मत्स्योत्पादन, पशुविकास आणि दुग्धविकास मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाकडून 'भारतात जिवंत समुद्री शैवाल आयात करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे' अधिसूचित

Posted On: 25 OCT 2024 3:43PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 25 ऑक्टोबर 2024

मत्स्यव्यवसाय,पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाने एक महत्त्वाचा निर्णय घेत 'भारतात जिवंत समुद्री शैवाल आयात करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे' अधिसूचित केली आहेत.परदेशातून उच्च-गुणवत्तेची बियाणे सामग्री किंवा जर्मप्लाझम आयात करणे या मार्गदर्शक तत्वांमुळे सुलभ होईल,ज्यामुळे शेतकऱ्यांना दर्जेदार बियाण्यांच्या साठ्याची उपलब्धता सुनिश्चित होऊन उत्पादनात गुणाकारात्मक वाढ होईल. सध्या,भारतातील समुद्री शैवाल उद्योगांच्या वाढीसाठी व्यावसायिकदृष्ट्या मौल्यवान प्रजातींच्या बियाण्यांची पुरेशा प्रमाणातील उपलब्धता आणि सर्वसामान्यतः शेती केली जाणाऱ्या कप्पाफायकस या  समुद्री शैवाल प्रजातींच्या बियाण्याच्या सामग्रीमध्ये घटत्या  गुणवत्तेचे आव्हान आहे.

जिवंत समुद्री शैवाल आयात करण्याच्या प्रक्रियेचा आराखडा या मार्गदर्शक तत्वांनी आखून दिला जात आहे, ज्यामध्ये पारदर्शकता आणि उत्तरदायित्व सुनिश्चित करणाऱ्या, त्यांच्यासोबत कीटक आणि रोगजंतूसुद्धा येऊ नयेत यासाठीची कडक विलगीकरण प्रक्रिया आणि संभाव्य जैवसुरक्षाविषयक समस्येची जोखीम विचारात घेण्यासाठी जोखीम मूल्यमापन आणि सध्या होत असलेल्या देखरेखीला आणि जोखीम मूल्यमापनाला बळकट करणारी आयात पश्चात देखरेख यासाठीच्या  एका स्पष्ट नियामक चौकटीचा समावेश आहे. या मार्गदर्शक तत्वांमुळे सागरी शैवालाच्या जबाबदार लागवडीला प्रोत्साहन मिळेल आणि पर्यावरणीय शाश्वतता आणि आर्थिक वृद्धी सुनिश्चित  होईल. त्याशिवाय नव्या सागरी शैवाल तंतूच्या आयातीमुळे संशोधन आणि विकासाला चालना मिळेल. परिणामी लाल, तपकिरी आणि हिरव्या रंगाच्या सागरी शैवालाच्या विविध प्रकारांच्या उत्पादनात वाढ होईल आणि त्यामुळे उत्पादनानंतरच्या पुढच्या टप्प्यात सागरी शैवालाच्या प्रक्रिया पद्धतींचा मार्ग मोकळा होईल आणि या उद्योगात मूल्यवर्धन होईल ग्रामीण जनतेला चरितार्थाचे एक अतिरिक्त साधन उपलब्ध होईल तर या उत्पादनाची देशाची एकंदर निर्यात वाढेल.

मार्गदर्शक तत्त्वांनुसार, जिवंत समुद्री शैवाल भारतात आयात करण्यासाठी, आयातदार मत्स्यव्यवसाय विभागाकडे तपशीलवार अर्ज सादर करू शकतात, ज्यांचे भारतीय जलक्षेत्रात विदेशी जलीय प्रजातींना समाविष्ट  करण्याच्या राष्ट्रीय समितीद्वारे पुनरावलोकन केले जाईल. मंजुरी मिळाल्यावर, विभाग चार आठवड्यांच्या आत आयात परवाना  जारी करेल, ज्यामुळे उच्च-गुणवत्तेच्या सागरी शैवाल जर्मप्लाझमची आयात सुलभ होईल.

अशा प्रकारे ही  मार्गदर्शक तत्त्वे ही प्रक्रिया सुरक्षितपणे, सुरळीतपणे आणि जबाबदारीने अंमलात यावी हे सुनिश्चित करून, भारतात जिवंत समुद्री शैवाल आयात करण्यासाठी सर्वसमावेशक नियामक चौकट उपलब्ध करत आहे.

N.Chitale/S.Patil/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(Release ID: 2068089) Visitor Counter : 61