माहिती आणि प्रसारण मंत्रालय
निवड प्रक्रिया तांत्रिक कौशल्याहून वरचढ आहे; भावनिक अनुनाद, अस्सलपणा आणि सर्जनशीलता यावर ती लक्ष केंद्रित करते: आंतरराष्ट्रीय ज्युरी अध्यक्ष आशुतोष गोवारीकर
"महान कथा सीमा ओलांडतात ": एलिझाबेथ कार्लसेन, आंतरराष्ट्रीय ज्युरी सदस्य
उत्कृष्ट चित्रपट प्रेक्षकांशी सार्वत्रिक भावनिक बंध निर्माण करतात: आंतरराष्ट्रीय ज्युरी सदस्य अँथनी चेन
12 आंतरराष्ट्रीय आणि 3 भारतीय चित्रपट सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठीच्या सुवर्ण मयुर पुरस्कारासाठी स्पर्धेत; उद्या इफ्फीच्या समारोप समारंभात पुरस्काराची होणार घोषणा
इफ्फी 2024 मध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभागाच्या परीक्षकांची पत्रकार परिषद
#IFFIWood, 27 नोव्हेंबर 2024
55 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2024 इफ्फी मधील आंतरराष्ट्रीय स्पर्धा श्रेणीच्या परीक्षकानी (ज्युरी) आज गोव्यात माध्यमांना संबोधित केले. या वर्षीच्या महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट अभिनेता (पुरुष), सर्वोत्कृष्ट अभिनेता (महिला) आणि विशेष ज्युरी पुरस्कारांसह प्रमुख श्रेणींमधील विजेते निवडण्याची जबाबदारी प्रतिष्ठित गोल्डन पीकॉक ( सुवर्ण मयूर) ज्युरीकडे सोपवण्यात आली आहे. प्रख्यात भारतीय चित्रपट निर्माते आशुतोष गोवारीकर यांच्या नेतृत्वाखालील ज्युरीमध्ये आंतरराष्ट्रीय चित्रपट तज्ञांच्या प्रतिष्ठित पॅनेलचा समावेश आहे.
ज्युरी पॅनेलमध्ये खालील सदस्यांचा समावेश आहे:
- अँथनी चेन, सिंगापूरचे दिग्दर्शक
- एलिझाबेथ कार्लसन, ब्रिटिश अमेरिकन निर्माता
- फ्रान बोर्गिया, स्पॅनिश निर्माता
- जिल बिलॉक, ऑस्ट्रेलियन चित्रपट संकलक
सुवर्णमयुर पुरस्कार विजेत्याला महोत्सवातील सर्वोच्च सन्मानासह 40 लाख रुपयांचे बक्षीस मिळेल. एकूण 15 चित्रपट (12 आंतरराष्ट्रीय आणि 3 भारतीय चित्रपट) या प्रतिष्ठित स्पर्धेसाठी निवडले आहेत, जे संस्कृती आणि सिनेमॅटिक कलात्मकतेच्या समृद्ध विविधतेचे प्रतिनिधित्व करतात.
ज्युरीचे अध्यक्ष आशुतोष गोवारीकर यांनी गोव्यातील चैतन्यमय वातावरण आणि उत्सव जवळून अनुभवण्याची संधी मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. त्यांनी ज्युरी सदस्यांच्या चित्रपटांमधील सामायिक अभिरुची लक्षात घेऊन त्यांच्यातील अद्वितीय सौहार्द अधोरेखित केले. त्यांनी स्पष्ट केले की, निवड प्रक्रिया तांत्रिक कौशल्याच्या वरचढ असून भावनिक अनुनाद, अस्सलपणा आणि सर्जनशीलता यावर लक्ष केंद्रित करते. उत्कृष्ट चित्रपट नवीन दृष्टीकोन देतात, प्रेक्षकांना विविध संस्कृतींशी संलग्न होऊन शिकण्यास आणि विकसित होण्यास सक्षम करतात यावर गोवारीकर यांनी भर दिला.
गोवारीकर यांनी निदर्शनास आणून दिले की चित्रपटांची तुलना करणे कठीण असले तरी, पुरस्काराचे स्वरूप असा एक चित्रपट निवडणे आहे जो सगळ्यांपेक्षा वेगळा आहे. त्यांनी ज्युरीमधील उत्कट संभाषणांचा उल्लेख केला , त्यांच्या वेगवेगळ्या दृष्टीकोनांमुळे विशेषत: चित्रपटांच्या सांस्कृतिक मतभेद आणि भावनिक पैलूंचा शोध घेताना चर्चा अधिक व्यापक झाली.
एलिझाबेथ कार्लसन यांनी सीमा ओलांडणाऱ्या कथा सांगण्याचे महत्त्व अधोरेखित केले. उत्तम कथा आणि कल्पनांमध्ये राजकीय सीमांचा विचार न करता सीमा ओलांडण्याची शक्ती असते असे त्यांनी नमूद केले. दडपशाहीविरूद्ध वैयक्तिक विजयांचा दृष्टिकोन देणाऱ्या चित्रपटांच्या भावनिक आणि सांस्कृतिक अनुनादाचा त्यांनी ठळक उल्लेख केला. कार्लसन यांनी प्रथमच किंवा दुसऱ्यांदा दिग्दर्शन करणाऱ्या दिग्दर्शकांच्या चित्रपटांमध्ये विशेषत: महिलांवरील चित्रपटांमध्ये अविश्वसनीय वाढ झाल्याचे नमूद करतानाच हा जागतिक चित्रपट क्षेत्रातील एक सक्षम आणि सकारात्मक बदल असल्याचे मत व्यक्त केले.
अँथनी चेन यांनी इफ्फी येथे आयसीएफटी युनेस्को गांधी पदक जिंकलेल्या त्यांच्या एका चित्रपटाच्या सन्मानाची आठवण सांगून, महोत्सवाशी त्यांचा वैयक्तिक संबंध सामायिक केला. चित्रपट सृष्टीतील आव्हानांवर खुले चिंतन करत असताना त्यांनी या प्रवासाचे वर्णन केले. ते म्हणाले की " यामध्ये अनेकवेळा स्वत:विषयीच्या शंका येत होत्या आणि सतत प्रश्नचिन्ह निर्माण होत होते. तरीही, सांगावेसे वाटते की, प्रेक्षकांशी सार्वत्रिक भावनिक संबंध निर्माण करण्यासाठी उत्कृष्ट चित्रपटांमध्ये जी शक्ती असते ती, खूप महत्वाची आहे." "आपल्यासाठी म्हणजे अँथनी चेनसाठी सिनेमा हा लेखक, दिग्दर्शक आणि संपादक यांच्यातील गतिमान, चैतन्यशील संभाषण आहे. चित्रीकरण आणि संपादनादरम्यान पटकथा सतत विकसित होत असते." , हे सांगून त्यांनी आपले म्हणणे अधोरेखित केले.
फ्रॅन बोर्जिया यांनी परीक्षक सदस्यांमधील समृद्ध चर्चेची प्रशंसा केली आणि जगभरातील चित्रपट पाहिल्याने त्यांना विविध संस्कृती आणि दृष्टीकोन हे पाहण्याची, जाणून घेण्याची संधी मिळते हे नमूद केले. त्यांनी चित्रपटांच्या विविधतेवर प्रकाश टाकला. या कथानकांमध्ये अगदी खोलवर प्रभाव टाकणा-या वैयक्तिक कथांपासून ते व्यापक सामाजिक समस्यांचे प्रतिबिंबही पहायला मिळाले, असे फ्रॅन यांनी नमूद केले.
या पत्रकार परिषदेचे सूत्रसंचालन धर्मेंद्र तिवारी यांनी केले.
संपूर्ण पत्रकार परिषद येथे पाहता येईल :
55 व्या ‘इफ्फी’ मध्ये प्रतिष्ठित सुवर्ण मयूर पुरस्कारासाठी खालील चित्रपटांमध्ये स्पर्धा आहे :
1. फिअर अँड ट्रेम्बलिंग – दिग्दर्शक – मनिजेह हेकमत, फैज़ अजीजखानी
2. गुलिझार – दिग्दर्शक - बेल्किस बेरॅक
3. होली काउ - दिग्दर्शक - लुईस कुर्वोझियर
4. आय एम नेवेन्का - दिग्दर्शक - आयसीअर बोलेन
5. पॅनोप्टीकॉन – दिग्दर्शक – जॉर्ज सिखारुलायड्जे
6. पियर्स – दिग्दर्शक – नेलिसिआ लो
7. रेड पाथ – दिग्दर्शक – लॉत्फी ऍचौर
8. शेफर्ड्स – दिग्दर्शक - सोफी देरास्पे
9. द न्यू इयर दॅट नेव्हर केम – दिग्दर्शक - बोगदान मुरेसानु
10. टॉक्सिक – दिग्दर्शक – सॉले ब्लियुवेट
11. व्हेवज् - दिग्दर्शक - जिरेइ माडल
12. हू डू आय बीलॉंग टू – दिग्दर्शक - मरियम जूबेउर
13. आर्टिकल 370 – दिग्दर्शक – आदित्य सुहास जांभळे
14. रावसाहेब - दिग्दर्शक - निखिल महाजन
15. द गोट लाइफ – दिग्दर्शक - ब्लेसी
जगभरातील वैविध्यपूर्ण दृष्टीकोन प्रतिबिंबित करणारे हे चित्रपट आहेत. त्यांच्या निर्मितीमध्ये अद्वितीय कलात्मक दृष्टी, सांस्कृतिक प्रासंगिकता तर आहेच त्याशिवाय या चित्रपटांना असलेली भावनिक खोली लक्षात घेवून, त्यांची निवड परीक्षकांनी केली आहे. प्रतिष्ठेच्या सुवर्ण मयूर स्पर्धेमध्ये असलेले चित्रपट आणि महोत्सवाच्या अधिक तपशीलांसाठी, कृपया पुढील संकेतस्थळाला भेट द्यावी: (https://pib.gov.in/PressReleaseIframePage.aspx?PRID=2073053)
* * *
PIB IFFI CAST AND CREW | G.Chippalkatti/Sushma/Suvarna/Darshana | IFFI 55
(Release ID: 2078091)
Visitor Counter : 17