पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान भुवनेश्वर येथे 30 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर या कालावधीत होणाऱ्या अखिल भारतीय पोलीस महासंचालक/महानिरीक्षकांच्या परिषदेला पंतप्रधान राहणार उपस्थित
दहशतवादाला प्रतिबंध, डाव्या विचारसरणीचा अतिरेक, तटीय सुरक्षा यासह राष्ट्रीय सुरक्षेच्या महत्त्वपूर्ण बाबींवर चर्चा होणार
पोलिसिंग आणि अंतर्गत सुरक्षा प्रकरणांशी संबंधित अद्ययावत पद्धती व प्रक्रिया यावरही चर्चा होणार
Posted On:
29 NOV 2024 9:54AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 30 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर 2024 या कालावधीत ओडिशा येथे आयोजित अखिल भारतीय पोलीस महासंचालक/महानिरीक्षक परिषद 2024 ला उपस्थित राहणार आहेत. भुवनेश्वरमधील लोकसेवा भवनातील राज्य संमेलन केंद्रात या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर परिषद ही दिनांक 29 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर 2024 अशी तीन दिवस चालणार असून यामध्ये नवीन फौजदारी कायदे, दहशतवादाला प्रतिबंध, डाव्या विचारसरणीचा अतिरेक, तटीय सुरक्षा, अंमली पदार्थाची तस्करी रोखणे, यासह राष्ट्रीय सुरक्षेच्या महत्त्वपूर्ण बाबींवर चर्चा होणार आहे. यासोबतच पोलीस सेवेतील उल्लेखनीय सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदकही या परिषदेदरम्यान प्रदान करण्यात येणार आहे.
देशभरातल्या वरिष्ठ पोलिसांना आणि सुरक्षा प्रशासकांना राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित विविध मुद्द्यांवर तसेच संचालन, पायाभूत सुविधा आणि पोलीस कल्याणविषयक विविध बाबींवर, भेडसावणाऱ्या अडचणींवर मुक्तपणे चर्चा करण्यासाठी एक संवादी व्यासपीठ, ही परिषद पुरवेल. अंतर्गत सुरक्षा धोक्यांसह, गुन्हेगारी नियंत्रण व कायदा आणि सुव्यवस्था संबंधित आव्हानांना सामोरे जाण्यासाठी व्यावसायिक पद्धती आणि प्रक्रियांचे सुसूत्रीकरण आणि सामायिकीकरण यासाठी ही चर्चा उपयुक्त ठरेल.
या परिषदेसाठी पंतप्रधान कायम उत्सुक असतात. पंतप्रधान अत्यंत बारकाईने ही चर्चा ऐकतात, त्याचसोबत ते नव्या कल्पना पुढे याव्यात यासाठी अनौपचारिक आणि मुक्त वातावरणातल्या चर्चेला प्रोत्साहनही देतात. यावर्षी काही वैशिष्ट्यपूर्ण बाबी या परिषदेत समाविष्ट करण्यात आल्या आहेत. संपूर्ण दिवसाचे प्रभावी नियोजन करण्यात आले असून सुरुवात योग सत्राने होईल. कामकाज सत्र, सादरीकरण, चर्चा, कार्यशीलता सत्र, संकल्पना आधारित भोजन सत्र , अशी या परिषदेची वैशिष्ट्ये आहेत. देशाला प्रभावित करणाऱ्या क्रिटिकल पोलिसिंग आणि अंतर्गत सुरक्षेच्या बाबींवर, पंतप्रधानांसमोर आपले दृष्टिकोन आणि सूचना मांडण्याची मौल्यवान संधी यामुळे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना मिळेल.
वार्षिक पोलीस महासंचालक/महानिरीक्षक परिषद देशातल्या विविध ठिकाणी व्हावी, यासाठी वर्ष 2014पासून पंतप्रधानांनी प्रोत्साहन दिले आहे. तेव्हापासून गुवाहाटी (आसाम), कच्छचे रण (गुजरात), हैदराबाद (तेलंगणा), टेकनपूर (ग्वाल्हेर, मध्य प्रदेश), स्टॅच्यू ऑफ युनिटी (केवडिया, गुजरात), पुणे (महाराष्ट्र), लखनौ (उत्तर प्रदेश), नवी दिल्ली आणि जयपूर (राजस्थान) येथे ही परिषद आयोजित करण्यात आली आहे. ही परंपरा पुढे चालू ठेवत, भुवनेश्वर (ओडिशा) येथे 59 वी पोलीस महासंचालक/महानिरीक्षक परिषद 2024 आयोजित केली जात आहे.
या परिषदेला केंद्रीय गृहमंत्री, पंतप्रधानांचे प्रधान सचिव, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, गृह राज्यमंत्री, राज्ये/केंद्रशासित प्रदेशांचे पोलीस महासंचालक आणि केंद्रीय पोलीस संघटनांचे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
***
HarshalA/SonaliK/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2078939)
Visitor Counter : 19