शिक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांची घेतली भेट : ‘प्रतिभा, संसाधन आणि बाजारपेठेच्या’ माध्यमातून भारत आणि सिंगापूर मधील भागीदारी होत आहे मजबूत

Posted On: 21 OCT 2024 5:32PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 21 ऑक्टोबर 2024

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांची भेट घेतली.

दोन्ही देशांमधील शालेय शिक्षण, व्यावसायिक शिक्षण आणि संशोधन या क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्य वृद्धिंगत करून त्याची व्याप्ती वाढवण्यावर मंत्र्यांनी सांगोपांग चर्चा केली. ‘प्रतिभा, संसाधन आणि बाजारपेठ’ या तीन प्रमुख स्तंभांद्वारे भागीदारी मजबूत करण्यावर या चर्चेचा भर होता.

विशेषत: गहन तंत्रज्ञान, स्टार्टअप्स आणि नवोन्मेष परिसंस्थेत प्रगती करण्यात भारत सिंगापूरकडे विश्वासार्ह ज्ञान भागीदार म्हणून पाहतो यावर प्रधान यांनी भर दिला.

तत्पूर्वी सकाळी प्रधान यांनी सिंगापूरचे शिक्षण मंत्री चान चुन सिंग यांची भेट घेतली आणि शिक्षणाच्या विविध क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय सहकार्य मजबूत करण्यावर चर्चा केली.

उभय देशांतील विद्यार्थ्यांमधील सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करण्यासाठी भारत आणि सिंगापूरमधील शाळा संलग्न करण्याच्या शक्यतेवर चर्चा करण्यात आली. सखोल तंत्रज्ञान, औषधोपचार, आगाऊ साहित्य इत्यादी परस्पर हिताच्या क्षेत्रात संयुक्त संशोधन सहकार्यावरही विचारमंथन झाले.

दोन्ही देशांतील शाळा आणि विद्यापीठे संलग्न करून त्या माध्यमातून शैक्षणिक आणि संशोधन सहकार्य वाढविण्यावरही विचारविमर्श झाला.

मंत्री चॅन यांना भारतभेटीचे निमंत्रण देताना प्रधान यांनी सामायिक उद्दिष्टे पुढे नेण्यासाठी आणि उभय देशांमधील शैक्षणिक संबंध वृद्धिंगत करण्यात त्यांची बांधिलकी व्यक्त केली.

भारत-सिंगापूर ज्ञान भागीदारी अधिक दृढ करण्यावर चर्चा करण्यासाठी प्रधान यांनी सिंगापूरचे परराष्ट्र व्यवहार मंत्री विवियन बालकृष्णन यांचीही भेट घेतली.

शिक्षण क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्य वाढवण्यासाठी आणि सामायिक उद्दिष्टे साध्य करण्यात सहयोगी प्रयत्न व्यापक करण्याकरिता समन्वयातून काम करण्याच्या महत्त्वावर उभय नेत्यांनी भर दिला.

प्रधान यांनी नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूरलाही भेट दिली आणि विद्यापीठाचे अध्यक्ष प्रा. टॅन इंग च्ये यांची भेट घेतली. ज्ञान सेतू निर्मितीत, शैक्षणिक आणि संशोधन सहकार्य मजबूत करण्यासाठी आणि सर्व शैक्षणिक आघाड्यांवरील सिंगापूर राष्ट्रीय विद्यापीठ आणि सर्वोच्च भारतीय उच्च शिक्षण संस्थांमधील संलग्नता वाढवण्याकरिता पूरक शक्तींचा लाभ घेण्यावर त्यांनी चर्चा केली.

प्रधान यांनी त्यांच्या दौऱ्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे 20 ऑक्टोबर 2024 रोजी सिंगापूरमधील भारतीय समुदायासोबत संवाद साधला.

N.Chitale/V.Joshi/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(Release ID: 2066744) Visitor Counter : 47