संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

लष्करी तसेच लष्कर संबंधित तंत्रज्ञानविषयक सहकार्याशी संबंधित भारत-रशिया आंतर-सरकारी आयोगाच्या अधिपत्याखालील लष्करी सहकार्यविषयक कृती गटाची चौथी बैठक मॉस्को येथे संपन्न

Posted On: 28 NOV 2024 9:20AM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 28 नोव्हेंबर 2024

रशियात मॉस्को येथे आयोजित लष्करी तसेच लष्कर संबंधित तंत्रज्ञानविषयक सहकार्याशी संबंधित भारत-रशिया आंतर सरकारी आयोगाच्या (आयआरआयजीसी-एम अँड एमटीसी)अधिपत्याखालील लष्करी सहकार्यविषयक कृती गटाच्या चौथ्या बैठकीचा आज यशस्वीरित्या समारोप झाला.

एकात्मिक संरक्षण दल प्रमुख लेफ्टनंट जनरल जे.पी.मॅथ्यू यांनी भारतातर्फे तर रशियाच्या सशस्त्र दलांच्या मुख्य परिचालनविषयक संचालनालयाचे उप प्रमुख लेफ्टनंट जनरल डिलेस्की इगोर निकोलेविक यांनी रशियातर्फे या बैठकीचे सहअध्यक्षपद सांभाळले. धोरणात्मक स्वारस्याच्या क्षेत्रांमध्ये निरंतर माहितीचे सामायीकीकरण आणि सहकार्य याच्या महत्त्वावर कृती गटाच्या सदस्यांनी अधिक भर दिला.

दोन्ही देशांच्या सैन्यदलांमध्ये परिचालनविषयक समन्वय अधिक दृढ करण्यासाठी संयुक्त सराव कार्यक्रमांचा अधिक विस्तार करण्यावर या गटाने सहमती दर्शवली. भारत आणि रशियाने जमीन, आकाश आणि समुद्र अशा तिन्ही ठिकाणी अनेक संयुक्त सराव कार्यक्रम आयोजित केले आहेत. इंद्र, अव्हिया इंद्र आणि इन्फ्रा नेव्ही असे विविध अभ्यास संयुक्त परिचालनविषयक रणनीती तंत्रांच्या कवायती आणि पद्धती यामध्ये अधिक सफाई आणून परस्पर सामंजस्य अधिक दृढ करण्यासाठीचे महत्त्वाचे मंच म्हणून उपयुक्त ठरले आहेत.

वर्ष 2000 मध्ये भारत-रशिया धोरणात्मक भागीदारी संदर्भातील घोषणापत्रावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. नंतरच्या काळात या भागीदारीची पातळी उंचावून 2010 मध्ये तिला विशेष आणि विशेषाधिकारयुक्त धोरणात्मक भागीदारीचे स्वरूप देण्यात आले. भारत-रशिया संरक्षण सहकार्यासाठी विशेष महत्त्वाचा ठरलेला हा कृतिगट विद्यमान लष्करी कार्यक्रमांचे मूल्यमापन करण्यासाठीचा मंच प्रदान करतो तसेच नव्याने उदयाला येत असलेल्या संरक्षणविषयक आव्हानांचा सामना करण्यास्तही सहकार्याची नवनवी क्षेत्रे निश्चित करतो.

***

H.Akude/S.Chitnis/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2078375) Visitor Counter : 14