माहिती आणि प्रसारण मंत्रालय
भारताचे सर्जनशील आशय निर्मिती क्षेत्र हे तंत्रज्ञानाचे एकात्मीकरण आणि सर्जनशील निर्मात्यांच्या मजबूत परिसंस्थेच्या विकासासह भरभराट करत राहील: इफ्फीच्या उद्घाटन समारंभात व्हिडिओ संदेशातून केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केला विश्वास
एकत्रितपणे आपण सुनिश्चित करूया की प्रत्येक भारतीय सर्जनशील निर्मिक जागतिक कथाकार बनेल आणि भविष्यातील कथांसाठी जगाचे भारताकडे लक्ष राहील : केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव
'विकेंद्रित सर्जनशील क्रांती' - गुवाहाटी, कोची आणि इंदूर सारखी शहरे सर्जनशील निर्मितीची केंद्रे म्हणून उदयाला येत आहेत: केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव
#IFFIWood, 20 नोव्हेंबर 2024
“भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी ) हा भारतीय चित्रपट उद्योगाच्या विकासात एक महत्त्वपूर्ण मैलाचा दगड ठरला आहे. सर्जनशील आशय निर्मिती क्षेत्र अर्थव्यवस्था विकसित करण्यावर भारताने लक्ष केंद्रित केले आहे, जी चैतन्यशील असून वेगाने विकसित होत आहे,” असे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज गोव्यात आयोजित 55 व्या (इफ्फी) च्या दिमाखदार उद्घाटन समारंभात व्हिडिओ संदेशात सांगितले.
केंद्रीय मंत्र्यांनी भारताचे सर्जनशील आशय निर्मिती क्षेत्र हे आर्थिक विकासात योगदान देणारी आणि देशाच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडवणारी गतिशील शक्ती असल्याचे अधोरेखित केले. “भारताच्या वैविध्यपूर्ण संस्कृती, पाककृती, समृद्ध वारसा आणि भारतीय साहित्य आणि भाषा मनोरंजक आणि सर्जनशील मार्गांनी उलगडून दाखवणारी नाविन्यपूर्ण आशय सामग्री लेखक घेऊन येत असून आशय निर्मात्यांना सशक्त करणे, अभिनव कल्पनांना प्रोत्साहन देणे आणि जागतिक मंचावर सांस्कृतिक मुत्सद्देगिरीचे प्रयत्न भारताने सुरू ठेवले आहेत ,” असे त्यांनी नमूद केले.
भारताची अनोखी ओळख प्रतिबिंबित करताना जागतिक प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या कथा लिहिण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांनी सर्जनशील आशय निर्मिकाना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ घेण्याचे आवाहन केले. " तंत्रज्ञानाचे एकात्मीकरण आणि सर्जनशील निर्मात्यांच्या मजबूत परिसंस्थेच्या विकासासह भारताचे सर्जनशील क्षेत्र भरभराट करत राहील असा आम्हाला विश्वास आहे " असे ते म्हणाले.
त्यांनी सर्व चित्रपट प्रेमी, चित्रपट निर्माते आणि इफ्फी प्रतिनिधींना हार्दिक निमंत्रण दिले आणि आशा व्यक्त केली की हा महोत्सव सर्जनशील मनांसाठी नवीन भागीदारी आणि सहकार्याला चालना देईल . “आम्हाला आशा आहे की युवा आशय निर्मात्यांना येथे योग्य मार्गदर्शन आणि अनुभव मिळेल. या कार्यक्रमादरम्यान सामायिक केलेल्या कल्पना आगामी वर्षातील उद्योगाची दिशा ठरवण्यास मदत करतील,” असे ते पुढे म्हणाले.
भारताची सर्जनशील निर्मिती क्षेत्रविषयक अर्थव्यवस्था : एक जागतिक महासत्ता
आज प्रसिद्ध झालेल्या लेखामध्ये अश्विनी वैष्णव यांनी भारताच्या सर्जनशील निर्मिती क्षेत्रविषयक अर्थव्यवस्थेच्या वाढीचा मार्ग विशद केला. भारताच्या सर्जनशील निर्मिती क्षेत्र अर्थव्यवस्थेचा झपाट्याने विस्तारत होत आहे, सध्या ही उलाढाल 30 अब्ज अमेरिकी डॉलर्स इतकी असून जीडीपी अर्थात सकल राष्ट्रीय उत्पन्नातील वाटा 2.5% आहे आणि त्यावर 8 टक्के मनुष्यबळाची उपजीविका चालते. केवळ इन्फ्लुएंसर मार्केटिंग अर्थात प्रभावशाली विपणन क्षेत्राचे मूल्य 3 हजार 375 कोटी रुपये असून 200,000 हून अधिक पूर्ण-वेळ आशयनिर्माते भारताच्या जागतिक बाजारपेठेत आपले योगदान देत आहेत, असे त्यांनी नमूद केले आहे. गुवाहाटी, कोची आणि इंदूर सारखी शहरे नवीन सर्जनशील आशय निर्मिती केंद्र म्हणून उदयाला येत आहेत आणि देशभरात एका विकेंद्रित सर्जनशील क्रांतीला चालना देत आहेत, असे त्यांनी अधोरेखित केले.
भारताच्या सर्जनशील निर्मिती क्षेत्रविषयक उद्योगांचा व्यापक प्रभाव वैष्णव यांनी अधिक ठळकपणे सांगितला. या उद्योगांचा परिणाम केवळ जीडीपीच्या वृद्धीइतका मर्यादित नसून बॉलीवूड, प्रादेशिक चित्रपट आणि इतर सांस्कृतिक घडामोडी या भारताच्या जागतिक सॉफ्ट पॉवरला आकार देण्यात महत्वाची भूमिका बजावत आहे.
वेव्स (WAVES) ही जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन परिषद म्हणजे देशाला सर्जनशील आशय निर्मिती आणि नवोन्मेष या क्षेत्रातली जागतिक महासत्ता म्हणून ओळख मिळवण्याच्या दिशेने टाकलेले एक ऐतिहासिक पाऊल आहे याचा त्यांनी पुनरुच्चार केला. सातत्याने नवनिर्मिती करणाऱ्यांचे, एकत्रित प्रयत्नांना साथ देणाऱ्यांचे आणि नवोन्मेषाची कास धरणाऱ्यांचे भविष्य उज्ज्वल आहे. भारताच्या सर्जनशील निर्मिती क्षेत्रविषयक अर्थव्यवस्थेला आर्थिक विकास, सांस्कृतिक मुत्सद्देगिरी आणि जागतिक नेतृत्वाला चालना देणारी प्रेरणा म्हणून घडवूया. चला एकत्रितपणे कार्य करूया आणि प्रत्येक भारतीय सर्जक जागतिक पातळीवरील उत्कृष्ट कथाकार म्हणून नावारूपाला येईल आणि संपूर्ण जग भारताकडे भविष्याला आकार देणाऱ्या कथांचा देश म्हणून मोठ्या आशेने पाहील याची खात्री करूया, असे वैष्णव यांनी आपल्या लेखातनमूद केले आहे.
भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इफ्फी या आठ दिवसांच्या महोत्सवाच्या उदघाटनाचे औचित्य साधून लिहिलेल्या लेखामध्ये वैष्णव यांनी जागतिक सर्जनशील निर्मिती क्षेत्रविषयक अर्थव्यवस्थेचे नेतृत्व करण्यासाठी भारतातील सर्जकांच्या भूमिकेवर भर दिला. भारताचे सर्जक जागतिक सर्जनशील निर्मिती क्षेत्रविषयक अर्थव्यवस्थेचे नेतृत्व करण्यास सज्ज आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.
इफ्फी महोत्सवाच्या 55व्या आवृत्तीचा प्रारंभ आज, 20 नोव्हेंबर 2024 रोजी, इफ्फीचे कायमस्वरूपी ठिकाण असलेल्या गोव्यात भव्य उद्घाटन समारंभाने झाला. नऊ दिवस चालणारा हा महोत्सव 28 नोव्हेंबर 2024 पर्यंत चालेल, ज्यामध्ये चित्रपट निर्माते आणि सर्जनशील कलाकारांना विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी आणि चित्रपटांचा आस्वाद घेण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध होईल.
* * *
PIB IFFI CAST AND CREW | JPS/Sushama /Bhakti/Darshana | IFFI 55
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBPanaji /PIBPanaji /pib_goa pibgoa[at]gmail[dot]com /PIBGoa
(Release ID: 2075284)
Visitor Counter : 32