पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान 9 डिसेंबरला राजस्थान आणि हरियाणाच्या दौऱ्यावर


पंतप्रधान करणार रायझिंग राजस्थान जागतिक गुंतवणूकदार परिषद  2024चे उद्घाटन

पंतप्रधान आयुर्विमा महामंडळाच्या ‘विमा सखी योजनेचा’ आरंभ करणार

पंतप्रधानांच्या हस्ते होणार महाराणा प्रताप उद्यानविद्या विद्यापीठ, कर्नालच्या मुख्य परिसराचीही  पायाभरणी

Posted On: 08 DEC 2024 9:46AM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी 9 डिसेंबर रोजी राजस्थान आणि हरियाणाला भेट देणार आहेत. ते प्रथम जयपूरला जाणार असून सकाळी 10:30 वाजता त्यांच्या हस्ते जयपूर एक्झिबिशन अँड कन्व्हेन्शन सेंटर (JECC) येथे रायझिंग राजस्थान जागतिक गुंतवणूकदार परिषद 2024 चे उद्घाटन करण्यात येणार आहे. त्यानंतर पंतप्रधान पानिपतला जाणार असून दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ते एलआयसीच्या विमा सखी योजनेचा प्रारंभ तसेच महाराणा प्रताप उद्यानविद्या विद्यापीठाच्या मुख्य परिसराची पायाभरणी करणार आहेत.

पंतप्रधान जयपूर एक्झिबिशन अँड कन्व्हेन्शन सेंटर (JECC) येथे रायझिंग राजस्थान जागतिक गुंतवणूकदार परिषद 2024 आणि राजस्थान जागतिक व्यवसाय प्रदर्शन (ग्लोबल बिझनेस एक्सपो) चेही उद्घाटन करणार आहेत. या कार्यक्रमात ते उपस्थितांना संबोधितही करतील.

या वर्षी 9 ते 11 डिसेंबर या कालावधीत होणाऱ्या गुंतवणूक परिषदेची 'संपूर्ण, जबाबदार, सज्ज' अर्थात रिप्लिट, रिस्पॉन्सिबल, रेडी अशी  मध्यवर्ती संकल्पना आहे. या शिखर परिषदेत अन्य विषयांसोबतच जल सुरक्षा, पर्यावरणरक्षक खाणकाम, शाश्वत वित्त, सर्वसमावेशक पर्यटन, कृषी-व्यवसायातील नावीन्यपूर्णता आणि महिलांच्या नेतृत्वाखालील स्टार्टअप या विषयांवरील 12 विभागवार सत्रांचे आयोजन केले जाणार आहे. या परिषदेत सहभागी देशांसोबत 'राहण्यायोग्य शहरांचे पाणी व्यवस्थापन', 'उद्योग अष्टपैलुत्व - उत्पादन आणि पलीकडे' तसेच 'व्यापार आणि पर्यटन' यांसारख्या विषयांवर आठ देशीय सत्रे आयोजित केली जातील.

प्रवासी राजस्थानी महासंमेलन आणि एमएसएमई महासंमेलन देखील तीन दिवस चालणार आहेत. राजस्थान जागतिक व्यवसाय प्रदर्शनात (ग्लोबल बिझनेस एक्स्पोमध्ये) राजस्थान पॅव्हेलियन, कंट्री पॅव्हेलियन, स्टार्टअप्स पॅव्हेलियन यांसारखी संबंधित विषयांवर आधारित दालने असतील. 16 भागीदार देश आणि 20 आंतरराष्ट्रीय संस्थांसह 32 हून अधिक देश या शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत.”

पंतप्रधानांचा हरियाणा दौरा

महिला सक्षमीकरण आणि आर्थिक समावेशनाबद्दलच्या कटिबद्धतेच्या अनुषंगाने , पंतप्रधान पानिपतमध्ये 'बिमा सखी योजनेचा' प्रारंभ करणार आहेत. भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) चा हा उपक्रम 18-70 वयोगटातील दहावी उत्तीर्ण महिलांचे सक्षमीकरण करण्याच्यादृष्टीने तयार करण्यात आला आहे. आर्थिक साक्षरता आणि विम्याबद्दल जागरुकता वाढवण्यासाठी त्यांना पहिली तीन वर्षे विशेष प्रशिक्षण आणि प्रशिक्षणभत्ता दिला जाईल. प्रशिक्षणानंतर त्या एलआयसी एजंट म्हणून काम करू शकतील तर पदवीधर झालेल्या विमा सखींना एलआयसीमध्ये विकास अधिकारी या पदासाठी पात्र उमेदवार म्हणून संधी मिळेल. पंतप्रधानांच्या हस्ते होऊ घातलेल्या विमा सखींना नियुक्ती प्रमाणपत्रांचेही वितरण करण्यात येईल.

या कार्यक्रमात पंतप्रधानांच्या हस्ते  महाराणा प्रताप हॉर्टिकल्चरल युनिव्हर्सिटी, कर्नालच्या मुख्य परिसराचीही पायाभरणी केली जाणार आहे. यामध्ये 495 एकर जागेत 700 कोटी रुपयांहून अधिक खर्चासह मुख्य परिसर आणि सहा प्रादेशिक संशोधन केंद्रांची उभारणी करण्यात येणार आहे. या विद्यापीठात पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी एक उद्यानविद्या महाविद्यालय आणि 10 बागायतीशी संबंधित विषयांचा समावेश असलेल्या पाच शाळा असतील. विद्यापीठात उद्यानविद्या तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी पीक वैविध्यीकरण आणि जागतिक दर्जाच्या संशोधनाचे काम केले जाईल.

***

NM/M.Ganoo/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2082076) Visitor Counter : 65