय संघ यांच्यातील वाढता व्यापार आणि वाढत्या संबंधांबाबत बोलताना, भारत आणि युरोपीय संघ यांचे संतुलित, महत्त्वाकांक्षी आणि परस्परांना लाभदायी अशा मुक्त व्यापार कराराचे उद्दिष्ट असल्याचे, पीयूष गोयल यांनी सांगितले. मुक्त व्यापार करारासंदर्भातील चर्चेच्या 9 फेऱ्यांमध्ये व्यापक चर्चा झाली असून एकमेकांच्या संवेदनशीलता समजून घेत व्यावसायिकदृष्ट्या अर्थपूर्ण करारावर पोहोचण्यासाठी राजकीय दिशानिर्देश आवश्यक आहेत.
शाश्वततेच्या दृष्टीने कोणत्याही चर्चेत, सामायिक परंतु भिन्न जबाबदारी (CBDR) चे तत्त्व लक्षात घेऊन अशा उपाययोजनांची अंमलबजावणी करताना विकासाचे वेगवेगळे मार्ग विचारात घेतले पाहिजेत, असे गोयल यांनी अधोरेखित केले. भारतीय अर्थव्यवस्था दरवर्षी 7-8% दराने वाढून जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याची अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर, जलद आणि घातांकी वृद्धी भारताचा जीडीपी 2047 पर्यंत 35 ट्रिलियन अमेरिकी डॉलर्सच्या मैलाच्या टप्प्यावर नेण्यास साहाय्यभूत ठरेल.
भारताचा यूरोपीय संघासह वस्तूंमधील द्विपक्षीय व्यापार 2023-24 मध्ये 137.41 अब्ज अमेरिकी डॉलर्स राहिला असून वस्तूंसाठी यूरोपीय संघ भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार राहिला आहे. याखेरीज 2023 मध्ये भारत आणि यूरोपीय संघ यांच्यात सेवांमधील द्विपक्षीय व्यापार 51.45 अब्ज अमेरिकी डॉलर्स राहिल्याचा अंदाज आहे. यूरोपीय संघासोबत व्यापार करार भारताला त्याच्या वस्तू आणि सेवांच्या निर्यातीमध्ये अधिक विस्तार आणि वैविध्य आणण्यास मदत करेल आणि मूल्य साखळी सुरक्षित करेल. जागतिक व्यापार बाजारपेठेतील हिस्सा वाढवण्यासाठी भारत प्रमुख जागतिक अर्थव्यवस्थांसोबत संतुलित करार करण्याचा प्रयत्न करत आहे.
* * *
S.Tupe/S.Kakade/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2083987)