माहिती आणि प्रसारण मंत्रालय
“सर्वोत्कृष्ट वेब मालिका पुरस्कार: सिनेमाच्या वैविध्यातील प्रगती साजरा करणारा इफ्फीचा उपक्रम”
“इफ्फी 2024 मध्ये ओटीटी मंचावरील पाच मालिकांमध्ये पुरस्कारासाठी स्पर्धा”
“ओव्हर द टॉप क्रांती इफ्फी 2024 च्या केंद्रस्थानी”
55 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाने (इफ्फी) मनोरंजन उद्योगाचा प्रगती करणारा वेग स्वीकारून सिनेमातील उत्कृष्टता साजरी करण्याची परंपरा सुरु ठेवली आहे. डिजिटल सामग्रीमध्ये येत असलेली सर्जकतेची लाट ओळखून 54 व्या इफ्फीमध्ये सुरु करण्यात आलेल्या सर्वोत्कृष्ट वेब (ओटीटी) मालिका पुरस्काराने ओटीटी मंचांवरील असामान्य कथाकथनाचा सन्मान करण्यात महत्त्वाचा परिवर्तनकारक टप्पा गाठला आहे.
या पुरस्कारासाठी यावर्षी 10 प्रमुख ओटीटी मंचांवरील मालिकांच्या सादर झालेल्या अर्जांच्या संख्येत गेल्या वर्षीपेक्षा 40% पेक्षा जास्त वाढ झाली असून यातून या पुरस्काराला अधिक लोकप्रियता मिळत असल्याचे दिसते. भारताच्या मनोरंजन विश्वात वेब आधारित सामग्रीचे वाढते आधिक्य स्पष्टपणे दिसून येते. या वर्षी या पुरस्कारासाठी खालील पाच वेब मालिकांची नामांकने निश्चित करण्यात आली असून त्यांची कलात्मक प्रतिभा, कथाकथनातील कौशल्य, तांत्रिक उत्कृष्टता आणि सांस्कृतिक प्रभाव यांचा कस लागणार आहे:
कोटा फॅक्टरी: जीवनाच्या एका पैलूचे दर्शन घडवणारी ही मालिका भारतातील स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठीचे महत्वाचे केंद्र असलेल्या राजस्थानच्या कोटा येथील मोठ्या प्रमाणातील तणावाच्या शैक्षणिक वातावरणाचा शोध घेते. शैक्षणिक आव्हानांचा सामना करणाऱ्या युवा विद्यार्थ्यांचे संघर्ष, आकांक्षा आणि लवचिकतेचे मार्मिक दर्शन या मालिकेतून घडते.
निर्मिती: सौरभ खन्ना
ओटीटी मंच: नेटफ्लिक्स
काला पानी: ही मालिका म्हणजे अंदमानच्या देखण्या बेटांवर घडणारे, जिवंत राहण्यासाठी केल्या जाणाऱ्या, वेदनेने पिळवटून टाकणाऱ्या नाट्याचे चित्रण आहे. कुटुंब, इतिहास आणि व्यक्तिगत शोध यांच्या एकमेकात गुंतलेल्या संकल्पनांतून ही मालिका भावनिक खोली असलेली लक्षवेधक कथा सादर करते.
निर्मिती: समीर सक्सेना आणि अमित गोलाणी
ओटीटी मंच: नेटफ्लिक्स
लंपन: ही मालिका म्हणजे ग्रामीण भारतात घडणारी आणि एका लहान मुलासमोरील भावनिक आणि सामाजिक आव्हानांवर लक्ष केंद्रित करणारी एक हृदयस्पर्शी कथा आहे. समाज, स्वतःची ओळख आणि स्व-सक्षमीकरण या संकल्पनांवर भर देणारी ही मालिका तजेलदार कथाकथन आणि चित्रपटीय अभिजातता यांसह सादर करण्यात आली आहे.
निर्मिती : निपुण धर्माधिकारी
ओटीटी मंच: सोनी लिव्ह
अयाली: सामाजिक भान दर्शवणाऱ्या या नाट्यमय मालिकेतून पुराणमतवादी समाजातील महिलांच्या जीवनाची सफर घडते. परंपरा, समाजाच्या अपेक्षा यांच्या उभ्या आडव्या छेदांतून ही मालिका व्यक्तिगत स्वातंत्र्याचा शोध घेते
निर्माता: मुथूकुमार
ओटीटी मंच: झी5
ज्युबिली : भारतीय चित्रपट सृष्टीच्या सुवर्णकाळाला आदरांजली वाहणारे हे कथानक स्वातंत्र्योत्तर काळात घडते. ही मालिका, चित्रपट निर्माते आणि चित्रपट सृष्टीतील तारे तारका यांच्या आकांक्षा, संघर्ष आणि स्वप्नांचे यथार्थ चित्रण करून आकर्षक कथाकथनासह त्या काळाची ओढ गहिरी करते.
निर्माता : विक्रमादित्य मोटवाने
ओटीटी मंच: अमेझॉन प्राईम व्हिडीओ
महोत्सवाच्या पारितोषिक वितरण सोहोळ्यात विजेत्या मालिकेचे दिग्दर्शक, सर्जक आणि निर्माते यांच्यासह संबंधित ओटीटी मंचाचा देखील सन्मान करण्यात येईल. विजेत्यांना त्यांच्या अत्युत्कृष्ट योगदानाबद्दल 10 लाख रुपयांचे रोख बक्षीस आणि प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात येईल.
भारतातील ओटीटी क्रांतीसाठी प्रेरक
सदर पुरस्कार मनोरंजन क्षेत्रातील सर्जनशीलता आणि नाविन्य यांची जोपासना करण्याप्रती इफ्फीच्या वचनबद्धतेवर भर देतो. भारतीय भाषांमध्ये उत्तम दर्जाच्या सामग्रीच्या निर्मितीला प्रोत्साहन देऊन तसेच जागतिक निर्माते आणि मंचांमधील सहयोगाची जोपासना करून भारताला डिजिटल कथाकथनाचे प्रमुख केंद्र म्हणून प्रस्थापित करणे हे इफ्फीचे उद्दिष्ट आहे.
पारंपरिक चित्रपटांपासून ते चैतन्यमय ओटीटी’पर्यंत प्रत्येक क्षेत्रातील वैविध्यपूर्ण चित्रपटीय अभिव्यक्तींचा समर्थक म्हणून या महोत्सवाची भूमिका दृढ करत 55 व्या इफ्फी दरम्यान विजेत्या वेब मालिकेच्या नावाची घोषणा करण्यात येईल.
***
M.Pange/S.Chitnis/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2073924)
Visitor Counter : 62