माहिती आणि प्रसारण मंत्रालय
'आदुजीविथम’ हा जगण्याचा संघर्ष आणि आशेचा प्रेरणादायी घटनाक्रम असून, इफ्फी (IFFI) मध्ये मिळालेल्या उदंड प्रतिसादाबद्दल कृतज्ञता आहे: दिग्दर्शक ब्लेसी
‘थनुप्’ आधुनिक युगातील जोडप्यांमधील वंध्यत्वाच्या समस्येचा शोध घेतो: संपादक सफदर मर्वा
#IFFIWood, 28 November 2024
ही एक चिवट आणि आणि दुर्दम्य आशावादाची प्रेरणादायी कथा आहे, जी केरळच्या एका खेड्यामधील साध्या जीवनापासून सुरु होते आणि दूरवरच्या देशात गुलामगिरीशी झुंजत टिकाव धरून राहण्यासाठी कराव्या लागलेल्या तडजोडींचे चित्रण करते. तर दुसरी कथा जीवनशैलीतील बदल, आणि हवामान बदलांमुळे आजच्या तरुण जोडप्यांना भेडसावणाऱ्या वंध्यत्वासारख्या गहन सामाजिक समस्येचा वेध घेते. गोव्यामधील 55 व्या इफ्फी (IFFI), अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आदुजीविथम आणि थनुप, या दोन उल्लेखनीय मल्याळम चित्रपटांनी प्रेक्षकांना भुरळ घातली.
महोत्सवात आज आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दोन्ही चित्रपटांचे कलाकार आणि क्रू सदस्यांनी माध्यमांना संबोधित केले, आणि हे चित्रपट बनवण्याची सृजनशील प्रक्रिया आणि बारकावे, याबद्दलचा आपला दृष्टीकोन उपस्थितांसमोर उलगडला.
आदुजीविथम: जगण्याची आणि आशेची कथा
सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते ब्लेसी यांनी दिग्दर्शित केलेली, आदुजीविथम ही बेन्यामिन यांच्या सर्वाधिक विकल्या गेलेल्या कादंबरीवर आधारित, जगण्यासाठी दिलेल्या कडव्या झुंजीची कथा आहे. हा चित्रपट नजीबची कथा सांगतो, जो केरळमध्ये आपल्या कुटुंबाला मागे सोडून चांगल्या जीवनाच्या शोधात मध्यपूर्वेत जातो, आणि तिथे गेल्यावर त्याची फसवणूक होते, आणि तो एका बकऱ्यांच्या फार्ममध्ये गुलामगिरीत अडकतो. ओळख हिरावून घेतलेला नजीब, आपले अस्तित्व जपण्यासाठी सर्व अडचणींशी लढतो. शेतातल्या शेळ्या आणि उंटांबरोबरच्या जिव्हाळ्याच्या नात्यातून मानसिक बळ मिळवतो.
उपस्थितांना संबोधित करताना, ब्लेसी यांनी त्यांच्यावर कथेने पाडलेल्या प्रभावा बद्दल सांगितले. अकल्पनीय हाल अपेष्टा सहन करणाऱ्या नजीबची कहाणी, अनेक जणांच्या संघर्षांचे प्रतिबिंब असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. इफ्फी (IFFI) मध्ये चित्रपटाला मिळालेल्या उदंड प्रतिसादाबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आणि ही कथा केवळ जगण्याची नसून, आशेची असल्याचे सांगितले.
मध्यवर्ती पात्रांपैकी एक, ‘हकीम’ ची भूमिका करणाऱ्या गोकुळ के.आर यांनी या भूमिकेसाठी आवश्यक अमुलाग्र शारीरिक आणि मानसिक परिवर्तन घडवताना आलेला अनुभव सांगितला.
“चित्रपटातील या भूमिकेसाठी पूर्णपणे झोकून देणे आवश्यक होते, कारण चित्रपटात माझे पात्र आणि नजीब दोघेही अपार दुःख सहन करतात. या अडचणींचे चित्रण करणे, हे एक आव्हान होते, पण चित्रपटाच्या सत्यतेसाठी ते आवश्यक होते,” त्याने स्पष्ट केले.
थनुप: वंध्यत्व आणि सामाजिक वगळलेपण
रागेश नारायणन दिग्दर्शित थनुप् हा चित्रपट, बदलती जीवनशैली आणि पर्यावरणाशी निगडीत घटकांमुळे आधुनिक जोडप्यांमध्ये वाढत असलेल्या वंध्यत्वाच्या गंभीर समस्येचा वेध घेतो.
एका निसर्गरम्य गावात राहणाऱ्या प्रधीश आणि ट्रीसा या तरुण जोडप्याच्या संघर्षावर हा चित्रपट आहे. आपल्या वंध्यत्वामागची कारणे शोधण्याचा प्रयत्न करणाऱ्या या जोडप्याचे जीवन, चुगलखोरी, अटकळी आणि त्यांच्या खासगीपणात बाधा घालणारा त्यांच्या आजूबाजूचा समाज, यामुळे गुंतागुंतीचे झाले आहे.
चित्रपटाचे दिग्दर्शक सफदर मर्वा यांनी स्पष्ट केले, की हा चित्रपट एका सामाजिक समस्येचा धाडसी शोध आहे, जी अनेकदा लपवली जाते. “वंध्यत्व ही एक पूर्णतः वैयक्तिक आणि संवेदनशील समस्या आहे, ज्याचा अनेक जोडप्यांना सामना करावा लागतो. थनुप मध्ये, जीवनशैलीतील बदल आणि हवामानामधील बदलांचा लोकांच्या जीवनावर कसा परिणाम होऊ शकतो, हे दाखवून आम्ही हे वास्तव प्रकाशात आणले आहे. ही केवळ एक कथा नसून, सहवेदना आणि समजूतदारपणाचे आवाहन आहे,” ते म्हणाले. हा चित्रपट आपल्या एका मित्राच्या जीवनातील सत्य कथेवर आधारित असल्याचे मर्वा म्हणाले.
मनाची पकड घेणारे चित्रपटाचे कथानक, जोडप्याने अनुभवलेला भावनिक गोंधळ, तसेच त्यांच्या संघर्षाला आणखी गुंतागुंतीचा करणारा सामाजिक दबाव, याचे वास्तववादी चित्रण प्रेक्षकांवर प्रभाव पाडते.
चित्रपटाबद्दल
THE GOAT LIFE (आदुजीवितम)
भारत | 2023 | मल्याळम | 172 ‘ | रंगीत
सारांश
आदुजीविथम हा चित्रपट, बेन्यामीन यांच्या याच नावाच्या कादंबरीवर आधारित असून, नजीब या मध्यवर्ती पात्राचा जीवन संघर्ष सादर करतो. चांगल्या जीवनाचा शोध घेण्यासाठी तो आपल्या कुटुंबाला केरळमध्ये मागे सोडून, मध्यपूर्वेत जातो. तिघे गेल्यावर आपली फसवणूक झाल्याचे त्याला समजते. चांगले जीवन मिळण्याऐवजी, आशा आणि ओळख गमावून, त्याला शेळ्यांच्या फार्मवर कठोर परिश्रम करणे भाग पडते. ही हृदय पिळवटून टाकणारी कथा, आपल्या कुटुंबापासून दूर, परक्या देशात कठीण परिस्थितीशी झुंजून जगण्यासाठी त्याने केलेल्या संघर्षाचे चित्रण करते. शेळ्या आणि उंटांबरोबरच्या अनोख्या बंधातून नजीब आपली जगण्याची ऊर्जा जिवंत ठेवतो. तीन वर्षांनंतर, तो अनपेक्षितपणे मिळालेल्या मदतीचा आधार घेऊन या भयंकर परिस्थितीतून बाहेर पडतो, एका माणसाची दुर्दशा सांगणारी ही कथा नजीब सारख्या अनेक जणांचा संघर्ष प्रतिबिंबित करते.
कलाकार आणि क्रू सदस्य
दिग्दर्शक: ब्लेसी
निर्माता: व्हिज्युअल रोमान्स
सिनेमॅटोग्राफर: सुनील के. एस.
संपादक: ए. श्रीकर प्रसाद
पटकथा: ब्लेसी
कलाकार: पृथ्वीराज सुकुमारन, के.आर. गोकुळ, अमला पॉल, जिमी जीन-लुईस, शोभा मोहन, तालिब अल बालुशी, रिक अबी
पत्रकार परिषद येथे पहा:
थनुप्प
रंगीत | 109 मिनिटे | मल्याळम | 2023
सारांश
थनुप्पमध्ये, प्रधीश आणि ट्रीसा हे तरुण जोडपे एका निसर्गरम्य गावात स्थायिक झाले आहेत आणि नदीबद्दल वारंवार प्रश्न उपस्थित करून ते संशय व्यक्त करतात. प्रधीशचे ट्रीसा बरोबरचे खासगी क्षण गावकरी खोडकरपणे टिपतात. तो लीक झालेला व्हिडिओ त्यांना गाव सोडून जायला भाग पाडतो आणि त्यांचा मित्र प्रकाशन, मदतीसाठी संतोषला बोलावतो. संतोषन या जोडप्याबद्दल एक धक्कादायक सत्य उलगडून सांगतो, जे सर्वांना थक्क करते. हा चित्रपट सामाजिक समस्या अतूट बांधिलकीने संबोधित करतो, त्याच वेळी खासगीपणाचा भंग आणि समाजाच्या अटकळी, याच्या परिणामांचा शोध घेतो.
कलाकार आणि क्रू सदस्य
दिग्दर्शक: रागेश नारायणन
निर्माता: काशी सिनेमाज
सिनेमॅटोग्राफर: मणिकंदन पी एस
संपादकः सफदर मर्वा
पटकथा लेखक: रागेश नारायणन
कलाकार: निधीश, जिबिया
पत्रकार परिषद येथे पहा:
***
G.Chippalkatti/R.Agashe/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2078792)
Visitor Counter : 12