माहिती आणि प्रसारण मंत्रालय
iffi banner
1 0

नामवंत ऑस्ट्रेलियन दिग्दर्शक फिलिप नॉय्स यांचा सिनेमॅटिक वारशाच्या संवर्धनाबद्दल सत्यजीत रे जीवनगौरव पुरस्काराने सन्मान


“भारतीय प्रेक्षकांची सर दुसऱ्या कोणालाही येणार नाही”, भारतीय सिनेमाचा जागतिक प्रभाव अधोरेखित करत फिलिप नॉय्स यांची प्रशंसा

सिनेमाचे भवितव्य सत्यजीत रे यांच्या तत्वज्ञानात आहेः कमी असूनही जास्त आहे, चित्रपट लहान असले तरी चालतील, संकल्पना भव्य असाव्यातः नॉय्स

#IFFIWood, 28 November 2024

गोव्यामध्ये 54 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (इफ्फी 2024) समारोप समारंभात आज नामवंत ऑस्ट्रेलियन दिग्दर्शक फिलिप नॉय्स यांचा त्यांच्या चित्रपटातील उल्लेखनीय कारकिर्दीबद्दल प्रतिष्ठेचा सत्यजीत रे जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर आपले मनोगत व्यक्त करताना या दिग्गज चित्रपट निर्मात्याने 1978 मध्ये मुंबईत चित्रपट पाहताना आलेल्या अनुभवाची आठवण सांगत भारतीय प्रेक्षकांना मनापासून अभिवादन केले. 

अतिशय वेगळाच असा तो अनुभव होता. जणू काही मी पहिल्यांदाच चित्रपट पाहतोय असे वाटू लागले होते. भारतीय प्रेक्षक इतर प्रेक्षकांप्रमाणे नाहीत तर जणू काही ते चित्रपटाचाच एक भाग आहेत, असे मानून त्यातील भाव-भावनांमध्ये आकंठ बुडून जातात, भारतीय प्रेक्षकांची सर कोणालाच येणार नाही.”, असे नॉय्स यांनी सांगितले. भारतीय सिनेमाच्या प्रचंड मोठ्या प्रमाणावरील प्रभावाचा दाखला देताना ते म्हणाले की दर वर्षी भारतात जगातील सर्वाधिक चित्रपट तयार होतात.

महान चित्रपट निर्माते सत्यजीत रे यांचे स्मरण करताना नॉय्स यांनी सांगितले, “ ऑस्ट्रेलियात लहानाचे मोठे होत असताना आम्ही सर्वजण सत्यजीत रे यांच्या कामामुळे प्रेरित झालो.त्यांच्या दृष्टीकोनाचा वापर मी माझ्या कामात, विशेषतः भूमिकेसाठी कलाकार निवडताना केला आहे. रे यांच्याप्रमाणेच ज्यावेळी मला माझ्या चित्रपटांसाठी अस्सल ऑस्ट्रेलियन कलाकार सापडत नसायचे, त्यावेळी मी त्या भूमिकांमध्ये चपखल बसतील अशा प्रकारे सर्वसामान्य लोकांना त्या भूमिकांसाठी निवडायचो.”

रे यांच्याविषयी आणखी जास्त कृतज्ञता व्यक्त करताना ते म्हणाले, “ ऑस्ट्रेलियन सिनेमाच्या विश्वात आमच्यासारखे चित्रपट निर्माते सत्यजीत रे यांचे अतिशय ऋणी आहेत. कोणत्याही पुरस्कारापेक्षाही ते कितीतरी जास्त आहे. त्यांचा प्रभाव नेहमीच आम्हाला मार्गदर्शन करेल आणि प्रेरणा देईल.”

सिनेमाच्या भवितव्याविषयी बोलताना, नॉय्स यांनी चित्रपट निर्मितीच्या उदयोन्मुख स्वरुपाविषयीचे त्यांचे विचार सामाईक केले. “आपण पुन्हा एकदा सत्यजित रे यांच्या, कमी म्हणजेच जास्तया सिनेमॅटिक तत्वज्ञानाकडे वळायलाच हवे. तत्वज्ञानाची उत्क्रांती होत असताना आपलीही व्हायला हवी. मग चित्रपट लहान होतील आणि संकल्पना भव्य होतील. मला वाटते की हेच सिनेमाचे भवितव्य आहे”, त्यांनी नमूद केले.

यावेळी नॉय्स यांनी इफ्फी महोत्सव संचालक शेखर कपूर यांनी जागतिक सिनेमामध्ये दिलेल्या असामान्य योगदाना बद्दल त्यांची प्रशंसा केली आणि ते जगभरातील चित्रपट निर्मात्यांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्व असल्याचे सांगितले.

 

फिलिप नॉय्स हे अतिशय नामवंत आणि प्रतिभासंपन्न दिग्दर्शक आहेत. त्यांच्या असामान्य कथाकथन कौशल्यासाठी आणि गूढ, सांस्कृतिक नादमय चित्रपटांच्या निर्मितीमधील प्रभुत्वासाठी ते ओळखले जातात. पॅट्रियॉट गेम्स, क्लिअर अँड प्रेझेंट डेन्जर, सॉल्ट, द सेंट, द बोन कलेक्टर आणि इतर अनेक चित्रपटांचा त्यांच्या फिल्मोग्राफीत समावेश आहे. हॅरिसन फोर्ड, निकोल किडमन, ऍन्जेलिना जोली, डेंझेल वॉशिंग्टन आणि मायकेल केन यांसारख्या नामवंत कलाकारांसोबत त्यांनी केलेल्या चित्रपटांनी सिनेमाविश्वात अमीट ठसा उमटवला आहे.

***

PIB IFFI CAST AND CREWGopal/Shailesh/Parshuram

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

iffi reel

(Release ID: 2078800) Visitor Counter : 12


Read this release in: English , Urdu , Konkani