गृह मंत्रालय
सोमवारी होणाऱ्या 'राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणा'च्या (एनडीएमए) 20 व्या स्थापना दिनाच्या उद्घाटन समारंभाला केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती
Posted On:
26 OCT 2024 6:32PM by PIB Mumbai
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह सोमवारी,28 ऑक्टोबर 2024 रोजी नवी दिल्ली येथे एनडीएमए अर्थात राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या 20व्या स्थापना दिनाच्या उद्घाटन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
‘वर्तनात्मक बदलांच्या जागरूकतेद्वारे आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी समुदायांचे सक्षमीकरण’ ही या वर्षाच्या स्थापना दिनाची संकल्पना आहे. या संकल्पनेद्वारे आपत्ती-प्रवण भागात राहणाऱ्या समुदायांमध्ये वर्तनात्मक बदल घडवून आणण्यासाठी जागरूकता निर्माण करण्यावर भर दिला जाणार आहे. तसेच आपत्ती जोखीम कमी करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रेरणा दिली जाणार आहे. यावेळी मुख्य संकल्पनेवर आधारित तीन तांत्रिक सत्रांचे आयोजन केले जाणार आहे:
i) ‘हवामान बदलांच्या स्थितीला तोंड देणाऱ्या समुदायांच्या समस्यांना वाचा फोडणे’
ii) ‘आपत्ती जोखीम कमी करणे: शेवटच्या टप्प्यापर्यंत प्रभावी संप्रेषणासाठी तंत्रज्ञान’
iii) ‘मंद गतीने होणारे हवामान बदल, हवामान बदलावर जागरूकता आणि आपत्ती जोखीम कमी करणे’.
याशिवाय, विविध आपत्ती विषयांवर मार्गदर्शक, मानक कार्यप्रणाली आणि पुस्तके यांचे प्रकाशन देखील करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाला केंद्रीय आणि राज्य मंत्रालयांतील वरिष्ठ अधिकारी, आंतरराष्ट्रीय/संयुक्त राष्ट्र संघटनेचे प्रतिनिधी, प्रशासक, आपत्ती व्यवस्थापन तज्ञ, एनजीओचे सदस्य आणि देशभरातील आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रातील प्रमुख भागधारक सहभागी होणार आहेत. या मान्यवरांव्यतिरिक्त, आपदा मित्र स्वयंसेवक, नेहरू युवा केंद्र संघटना (एनवायकेसी), राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी), राष्ट्रीय सेवा योजना (एन एस एस), भारत स्काउट्स आणि गाइड्स (बीएसजी) यांना देखील या भव्य कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.
***
S.Patil/G.Deoda/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2068568)
Visitor Counter : 24