नौवहन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

अखिल मानवतेच्या समृद्ध भवितव्याच्या भागीदारीसाठी एकमत साधण्याकरिता 'सागरमंथन' कार्यक्रम यशस्वी करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन


राष्ट्रांच्या विकासाचे आधारस्तंभ म्हणून सागरी साधनसंपत्तीचा विकास करण्यासाठी खुल्या, मुक्त आणि सुरक्षित सागरी नेटवर्कचा दृष्टिकोन पंतप्रधानांनी मांडला

कल्पनांचे आदान-प्रदान करण्यास, तसेच भवितव्याची विकासदृष्टी अधिक व्यापक करण्यास सागरमंथन कडून प्रोत्साहन मिळते- पंतप्रधान

नियमाधारित जागतिक व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी आणि शांती, विश्वास व देशा-देशांतील मैत्री दृढ करण्यासाठी सागरमंथन महत्त्वपूर्ण- पंतप्रधान

Posted On: 19 NOV 2024 5:22PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 19 नोव्‍हेंबर 2024

 

समुद्रासंबंधीच्या विविध मुद्द्यांवर विचारमंथन करण्यासाठी प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या 'सागरमंथन- महासागरविषयक संवाद' या कार्यक्रमाच्या यशस्वितेचे कौतुक करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संदेश प्रसारित केला आहे. नवी दिल्लीत याचे आयोजन करण्यात आले. अखिल मानवतेच्या समृद्ध भवितव्याच्या भागीदारीसाठी सहमती साधण्याकरिता 'सागरमंथन' कार्यक्रम यशस्वी करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. 

पंतप्रधान मोदी यांनी नायजेरियातील कॅम्प ऑफिस येथून हा संदेश पाठवला आहे. त्यात ते म्हणतात- "हिंदी महासागर असो की हिंद-प्रशांत क्षेत्र, खुल्या, मुक्त आणि सुरक्षित सागरी नेटवर्कचा आपला दृष्टिकोन जगभर सर्वत्र प्रतिध्वनित होत आहे. 'हिंद-प्रशांत महासागरी उपक्रमामध्ये' सर्व देशांच्या विकासासाठी आधारस्तंभ म्हणून  समुद्री साधनसंपत्ती विचारात घेण्याचा दृष्टिकोन स्वीकारण्यात आला आहे. महासागरांवरील या संवादसत्रामुळे नियमाधारित जागतिक व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी आणि शांती, विश्वास व देशा-देशांतील मैत्री दृढ करण्यासाठी मदत होणार आहे. 2047 पर्यंत विकसित भारताच्या निर्मितीचे आपले स्वप्न साकारण्यासाठी आपले प्रयत्न जोर धरत असताना, 'सागरमंथन'सारखी संवादसत्रे मतैक्य आणि भागीदारी निर्माण करण्यात तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे समृद्ध भवितव्याच्या निर्मितीत अमूल्य योगदान देतात. सर्व भागधारकांच्या एकत्रित प्रयत्नांच्या बळावर, या ऊहापोहाचे दूरगामी परिणाम होऊन उज्ज्वल आणि एकमेकांशी अधिक जोडलेल्या जगाची निर्मिती भविष्यात होईल, याची मला खात्री आहे."

भारताचा समृद्ध सागरी वारसा आणि या क्षेत्राच्या उभारणीसाठीचे प्रयत्न अधोरेखित करताना पंतप्रधान म्हणतात, "भारताच्या सागरी परंपरेला सहस्रावधी वर्षांचा वारसा आहे आणि ती जगातील सर्वात संपन्न परंपरांपैकी एक आहे. बंदरांमुळे भरभराटीला आलेली लोथल आणि धोलावीरा ही नगरे, चोल राजवटीचे नौकांचे ताफे, छत्रपती शिवाजी महाराजांचे सुसज्ज आरमार या सर्वांतून सर्वोच्च  प्रेरणा मिळते. आंतराष्ट्रीय व्यापाराची जीवनवाहिनी असणारे महासागर म्हणजे देशांचा आणि मानवसमूहांचा सामायिक वारसा होय. आज राष्ट्रांची सुरक्षा आणि समृद्धी यांचे महासागरांशी घनिष्ट नाते आहे. महासागरांचे सामर्थ्य ओळखून भारताच्या सागरी क्षमता उंचावण्यासाठी विविध परिवर्तनकारी पावले उचलण्यात आली आहेत. गेल्या दशकभरात, 'समृद्धीची बंदरे', 'प्रगतीसाठी बंदरे' आणि 'उत्पादकतेसाठी बंदरे' या दृष्टिकोनाच्या आधारे आपण आपल्या बंदरांची क्षमता दुप्पट केली आहे. बंदरांची कार्यक्षमता वाढवून, मालाची चढ-उतार प्रक्रिया पूर्ण करण्याचा (टर्नअराउंड) कालावधी कमी करून आणि द्रुतगती मार्ग, रेल्वे आणि नद्यांच्या नेटवर्कच्या मदतीने अगदी शेवटच्या टोकापर्यंत दळणवळण व्यवस्था मजबूत करून आपण भारताच्या किनारपट्टी भागांत परिवर्तन घडवून आणले आहे."

सागरी क्षेत्रात परिवर्तन घडवून आणण्याचे सर्वोच्च महत्त्व लक्षात घेऊन, सागरमंथन या पहिल्याच सत्राच्या यशस्वितेसाठी सौहार्दपूर्ण संदेश दिल्याबद्दल केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. पंतप्रधानांच्या संदेशाबद्दल सोनोवाल म्हणतात- "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अष्टपैलू नेतृत्वात भारताच्या सागरी क्षेत्रात क्रांती घडून येत आहे. विचारांचे नेतृत्व करण्यास दिशा देणाऱ्या सागरमंथन या पहिल्याच संवादसत्राचा आशयच पंतप्रधानांच्या संदेशातून साररूपाने दिसून येत आहे. त्यांनी विकसित भारताचा आराखडा स्वतःच्या शब्दात मांडत, सहयोग आणि प्रयत्न यातून समृद्धीची दिशा कशी मिळेल, हे सांगितले आहे. या मंचाच्या यशस्वी  आयोजनासाठी अथक प्रयत्न करणाऱ्या सर्वांच्या वतीने मी, जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते असणाऱ्या पंतप्रधान मोदी यांच्या या दूरदर्शी  संदेशाबद्दल, दूरदृष्टीबद्दल त्यांचे आभार मानतो."

 

 

 

* * *

N.Chitale/J.Waishampayan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2074681) Visitor Counter : 20