माहिती आणि प्रसारण मंत्रालय
‘मंजुम्मेल बॉईज:’ खरी मैत्री आणि शौर्याची कहाणी 55 व्या इफ्फीमध्ये लक्षवेधक ठरली
गुहा हेच माझ्या चित्रपटाचे मध्यवर्ती पात्र असून, या गुहेचा गंध पडद्यापर्यंत पोहोचवता यायला हवा होता: चिदंबरम, दिग्दर्शक, ‘मंजुम्मल बॉईज’
मल्याळम चित्रपट उद्योग विकसित झाला असून, ओटीटी प्लॅटफॉर्मच्या उदयामुळे ‘मंजुम्मल बॉईज’ सारख्या कथा सांगण्याची संधी उपलब्ध झाली: चिदंबरम
#IFFIWood, 25 नोव्हेंबर 2024
गोवा येथील 55 व्या इफ्फी (IFFI), अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या इंडियन पॅनोरमा विभागात आज ‘मंजुम्मल बॉईज’ हा चित्तवेधक बचाव नाट्याचा थरार असलेला मल्याळम चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. गोव्यामधील पत्र सूचना कार्यालयाच्या (PIB) मीडिया सेंटरमध्ये इफ्फी (IFFI) महोत्सवाच्या 6 व्या दिवसाच्या उद्घाटनपर पत्रकार परिषदेत चित्रपटाचे दिग्दर्शक चिदंबरम यांनी माध्यमांशी संवाद साधला.
चित्रपटाची कथा वास्तविक जीवनातील घटनेवरून प्रेरित असून, केरळमधील कोची जवळच्या मंजुम्मल या गावातल्या 11 मल्याळी तरुणांच्या टीमचा (चमू) यात समावेश आहे. तरुणांच्या या टीमने तामिळनाडूमधील कोडाईकनाल इथल्या डेव्हिल्स किचन, ज्याला गुना केव्हज (गुहा) म्हणूनही ओळखले जाते, या ठिकाणी भेट दिली होती.
अभिनेता कमल हासन यांच्या ‘गुना’ या चित्रपटाच्या चित्रीकरणानंतर या गुहांना प्रसिद्धी मिळाली होती. आपल्या भेटीदरम्यान, या चमूतील एक सदस्य अचानक गुहेतील खोल घळीत पडला. जेव्हा स्थानिक पोलिस आणि अग्निशमन दलानेही आशा सोडली, तेव्हा सिजू डेव्हिड हा तरुण आपल्या मित्राला वाचवण्यासाठी पुढे आला, आणि त्याने एक धाडसी आणि साहसी मोहीम सुरु केली. मैत्री आणि निस्वार्थीपणाचे सामर्थ्य अधोरेखित करणारी ही घटना मंजुम्मेल येथील या अकरा तरुणांच्या शौर्याची साक्ष देते.
चिदंबरम यांनी सांगितले की, हा चित्रपट ज्या घटनेवर आधारित आहे, ती प्रसिद्ध आहे. एका दशकापूर्वी एका वेगळ्या टीमने यावर चित्रपट बनवण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यावेळी चित्रपट उद्योगाची अशा कथेत गुंतवणूक करण्याची तयारी नव्हती. तथापि, त्यानंतर मल्याळम चित्रपट उद्योग विकसित झाला असून, OTT प्लॅटफॉर्मच्या उदयामुळे अशा कथा सांगण्यासाठी अधिक संधी उपलब्ध झाल्या आहेत.
चित्रपट बनवताना आपल्यापुढे आलेल्या आव्हानांबद्दल सांगताना दिग्दर्शक म्हणाले की, गुना केव्हज मध्ये प्रत्यक्ष चित्रीकरण करणे अशक्य असल्यामुळे, कोची येथील एका गोदामात गुना केव्हजची प्रतिकृती तयार करावी लागली. गुहेचे बारकावे आणि तिची अनोखी वैशिष्ट्ये साकारण्यासाठी त्यांच्या चमूला चिकाटी आणि शौर्य यावर भर देत, गुहेच्या बारकाव्यांकडे लक्ष द्यावे लागले. या गुहा, हेच या चित्रपटाचे मध्यवर्ती पात्र असल्याचे चिदंबरम यांनी सांगितले. “मला या गुहेचा गंध पडद्यापर्यंत पोहोचवता यायला हवा होता, असे वाटते,” ते म्हणाले.
संपूर्ण संवाद पाहण्यासाठी:
* * *
PIB IFFI CAST AND CREW | G.Chippalkatti/Rajshree/Darshana | IFFI 55
(Release ID: 2076985)
Visitor Counter : 12