आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

क्षयरोगाचा संसर्ग आणि त्यातून होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी.नड्डा यांनी पंचकुला(हरियाणा) येथे केला 100- दिवसीय वेगवान राष्ट्रव्यापी मोहिमेचा प्रारंभ


देशभरातील सर्वाधिक क्षयबाधित अशा 347 जिल्ह्यांमध्ये त्वरित निदान आणि रुग्णांवर जलद उपचार करण्यासाठी शंभर दिवसांची विशेष मोहीम

"देशाभरातील 1.7 लाख आयुष्मान आरोग्य मंदिरांच्या नेटवर्कच्या बळावर आज क्षयरोगाचे लवकर निदान होऊ शकते आहे"- जे पी नड्डा

"औषध-संवेदी क्षयावर उपाय करण्यासाठी नवीन लघु-अवधी आणि अधिक प्रभावी अशा पथ्यकर उपायांचा समावेश असलेले दैनंदिन पथ्योपाय केंद्र सरकारने घालून दिले, परिणामी क्षयावरील उपचारांच्या यशाचा दर 87% पर्यंत सुधारला"

1.17 कोटी क्षयरुग्णांना थेट लाभ हस्तांतरणाद्वारे 3,338 कोटी रुपयांचे नि-क्षय साहाय्य  प्रदान करण्यात आले आहे

"क्षयरोगात घट होण्याचा भारतातील दर 2015 मधील 8.3% वरून दुप्पट होऊन आज 17.7% पर्यंत पोहोचला आहे आणि हे प्रमाण जागतिक सरासरीपेक्षा कितीतरी अधिक आहे. क्षयामुळे भारतात होणाऱ्या मृत्यूंची संख्याही गेल्या दहा वर्षात 21.4% नी कमी झाली आहे."

Posted On: 07 DEC 2024 3:33PM by PIB Mumbai

 

क्षयरोग निर्मूलनासाठीच्या भारताचा प्रयत्नांमध्ये आज महत्त्वाचा टप्पा गाठला गेला. हरियाणामध्ये पंचकुला येथे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री जे.पी.नड्डा यांनी, 100 दिवसीय क्षयरोग निर्मूलन मोहिमेचा प्रारंभ केला.  केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव आणि अनुप्रिया पटेल यांनीही दूरदृश्य माध्यमातून कार्यक्रमात भाग घेतला. देशातील 347 जिल्ह्यांतील यापूर्वी हेरले न गेलेले क्षयाचे रुग्ण शोधून त्यांच्यावर उपचार करणे असे या मोहिमेचे उद्दिष्ट असून क्षयाने होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येत लक्षणीय घट करण्यासाठी उच्च-जोखीम गटांवर यात विशेष भर दिला जाणार आहे.

यावेळी बोलताना केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी, क्षयरोगाचा नायनाट करण्यासाठी सरकारची अविचल वचनबद्धता अधोरेखित केली. क्षय मुक्त भारताचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या प्रयत्नांना नवी गती देण्यासाठी ही मोहीम उघडल्याचे त्यांनी सांगितले. ही शंभर दिवसांची लक्ष्यकेंद्री मोहीम असल्याचेही त्यांनी नमूद केले. सर्वाधिक बाधित अशा 347 जिल्ह्यांमध्ये क्षयरोगाचे रुग्ण लवकर  हेरणे यासाठी प्रयत्न केले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.

क्षयरोगाशी दोन हात करताना देशाने दीर्घकाळपासून दिलेल्या लढ्यावर नड्डा यांनी प्रकाश टाकला. "एकेकाळी क्षयरोग म्हणजेच 'संथगतीने येणारा मृत्यूच' असे मानले जाई आणि क्षय झालेल्या व्यक्तीच्या  कुटुंबीयांनाही प्रसार रोखण्याच्या दृष्टीने वेगळे ठेवले जाई. 1962 पासून क्षयाविरोधात अनेक मोहिमा चालवल्या गेल्या परंतु, 2018 मध्ये माननीय पंतप्रधानांनी, शाश्वत विकासोद्दिष्टांच्या 2030 मधील मुदतीपूर्वीच क्षयरोगाचे निर्मूलन करण्याचे ध्येय समोर ठेवले."

क्षयरोग सेवा रुग्णांसाठी अनुकूल आणि विकेंद्रित करण्यासाठी अनेक नवीन धोरणे आखण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिली. देशभरातील 1.7  लाख आयुष्मान आरोग्य मंदिरांच्या नेटवर्कमुळे आज क्षयरोगाचे  लवकर निदान करणे, शक्य झाले आहे , असे त्यांनी नमूद केले. 2014 मधील 120 प्रयोगशाळांच्या संख्येवरून आज 8,293 प्रयोगशाळांपर्यंत वाढ करून सरकारने निदान सेवांमध्ये लक्षणीय वाढ केली आहे, असेही त्यांनी अधोरेखित केले. “केंद्र सरकारने औषध-संवेदी क्षयावर उपाय करण्यासाठी नवीन लघु-अवधी आणि अधिक प्रभावी अशा पथ्यकर उपायांचा समावेश असलेले दैनंदिन पथ्योपाय केंद्र सरकारने घालून दिले, परिणामी क्षयरोग उपचार यशस्वी होण्याचा  दर 87% पर्यंत वाढला  आहे,” असे त्यांनी सांगितले. 

3,338 कोटी रुपयांचे नि-क्षय आर्थिक सहकार्य 1.17 कोटी क्षयरोग रुग्णांना थेट लाभ हस्तांतरणाद्वारे प्रदान केले गेले असल्याचे नड्डा यांनी  सांगितले.   सरकारने अलीकडेच नि-क्षय पोषण  रक्कम  500 वरून वाढवली असून 1000 रुपये  केली आहे. याशिवाय क्षयरूग्णांसाठी पोषण आणि शक्तीवर्धक औषधांची भर यात घालण्यात आली  आहे.

सरकारने आता खासगी व्यावसायिकांनाही क्षयरोगाच्या कोणत्याही नवीन रुग्णांबाबत  सूचित करणे बंधनकारक केले आहे जेणेकरून त्यांच्या उपचारांचा तात्काळ पाठपुरावा करता येईल असे नड्डा यांनी सांगितले.   "हे एक लहान पाऊल वाटू शकते परंतु यामुळे खाजगी क्षेत्रातील क्षयरोगाचे  रुग्ण सूचित करण्याचे प्रमाण 8 पटीने वाढले आहे", असे ते म्हणाले.

भारतातील क्षयरोग घटण्याचे प्रमाण 2015 मधील 8.3% वरून दुप्पट होऊन आज 17.7% झाले आहे जे जागतिक सरासरीपेक्षा खूप पुढे आहे, असेही त्यांनी अधोरेखित केले. गेल्या 10 वर्षात भारतात क्षयरोगामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये 21.4% ने लक्षणीय घट झाल्याचेही त्यांनी सांगितले.

केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी आपल्या भाषणाच्या समारोपात सर्व संबंधितांना क्षयरोग संपुष्टात आणण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करण्यासाठी प्रोत्साहित केले.

कार्यक्रमादरम्याननड्डा यांनी औषधांना न जुमानणाऱ्या क्षयावरील  नवीन  पथ्ये, BPaLM च्या अंमलबजावणीसाठी राष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वांचे अनावरण केले. ही मार्गदर्शक तत्त्वे या प्रगत उपचारांच्या अंमलबजावणी प्रमाणीकरण आणि सुव्यवस्थित करण्यासाठी आखण्यात आली  आहेतयाशिवाय, त्यांनी विविध प्रादेशिक भाषांमध्ये सर्वसमावेशक संकल्पना आणि माहिती, शिक्षण आणि दळणवळण संसाधनांसह मोहीम साहित्याचे अनावरण केले. केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी टीबी चॅम्पियन्स आणि नि-क्षय मित्रांचाही सन्मान केला आणि कार्यक्रमादरम्यान फूडबास्केटचे वाटप केले. " मोबाईल व्हॅन - नि-क्षय वाहन" देखील आज हरियाणातून सुरू करण्यात आले.   या फिरत्या व्हॅन  देशभरातील रुग्णांना शोधून त्यांच्यावर उपचार करू शकतील .

***

S.Kakade/J.Waishampayan/H.Kulkarni/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2082001) Visitor Counter : 33