नौवहन मंत्रालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तनकारी दशकाने ईशान्य भारतात नवे चैतन्य निर्माण केले : केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल
Posted On:
06 DEC 2024 5:31PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 डिसेंबर 2024
केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी ईशान्य प्रदेशात नवचैतन्य पुनरुज्जीवित करण्याच्या राजकीय रणनीतीचा भाग म्हणून सुशासन आणि विकासात्मक राजकारणाच्या महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करण्याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले आहे.मोदी सरकारच्या शासनाच्या परिवर्तनकारी दशकाने ईशान्य भारतात कशी नवीन ऊर्जा निर्माण केली हे ईशान्येकडील या ज्येष्ठ नेत्याने अधोरेखित केले .देशाला आत्मनिर्भर बनवण्याच्या दिशेने प्रयत्नासाठी विकासाच्या इंजिनला बळ देणे हे यामागचे उद्दिष्ट आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील रालोआ सरकारची महत्त्वपूर्ण कामगिरी अधोरेखित करण्यासाठी पत्रकारांना संबोधित करताना,केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल म्हणाले,“आमच्या ईशान्येकडील सुंदर प्रदेशाला निसर्गाचे मोठे वरदान लाभले आहे, परंतु रालोआ सत्तेत येईपर्यंत आधीच्या सरकारांनी फार काळ त्याकडे दुर्लक्ष केले .
या प्रदेशातील काही प्रमुख विकासाचा ठळकपणे उल्लेख करताना केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील रालोआ सरकारसाठी ईशान्य प्रदेश हे प्राधान्य राहिले आहे. वर्ष 2014 पासून, या प्रदेशाला अर्थसंकल्पीय तरतुदीत 300% पेक्षा जास्त निधी मिळाला आहे. 2014 मधील 36,108 कोटी रुपयांच्या तुलनेत आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये या प्रदेशासाठी 94,680 कोटी रुपये अर्थसंकल्पीय तरतुद करण्यात आली. पायाभूत सुविधांच्या बाबतीत, राष्ट्रीय महामार्गांच्या विस्तारात 28% ची उल्लेखनीय वाढ नोंदली गेली आहे. 2014 पर्यंत, प्रदेशात 80 राष्ट्रीय महामार्ग होते, 2023 पर्यंत ही संख्या वाढून 103 वर पोहचली. पायाभूत विकास योजनेच्या खर्चात 94 कोटींवरून 2,491 कोटी रुपये म्हणजेच 26 पट इतकी लक्षणीय वाढ झाली आहे.
या प्रदेशात दरवर्षी 193 किमी पेक्षा जास्त लांबीचे लोहमार्ग बसवले जात असल्यामुळे या प्रदेशातील दळणवळणात सुधारणा होऊन,रेल्वेचा विस्तार झाला आहे. या प्रदेशासाठी रेल्वेच्या अर्थसंकल्पीय तरतुदीत 370%.ने वाढ झाली आहे. या प्रदेशातील ब्रॉड गेजचे 100 टक्के विद्युतीकरण देखील आम्ही साध्य केले आहे. काँग्रेसच्या 60 वर्षांच्या शासनकाळात या प्रदेशात परिचालन सुरू असलेले केवळ 9 विमानतळ होते. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका दशकापेक्षाही कमी कार्यकाळात या प्रदेशात आता परिचालन सुरू असलेले 17 विमानतळ आहेत. परिणामी या प्रदेशातील जनतेने हवाई वाहतूक क्षेत्राला मोठी चालना दिली असून दर आठवड्याच्या उड्डाणांमध्ये 113 टक्के वाढ नोंदवली आहे. कल्याणकारी योजनांचा विचार करायचा झाला तर या प्रदेशातील अतिदूरवरच्या कोपऱ्यात असलेल्या 7000 पेक्षा जास्त गावांमध्ये पाईपद्वारे पिण्याच्या पाण्याची उपलब्धता आहे. या दशकात या प्रदेशात विद्यापीठांच्या संख्येतही 39% इतकी भरीव वाढ झाली आहे. सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने, 1.55 लाख हेक्टरपेक्षा जास्त जमीन सेंद्रीय शेतीसाठी वापरली जाते. 4,016 किमी पेक्षा जास्त रस्ते प्रकल्प चालू आहेत तर 4G संपर्कव्यवस्था ईशान्येच्या जवळजवळ सर्व भागांपर्यंत पोहोचली आहे.
जलमार्गांच्या पुनरुज्जीवनावर झालेल्या कामांना अधोरेखित करत केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल म्हणाले, “ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या द्रष्ट्या नेतृत्वाखाली आम्हाला भारत-बांगलादेश प्रोटोकॉल रुट(IBPR) च्या माध्यमातून या मार्गाचे पुनरुज्जीवन करणे शक्य झाले आहे, ज्यामुळे बांगलादेश, भूतान आणि नेपाळ या शेजारी देशांसाठी व्यापार सुलभ होण्यासह जागतिक बाजारपेठ उपलब्ध होऊन या प्रदेशातील व्यापार वाढीला लागला आहे.”
सोनोवाल पुढे म्हणाले,“ आज या प्रदेशामधील खेळाडू आघाडीच्या जागतिक स्पर्धांमध्ये सहभागी होऊ शकत आहेत आणि देशासाठी गौरव प्राप्त करत आहेत. हे सर्व मोदी सरकारच्या सुशासनाच्या आणि विकासाच्या दशकामुळेच शक्य झाले आहे. ”
S.Kakade/S.Kane/S.Patil/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2081561)
Visitor Counter : 34