सांस्कृतिक मंत्रालय
भारतीय राज्यघटना स्वीकारल्याला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त वर्षभर चालणाऱ्या ऐतिहासिक उत्सवाची उद्यापासून सुरुवात
राष्ट्रपतींच्या नेतृत्वाखाली संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात भव्य उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन
संस्कृत आणि मैथिली भाषेत संविधानाचे प्रकाशन
26 नोव्हेंबर रोजी संपूर्ण देशात उद्देशिकेचे सामूहिक वाचन
नागरिकांना संवादात्मक उपक्रमातून संविधानाच्या वारशाशी जोडले जाण्यासाठी ‘constitution75.com’ एक समर्पित वेबसाइट
प्रविष्टि तिथि:
25 NOV 2024 7:41PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर 2024
भारतीय राज्यघटना स्वीकारल्याला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या स्मरणार्थ केंद्र सरकारने वर्षभर चालणाऱ्या ऐतिहासिक उत्सवाच्या प्रारंभाची घोषणा केली आहे. हा एक मैलाचा दगड असून आपल्या लोकशाहीचा उल्लेखनीय प्रवास आणि आपल्या मूलभूत तत्त्वांचा आणि संविधानिक मूल्यांचा चिरस्थायी वारसा प्रतिबिंबित करतो जो संविधान दिनी (संविधान दिवस), 26 नोव्हेंबर 2024 रोजी सुरु होत आहे.“हमारा संविधान, हमारा स्वाभिमान” या मोहिमेच्या ब्रीदवाक्या अंतर्गत हा उत्सव साजरा केला जात आहे आणि त्यात अंतर्भूत मूलभूत मूल्यांचा पुनरुच्चार करताना संविधान निर्मात्यांच्या योगदानाचा सन्मान करणे हा यामागचा उद्देश आहे.
26 नोव्हेंबर 1949 रोजी, भारतीय संविधान सभेने भारतीय राज्यघटना स्वीकारली, जी 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आली आणि भारतीय इतिहासातील एका नव्या युगाची सुरुवात झाली. हा दिवस महत्त्वाचा आहे कारण या दिवशी जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना स्वीकारण्यात आली जी भारताच्या लोकशाही व्यवस्थेचा कणा आहे. स्थापनेपासून गेल्या 75 वर्षांत , राज्यघटना देशाच्या प्रगतीला आकार देणारी मार्गदर्शक चौकट म्हणून काम करत आहे.
उत्सव - ठळक वैशिष्ट्ये :
- विशेष संकेतस्थळ (constitution75.com): constitution75.com हे विशेष संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे ज्यामुळे नागरिकांना संवादात्मक उपक्रम आणि संसाधनांद्वारे संविधानाच्या वारशाशी जोडता येईल. या संकेतस्थळावर :
- उद्देशिका वाचा आणि व्हिडिओ रेकॉर्ड करा: नागरिक त्यांच्या पसंतीच्या भाषेत संविधानाची उद्देशिका वाचतानाचा व्हिडिओ रेकॉर्ड करून मोहिमेत सहभागी होऊ शकतात. मोहिमेच्या संकेतस्थळावर व्हिडिओ अपलोड करता येतील आणि सहभागाचे प्रमाणपत्र डाउनलोड करता येईल.
- विविध भाषांमध्ये संविधान पहा : संविधानाचा संपूर्ण मजकूर विविध भाषांमध्ये उपलब्ध असून तो सर्व नागरिकांना पाहता येईल.
- इतिहास जाणून घ्या : संविधानाच्या निर्मितीबद्दल जाणून घ्या, संविधान सभेतील चर्चा वाचा, संविधान निर्मितीमध्ये सहभागी विविध समित्यांचे अहवाल वाचा आणि आधुनिक भारताला आकार देणारी मूल्ये आणि तत्त्वे जाणून घ्या.
- संवादात्मक वैशिष्ट्ये: “तुमची राज्यघटना जाणून घ्या”, हे एक कृत्रिम बुद्धिमत्ता द्वारे सक्षम संवादात्मक वैशिष्ट्य आहे , जिथे कुणीही राज्यघटने संदर्भातले प्रश्न विचारू शकतो आणि भारताच्या राज्यघटनेशी संबंधित सविस्तर उत्तरे मिळवू शकतो.
26 नोव्हेंबर 2024 रोजी उद्देशिकेचे सामूहिक वाचन
- 26 नोव्हेंबर 2024 रोजी, शाळांपासून ते कार्यालयांपर्यंत, शहरांपासून ते खेड्यांपर्यंत, संपूर्ण भारतातील लाखो लोक एकत्रितपणे उद्देशिका वाचतील.
·(constitution75.com) संकेतस्थळावर तुमचे सेल्फी आणि व्हिडिओ अपलोड करून आणि सोशल मीडियावर अभिमानाने शेअर करून हा क्षण साजरा करा.
26 नोव्हेंबर 2024 रोजी संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात होणार उद्घाटनाचा कार्यक्रम:
राष्ट्रपतींच्या अध्यक्षतेखाली उपराष्ट्रपती, पंतप्रधान, लोकसभा अध्यक्ष आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात भव्य उद्घाटनपर सोहळा आयोजित केला आहे.
या कार्यक्रमाची ठळक वैशिष्ट्ये:
- भारतीय राज्यघटनेची निर्मिती आणि ऐतिहासिक प्रवास यांच्या गौरवशाली कारकिर्दीला समर्पित लघुपटाचे सादरीकरण.
- भारताने संविधान स्वीकारल्याच्या 75 व्या वर्धापन दिनाच्या स्मरणार्थ नाणे आणि तिकिटाचे प्रकाशन.
- "मेकिंग ऑफ द कॉन्स्टिट्युशन ऑफ इंडिया: ए ग्लिंप्स " आणि "मेकिंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया अँड इट्स ग्लोरियस जर्नी" या पुस्तकांचे प्रकाशन
- भारतीय राज्यघटनेच्या कला आविष्काराला समर्पित पुस्तिकेचे प्रकाशन.
- भारतीय राज्यघटनेचे संस्कृत भाषेत प्रकाशन.
- भारतीय राज्यघटनेचे मैथिली भाषेत प्रकाशन.
राष्ट्रपतींच्या नेतृत्वाखाली राज्यघटनेच्या उद्देशिकेचे औपचारिक वाचन.
भारत सरकारने सर्व नागरिकांना या ऐतिहासिक सोहळ्याचा एक भाग होण्याचे आणि आपल्या संविधानाचा अभिमान सार्वजनिक स्तरावर प्रदर्शित करण्याचे तसेच आपल्या राष्ट्रासाठी मार्गदर्शक असणाऱ्या लोकशाही मूल्यांप्रती आपली बांधिलकी दर्शविण्याचे आवाहन केले आहे.
सहभागी कसे व्हावे!
- संविधानाची प्रस्तावना वाचण्यासाठी, तुमचे व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी आणि अपलोड करण्यासाठी आणि सहभागाचे प्रमाणपत्र डाउनलोड करण्यासाठी constition75.com ला भेट द्या.
- संकेतस्थळावरील परस्परसंवादी चर्चासत्रात सहभागी व्हा,विविध भाषांमध्ये राज्यघटना वाचा,पहा आणि भारताला मार्गदर्शक ठरणाऱ्या या प्रवासाबद्दल अधिक जाणून घ्या.
- 26 नोव्हेंबर 2024 रोजी होणाऱ्या देशव्यापी अभियानात सामील व्हा, देशभरातील शाळा, महाविद्यालये, सरकारी आणि खाजगी कार्यालये, पंचायती आणि इतर ठिकाणी होणाऱ्या या प्रस्तावनेच्या वाचनात भाग घ्या. इतरांना प्रेरणा देण्यासाठी सामाजिक माध्यमांवरून तुमचा सहभाग सामायिक करा.
N.Chitale/S.Kane/S.Patgaonkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2077040)
आगंतुक पटल : 2047