माहिती आणि प्रसारण मंत्रालय
“यथोचित सन्मान न मिळालेल्या आमच्या खऱ्या नेत्याची कहाणी सांगण्यासाठी मी स्वतःच मैदानात उतरलो”: अभिनेता रणदीप हुडा याचे उद्गार
55 व्या इफ्फीमध्ये ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ या चित्रपटातील कलाकार आणि इतर तंत्रज्ञ यांनी माध्यमांशी साधला संवाद
#IFFIWood, 22 नोव्हेंबर 2024
गोवा येथे आयोजित 55 व्या इफ्फीमध्ये आज 'स्वातंत्रवीर सावरकर' या चरित्रपटाच्या निर्मितीमध्ये सहभागी असलेले कलाकार आणि तंत्रज्ञांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. या महोत्सवातील भारतीय पॅनोरमा विभागाचा उद्घाटनपर चित्रपट म्हणून या चित्रपटाचे प्रदर्शन झाले. आजच्या कार्यक्रमाने चित्रपटाचा सर्जनशील प्रवास आणि त्याचे ऐतिहासिक महत्त्व यांचा पट उलगडण्यासाठीचा मंच उपलब्ध करून दिला.
या चित्रपटात विनायक दामोदर सावरकर यांची भूमिका साकारणारे तसेच या चित्रपटाचे दिग्दर्शन करणारे अभिनेते रणदीप हूडा या चित्रपटाच्या निर्मिती प्रक्रियेत उभ्या ठाकलेल्या आव्हानांची माहिती दिली.
माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना ते म्हणाले की, यथोचित सन्मान न मिळालेल्या आमच्या खऱ्या नेत्याची कहाणी सामान्य जनतेसमोर मांडण्यासाठी मला स्वतःलाच मैदानात उतरावे लागले. “सावरकरांना नेहमीच भारताने लष्करीदृष्ट्या सामर्थ्यवान व्हावे असे वाटत होते. आज जगभरात आपले स्थान त्या बाबतीत लक्षणीयरित्या सुधारले आहे. हा चित्रपट आपल्या सशस्त्र संघर्षाच्या वेगळ्या पैलूवर भर देतो आणि क्रांतीकारकांना स्वातंत्र्य मिळवण्यासाठी शस्त्रे हाती घेण्यासाठी या पैलूने कसे प्रेरित केले याचे दर्शन घडवतो,” ते पुढे म्हणाले.
या चित्रपटात भिकाजी कामा यांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री अंजली हुडा यांनी ‘या भूमिकेने त्यांना सावरकरांचे व्यक्तिगत आयुष्य अधिक चांगले समजून घेता आले’ अशा शब्दात त्यांच्या भावना व्यक्त केल्या. “हा चित्रपट माझ्यासाठी माझे डोळे उघडणारा ठरला. विस्मृतीत हरवलेल्या आपल्या नायकांच्या आयुष्यांवर प्रकाश टाकण्यासाठी भविष्यात अशा आणखी चित्रपटांची निर्मिती होईल अशी मला आशा वाटते,” त्या म्हणाल्या.
अभिनेता जय पटेल, अभिनेता मृणाल दत्त तसेच अभिनेता अमित सियाल यांनी देखील या पत्रकार परिषदेत भाग घेतला. यावेळी त्यांनी आपापले अनुभव सामायिक केले आणि भारतीय चित्रपट विश्वात अशा आणखी चित्रपटांच्या निर्मितीचे महत्त्व ठळकपणे विशद केले.
भारताच्या स्वातंत्र्य समरातील योद्ध्यांच्या अनेक उघड न झालेल्या कहाण्यांपैकी एक असलेली वीर सावरकर यांची कहाणी हा चित्रपट आपल्याला सांगतो. सावरकर यांचे मातृभूमीवरील प्रेम आणि भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात त्यांना भोगावे लागलेले गंभीर परिणाम या चित्रपटाद्वारे आपल्या मनावर कोरले जातात.
स्वातंत्र्य वीर सावरकर : चित्रपट सारांश
भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात महत्त्वाची भूमिका बजावणारे क्रांतिकारी विचारवंत आणि कवी विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनाचे इतिवृत्त आपल्याला या चित्रपटात पाहायला मिळते. सशस्त्र विरोधाच्या बाजूने कट्टर भूमिका घेणारे क्रांतिकारक म्हणून त्यांचे झालेले परिवर्तन, त्यांचे वैचारिक संघर्ष आणि त्यांचा सेल्युलर तुरुंगवासाचा काळ यांचा हा चित्रपट शोध घेतो. वैयक्तिक जीवनातील त्याग आणि धोरणात्मक नेतृत्वाच्या माध्यमातून समर्थ आणि स्वावलंबी भारताच्या उभारणीची दूरदृष्टी असलेले एक जटील व्यक्तिमत्त्व म्हणून सावरकर आपल्यासमोर उभे राहतात.
कलाकार आणि तंत्रज्ञ
दिग्दर्शक: रणदीप हुडा
निर्माते: आनंद पंडित, सॅम खान, संदीप सिंग, योगेश राहर
पटकथा: रणदीप हुडा
कलाकार :
- रणदीप हुडा
- अंकिता लोखंडे
- अमित सियाल
- मृणाल दत्त
- जय पटेल
- अंजली हुडा
* * *
PIB IFFI CAST AND CREW | G.Chippalkatti/Sanjana/Darshana | IFFI 55
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBPanaji /PIBPanaji /pib_goa pibgoa[at]gmail[dot]com /PIBGoa
(Release ID: 2075936)
Visitor Counter : 16
Read this release in:
Gujarati
,
Telugu
,
Hindi
,
English
,
Assamese
,
Tamil
,
Bengali
,
Urdu
,
Konkani
,
Manipuri
,
Punjabi