माहिती आणि प्रसारण मंत्रालय
55 व्या इफ्फी (IFFI) मधील पुनर्संचयित क्लासिक्सचे स्क्रीनिंग: NFDC ने चित्रपट पुनर्संचयित करण्यासाठी घेतलेल्या परिश्रमांचा दाखला
इफ्फी (IFFI) 2024 ने NDFC-NFAI च्या पुनर्संचयित सर्वोत्कृष्ट कला कृती प्रदर्शित करून सिने सृष्टीतील दिग्गजांना वाहिली आदरांजली
भारताच्या चित्रपट वारशाचे जतन: NFDC च्या राष्ट्रीय फिल्म हेरिटेज मिशनला मिळालेले यश
#IFFIWood, 27 नोव्हेंबर 2024
गोवा येथे 55 व्या इफ्फी (IFFI), अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या "पुनर्संचयित क्लासिक्स" विभागात भारताचा समृद्ध सिनेमॅटिक वारसा प्रदर्शित केला जात आहे. राष्ट्रीय फिल्म हेरिटेज मिशन (NFHM) अंतर्गत, NFDC-नॅशनल फिल्म आर्काइव्ह ऑफ इंडिया (NFDC-NFAI) ने भारताचा अतुलनीय चित्रपट वारसा जतन करण्यासाठी आणि त्याचा उत्सव साजरा करण्यासाठी केलेल्या अथक प्रयत्नांवर हा विभाग प्रकाश टाकतो. यंदाच्या चित्रपट महोत्सवात सिने प्रेमींना पुनर्संचयित क्लासिक्सची जादू अनुभवण्याची आणि भारतीय चित्रपटांचा चिरस्थायी वारसा साजरा करण्याची संधी मिळाली आहे.
देशभरातील काही काळजीपूर्वक पुनर्संचयित केलेल्या उत्कृष्ट कलाकृती या विभागाअंतर्गत प्रदर्शित केल्या जात आहेत, त्या पुढील प्रमाणे:
मूक पट:
कालिया मर्दन (1919)
दादासाहेब फाळके यांनी दिग्दर्शित केलेल्या या अमुल्य कलाकृतीचे 35 मिमी डुप निगेटिव्ह वापरून 4K पुनर्संचयन करण्यात आले आहे. सात्यकी बॅनर्जी आणि इतर कलाकारांनी दिलेले लाइव्ह म्युझिक, तसेच स्पेशल इफेक्ट्स आणि कथाकथनाची नाविन्यपूर्ण शैली असलेल्या या चित्रपटामधून फाळके यांच्या अलौकिक सिनेमॅटिक प्रतिभेची प्रचीती मिळते.
तेलुगु सिनेमा
देवदासू (1953)
बंगाली क्लासिक ‘देवदास’ चे हे रूपांतर असून, त्यामध्ये अक्किनेनी नागेश्वर राव हे ट्रॅजिक हिरो आहेत. मॅटिनी आयडॉल ANR यांच्या जन्मशताब्दी वर्षा निमित्त त्यांना दिलेली ही आदरांजली आहे.
हिंदी सिनेमा
· आवारा (1951) 35 एमएम डुप निगेटिव्हमधून पुनर्संचयित केलेला, राज कपूर यांनी दिग्दर्शित केलेला हा सदाबहार क्लासिक चित्रपट, संपत्ती, शक्ती आणि नशिबाच्या संकल्पनांचा अविष्कार आहे. कपूर कुटुंबाने NFDC-NFAI ला दिलेल्या चित्रपट साहित्याच्या बहुमोल योगदानामुळे तो पुनर्संचयित करणे शक्य झाले.
· हम दोनो (1961) दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर रचलेल्या या क्लासिक चित्रपटात, देव आनंद यांची दुहेरी भूमिका असून त्याला जयदेव यांनी संगीत दिले आहे. मोहम्मद रफी यांच्या जन्मशताब्दी वर्षा निमित्त महोत्सवात हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला.
· सात हिंदुस्तानी (1969) गोव्यामधील पोर्तुगीज राजवटीविरुद्ध केलेल्या बंडाची ही कथा असून यामध्ये तरुणपणातील अमिताभ बच्चन ची भूमिका आहे. हिंदी चित्रपटांच्या चिरस्थायी वारशाचा हा दाखला आहे. 35 एमएम कॅमेरा निगेटिव्हमधून पुनर्संचयित केलेला हा चित्रपट ऐक्य आणि देशभक्तीची भावना साजरी करतो.
बंगाली सिनेमा
हार्मोनियम (1976) दिग्गज सिने कर्मी तपन सिन्हा दिग्दर्शित हा क्लासिक ( अभिजात) चित्रपट त्यांच्या शताब्दी सोहळ्याचा एक भाग म्हणून प्रदर्शित केला जाईल. 35 एमएम कॅमेरा निगेटिव्हमधून पश्चिम बंगाल स्टेट फिल्म आर्काइव्हने हा चित्रपट पुनर्संचयित केला आहे. हार्मोनियमच्या दुःखद प्रवासावरच्या या मार्मिक कथेला सिन्हा यांनी स्वतःच संगीतबद्ध केले आहे.
सीमाबाधा (1971) सत्यजित रे यांच्या कलकत्ता ट्रायलॉजीचा एक भाग असलेला सीमाबाधा हा चित्रपट एका महत्त्वाकांक्षी विक्री व्यवस्थापकाच्या जीवनातून कॉर्पोरेट विश्वाच्या निर्दयतेचा वेध घेतो. पुनर्संचयित चित्रपटात यापूर्वी उपलब्ध नसलेली एक मिनिटाची पीटर फॅनची जाहिरात आहे. 2022 मध्ये प्रतिद्वंदीच्या पुनर्संचयनानंतर, संपूर्ण कलकत्ता ट्रोलॉजीला पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
पुनर्संचयनातील महत्वाचा टप्पा
प्रगत 4K स्कॅनिंग, रंग सुधारणे आणि ध्वनी पुनर्संचयित करण्याचे तंत्र वापरून 300 हून अधिक समर्पित व्यावसायिकांनी या सिनेमॅटिक रत्नांच्या पुनर्संचयनाचे काम हाती घेतले आहे.
गहाळ फ्रेम्स, स्क्रॅच आणि इतर हानी काळजीपूर्वक दुरुस्त करण्यात आली, जेणेकरून आधुनिक सिनेमा मानकांची पूर्तता करताना चित्रपटांचा मूळ दर्जा कायम राहील.
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालया अंतर्गत NFDC-NFAI करत असलेले हे असामान्य परिश्रम, भारताचा सिनेमॅटिक वारसा जतन करण्यामधील एक महत्त्वाचा टप्पा आहे. या चित्रपटांचे पुनर्संचयन करताना, NFDC-NFAI ने उच्च गुणवत्तेची हमी दिली आहे. त्यामुळे भविष्यातील पिढ्यांसाठी या कलाकृती पुन्हा जिवंत झाल्या आहेत.
55 व्या इफ्फी (IFFI) मधील या पुनर्संचयित क्लासिक्सचे स्क्रिनिंग म्हणजे, जगभरातील सिने प्रेमींना आपल्या कामातून प्रेरणा देणाऱ्या या दिग्गज कलाकारांना दिलेली मानवंदना आहे.
* * *
PIB IFFI CAST AND CREW | G.Chippalkatti/Rajshree/Darshana | IFFI 55
(Release ID: 2078213)
Visitor Counter : 5