माहिती आणि प्रसारण मंत्रालय
iffi banner
0 4

महामारीमुळे समोर उभ्या ठाकलेल्या आव्हानांपासून इफ्फीच्या प्रकाशझोतापर्यंत पोहोचण्याचा प्रवास: मनोज बाजपेयी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उलगडला डिस्पॅच चित्रपटाचा प्रवास


जर मी माझ्या कारला काळ्या काचा लावल्या, तर मी लोकांना कसा बघू शकेन आणि त्यांच्या जीवनाचे निरीक्षण कसे करू शकेन?

नाटक हे अभिनेत्याचे माध्यम आहे तर चित्रपट हे मुलभूतपणे दिग्दर्शकाचे माध्यम आहे: बाजपेयी

#IFFIWood, 22 नोव्‍हेंबर 2024

 

सुप्रसिध्द अभिनेते, चार वेळा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित आणि पदमश्री पुरस्कार विजेते मनोज बाजपेयी आज 55 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये (इफ्फी) या महोत्सवात उपस्थित  असून या महोत्सवामध्ये 'डिस्पॅच'  हा त्यांचा महत्त्वाकांक्षी चित्रपट  सादर होत आहे.

इफ्फी 2024 च्या अनुषंगाने पत्रसूचना कार्यालयातर्फे आयोजित पत्रकार परिषदेत बाजपेयी, दिग्दर्शक कन्नू बहल, ईशानी बॅनर्जी  आणि अभिनेत्री शहाना गोस्वामी यांच्यासह या चित्रपटातील कलाकार आणि इतर तंत्रज्ञ उपस्थित होते. माध्यम प्रतिनिधींशी बोलताना या सर्वांनी चित्रपटाची निर्मिती प्रक्रिया, त्यात आलेली आव्हाने आणि पत्रकारितेच्या काळ्या बाजूचे दर्शन घडवणारी, मनावर पकड घेणारी कथा यांच्यावर प्रकाश टाकला.

अभिनेते मनोज बाजपेयी 'डिस्पॅच'  या चित्रपटाच्या निर्मितीचा प्रवास आणि त्यादरम्यान उभी राहिलेली आव्हाने यांच्याबद्दल अत्यंत उत्कटतेने बोलले. आजच्या काळातील सर्वात रोमांचक चित्रपट निर्मात्यांमध्ये दिग्दर्शक कन्नू बहल यांना स्थान देत बाजपेयी यांनी कन्नू यांच्या चित्रपट निर्मितीच्या नाविन्यपूर्ण दृष्टीकोनाची प्रशंसा केली.

 

“आम्ही या चित्रपटाची निर्मिती जागतिक महामारीच्या काळात सुरु केली. मुळात ही महामारी हेच एक प्रचंड आव्हान होते. कोरोनाच्या डेल्टा लाटेच्या काळात आम्ही मुंबईत चित्रीकरण करत होतो आणि आमच्यापैकी बऱ्याच जणांना या आजाराची लागण झाली. मात्र त्यानंतर प्रचंड अडथळ्यांवर मात करत आम्ही चित्रीकरण पुढे सुरु ठेवले,” बाजपेयींनी सांगितले.

“ईशानी आणि कन्नू यांनी लिहिलेली ही कथा अविश्वसनीयरित्या वास्तववादी आणि गुंगवून टाकणारी आहे.ज्याच्या महत्त्वाकांक्षा आणि व्यावसायिक अंतःप्रेरणा त्याच्या व्यक्तिगत आयुष्यावर परिणाम करतात अशा एका पत्रकाराची ही कथा आहे,” असे ते म्हणाले.

बाजपेयी यांनी चित्रपटाच्या कथेच्या प्रभावावर आणखी प्रकाश टाकला. या चित्रपटातील पात्रांची खोली समजून घेण्यासाठी अत्यावश्यक असलेल्या कार्यशाळांच्या थकवून टाकणाऱ्या प्रक्रियेवर त्यांनी अधिक भर दिला. बाजपेयी म्हणाले की एका पत्रकाराच्या भूमिकेसाठी कसून तयारी करण्यामुळे त्यांच्यावर मानसिकदृष्ट्या परिणाम झाला असला तरीही एक कलाकार म्हणून त्यांची वाढ होण्यात मदतच झाली.

“ईशानी आणि कन्नू यांची कथा इतकी तपशीलवार आणि सत्यामध्ये रुजलेली होती की ती सर्वच कलाकारांसाठी मानसिक पातळीवर आव्हानात्मक होती मात्र शेवटी विचार करता त्यासाठीचा आमचा प्रत्येक प्रयत्न त्याच मोलाचा होता,” बाजपेयी यांनी पुढे सांगितले. धर्मेंद्र तिवारी यांनी सदर पत्रकार परिषदेचे संचालन केले.

 

चित्रपटाची थोडक्यात माहिती

डिस्पॅच हा चित्रपट जॉय नामक गुन्हे विषयक प्रकाशनाचा संपादकाची कथा सांगतो. टोळीयुद्धाशी निगडीत खोलवर रुजलेल्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करण्यासाठी कारकिर्दीतील महत्त्वाचा तपास करण्यासाठी झगडणाऱ्या जॉयला या सगळ्यात लग्न मोडणे आणि जवळच्या माणसांकडून फसवणूक अशा गोष्टींना सामोरे जावे लागते, आणि शेवटी अत्यंत दुःखद परिणाम त्याच्या पदरी येतात. हा चित्रपट महत्त्वाकांक्षा, लालसा यांच्या आरपार छेदनातून एखाद्याचे व्यक्तिगत आणि व्यावसायिक आयुष्य कसे पणाला लागते याचे दर्शन घडवतो. 13 डिसेंबर 2024 रोजी हा चित्रपट अधिकृतपणे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  

 

संवादात्मक सत्र

पत्रकार परिषदेसह, मनोज बाजपेयी यांनी इफ्फीच्या अनुषंगाने आयोजित आकर्षक संवादात्मक सत्रात देखील हजेरी लावली. भारतातील सर्वात मान्यवर कलाकारांपैकी एका कलाकाराच्या मनाचे दुर्मिळ दर्शन या सत्रातून घडले.

“जर मी माझ्या कारला काळ्या काचा लावल्या, तर मी बाहेरचे लोक, त्यांची दुःखे आणि आनंद कसा बघू शकेन आणि त्यांच्या जीवनाचे निरीक्षण कसे करू शकेन? एक अभिनेता म्हणून मला सर्वांसमोर न येता जमावात मिसळून जायला आणि लोकांचे निरीक्षण करताना त्यांच्याशी संपर्क साधायला आवडेल. जर तुम्ही सामान्य लोकांपासून दूर दूर राहिलात तर तुम्ही कधीच उत्तम भूमिका वठवू शकणार नाही,” मनोज बाजपेयी म्हणाले. 

55 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील (इफ्फी)आकर्षक संवादात्मक सत्रात उपस्थितांना संबोधित करताना मनोज बाजपेयी म्हणाले की दुसऱ्या व्यक्तीची भूमिका वठवणे हे जगातील अत्यंत कठीण काम आहे.

या चिंतनशील आणि स्पष्ट संभाषणात, या विविध  पुरस्कार विजेत्या अभिनेत्याने  अभिनयाप्रति त्याच्या दृष्टीकोनातील आंतरिक बाब विशद केली.  एक अभिनेता म्हणून त्याची भूमिका केवळ प्रेक्षकांचे मनोरंजन करणे किंवा त्यांना खिळवून ठेवणे नाही तर त्यांचे खरोखर प्रतिनिधित्व करणे आहे यावर त्यांनी भर दिला.  ते म्हणाले, "एखाद्या अभिनेत्याची कामगिरी   केवळ लोकांचे मनोरंजन करणे किंवा त्यांना खिळवून ठेवणे नाही तर लोकांचे प्रतिनिधित्व केले पाहिजे आणि त्यांच्या मनाला भिडणारी कामगिरी हवी." अभिनय ही कधीही न संपणारी प्रक्रिया आहे जी त्याला मोहित करते आणि  चालना देते हे नमूद करून त्यांनी या कलेबद्दलचे त्याचे वेड उत्कटतेने सांगितले.

रंगभूमी आणि चित्रपट यांच्यातील फरकाबाबत बोलताना त्यांनी  रंगभूमी हे अभिनेत्याचे माध्यम असले तरी चित्रपट हे मुळात दिग्दर्शकाचे माध्यम आहे यावर भर दिला. "सिनेमामध्ये, इतर अनेक घटक आणि पैलू असतात, जे अंतिम कथेला आकार देतात. ही एक सहकार्यात्मक प्रक्रिया आहे," असे त्यांनी स्पष्ट केले.

त्याच्या अष्टपैलुत्वासाठी ओळखल्या जाणाऱ्या या अभिनेत्याने कोणत्याही विशिष्ट प्रकारच्या सिनेमापुरते मर्यादित न राहता विविधढंगी  भूमिका आणि शैलींचा शोध सुरू ठेवण्याची इच्छा व्यक्त केली. "मला स्वतःला मुख्य प्रवाहातील सिनेमा किंवा कोणत्याही विशिष्ट शैलीपुरते मर्यादित ठेवायचे नाही. प्रत्येक नवीन प्रकल्पात मी नेहमीच माझ्या पात्रांचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो. माझा भर  नेहमीच पडद्यावर काहीतरी वेगळे साकारण्यावर असतो ," असे त्यांनी सांगितले.

समाज आणि चित्रपट उद्योग या दोघांच्याही सद्यस्थितीबद्दल चिंता व्यक्त करत ते म्हणाले, ही एक कठीण वेळ आहे, जेव्हा समाज आणि उद्योग क्षेत्रात अनिश्चितता, संघर्ष आणि गोंधळ आहे. स्वतंत्र सिनेमा ही एकमेव शैली आहे, जी सिनेमाच्या कलेशी प्रामाणिक राहिली आहे.  “स्वतंत्र सिनेमाला मार्गदर्शन करण्याची हीच वेळ आहे, जी भारतीय सिनेमाची वाढ सुनिश्चित करू शकते. त्याच्याशिवाय सिनेमा हे दुसरे काही नसून केवळ व्यवसाय असेल.”असे ठाम मत  त्यांनी व्यक्त केले.

अभिनयाची कला आणि भारतीय सिनेमाच्या भवितव्याचा मागोवा घेणारी ही चर्चा  मनोज बाजपेयी यांच्या कलेप्रति वचनबद्धतेचा आणि समाजाचे प्रतिबिंबित आणि त्याला आकार देण्यासाठी कथाकथनाच्या सामर्थ्यावर असलेल्या विश्वासाचा दाखला होता. या आकर्षक सत्राचे सूत्रसंचालन प्रसिद्ध चित्रपट समीक्षक सुधीर श्रीनिवासन यांनी केले.

 

* * *

PIB IFFI CAST AND CREW | G.Chippalkatti/Sanjana/Sushama/Darshana | IFFI 55

iffi reel

(Release ID: 2076072) Visitor Counter : 14