पंतप्रधान कार्यालय
"सामाजिक समावेशकता आणि उपासमार व गरीबी विरोधात लढा" या विषयावरील जी 20 सत्रात पंतप्रधानांचे भाषण
Posted On:
18 NOV 2024 10:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 नोव्हेंबर 2024
महामहिम,
नमस्कार !
सुरुवातीलाच, जी 20 शिखर परिषदेच्या आयोजनासाठी केलेल्या उत्तम व्यवस्थेबद्दल तसेच यशस्वी जी 20 अध्यक्षतेसाठी अध्यक्ष लुला यांचे अभिनंदन करू इच्छितो.
नवी दिल्ली येथे झालेल्या जी 20 शिखर परिषदेत घेण्यात आलेले लोककेंद्रित निर्णय ब्राझीलच्या अध्यक्षपदाच्या काळात पुढे नेण्यात आले आहेत.
आपण शाश्वत विकास उद्दिष्टांना प्राधान्य दिले ही अत्यंत समाधानाची बाब आहे.
आपण सर्वसमावेशक विकास, महिला-प्रणित विकास आणि युवा शक्ती यावर लक्ष केंद्रित केले.
आणि ग्लोबल साऊथच्या आशा आणि आकांक्षांना बळ दिले.
हे स्पष्ट आहे की या शिखर परिषदेतही एक पृथ्वी एक कुटुंब एक भविष्य गेल्या वर्षी प्रमाणेच प्रासंगिक आहे.
मित्रांनो,
पहिल्या सत्राच्या संकल्पनेच्या संदर्भात, मला तुम्हाला भारताचे अनुभव आणि यशोगाथा सामायिक करायच्या आहेत.
मागील 10 वर्षांमध्ये आपण 250 दशलक्ष लोकांना गरिबीतून बाहेर काढले आहे.
80 कोटींहून अधिक लोकांना मोफत अन्नधान्य दिले जात आहे.
550 दशलक्ष लोक जगातील सर्वात मोठ्या आरोग्य विमा योजनेचा लाभ घेत आहेत.
आता 70 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या 6 कोटी ज्येष्ठ नागरिकांना मोफत आरोग्य विम्याचा लाभ घेता येणार आहे.
महिला-प्रणित विकास आणि सामाजिक समावेशकतेवर आम्ही लक्ष केंद्रित करून, 300 दशलक्षहून अधिक महिला सूक्ष्म उद्योजकांना बँकांशी जोडण्यात आले आहे आणि त्यांना कर्ज मिळवून दिले आहे.
जगातील सर्वात मोठ्या पीक विमा योजनेअंतर्गत, 40 दशलक्ष शेतकऱ्यांना 20 अब्ज अमेरिकन डॉलर्सचे लाभ मिळाले आहेत.
शेतकरी योजनेंतर्गत 110 दशलक्ष शेतकऱ्यांना 40 अब्ज डॉलर्सचे सहाय्य देण्यात आले आहे.
शेतकऱ्यांना 300 अब्ज अमेरिकन डॉलर्सचे संस्थात्मक कर्ज दिले जात आहे.
भारत केवळ अन्नसुरक्षाच नव्हे तर पोषणावरही भर देत आहे.
सक्षम अंगणवाडी आणि पोषण 2.0 मोहीम हा एकात्मिक पोषण सहाय्य कार्यक्रम असून विशेषत: गर्भवती महिला, नवजात बालके, 6 वर्षांखालील मुले आणि किशोरवयीन मुलींच्या पोषणावर लक्ष केंद्रित करतो.
माध्यान्ह भोजन योजनेच्या माध्यमातून शाळेत जाणाऱ्या बालकांच्या पोषणाच्या गरजेकडे विशेष लक्ष दिले जात आहे.
जागतिक अन्न सुरक्षेतही भारत योगदान देत आहे.
आम्ही अलीकडे मलावी, झांबिया आणि झिम्बाब्वे यांना मानवतावादी मदत दिली आहे.
मित्रांनो,
आपल्या यशाचे मुख्य कारण म्हणजे आपला दृष्टीकोन: ‘मूलभूत गोष्टींकडे परता’ आणि ‘भविष्याकडे कूच’.
आम्ही केवळ नैसर्गिक शेती आणि सेंद्रीय शेतीवरच लक्ष केंद्रित केले नाही तर नवीन तंत्रज्ञानावरही लक्ष केंद्रित केले आहे.
श्री अन्न किंवा भरड धान्याला प्रोत्साहन देऊन आम्ही शाश्वत शेती, पर्यावरणाचे संरक्षण, पोषण आणि अन्न सुरक्षा यावर लक्ष केंद्रित केले आहे.
आम्ही हवामानाला अनुकूल असणारी पिकांची 2000 हून अधिक वाणे विकसित केली आहेत आणि ‘डिजिटल कृषी अभियान’ सुरू केले आहे.
भारताच्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांनी सामाजिक आणि आर्थिक समावेशन सक्षम केले आहे.
आकांक्षी जिल्हे आणि तालुके प्रकल्पाद्वारे आम्ही सर्वसमावेशक विकासासाठी एक नवीन प्रारुप तयार केले जे सर्वात कमकुवत दुवा मजबूत बनवते.
मित्रांनो,
आम्ही "भूक आणि गरिबी विरुद्ध जागतिक आघाडी" करिता ब्राझीलच्या उपक्रमाला पाठिंबा देत आहोत.
नवी दिल्ली शिखर परिषदेत स्वीकारण्यात आलेल्या, अन्नसुरक्षेसाठी दक्षिणी उच्चस्तरीय तत्त्वांच्या अंमलबजावणीच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.
मित्रांनो,
शेवटी, मी असे सांगू इच्छितो की जागतिक स्तरावरच्या संघर्षांमुळे निर्माण झालेल्या अन्न, इंधन आणि खतांच्या संकटाचा सर्वाधिक विपरित परिणाम ग्लोबल साऊथ मधील देशांवर होतो आहे.
म्हणून आमची चर्चा तेव्हाच यशस्वी होऊ शकते जेव्हा आपण ग्लोबल साऊथमधील आव्हाने आणि प्राधान्यक्रम लक्षात ठेवू.
आणि ज्याप्रमाणे आम्ही नवी दिल्ली शिखर परिषदेत आफ्रिकन युनियनला जी-20 चे कायमचे सदस्यत्व देऊन ग्लोबल साऊथची स्थिती भक्कम बनवली, त्याचप्रमाणे आम्ही जागतिक प्रशासन संस्थांमध्येही सुधारणा करू.
मला खात्री आहे की पुढील सत्रात या विषयावर आणखी सविस्तर आणि सकारात्मक चर्चा होईल.
खूप खूप धन्यवाद.
* * *
S.Patil/Sushma/Shraddha/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2074433)
Visitor Counter : 30
Read this release in:
Odia
,
Hindi
,
Assamese
,
Gujarati
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam
,
Urdu
,
Telugu
,
Manipuri
,
Punjabi
,
English