रेल्वे मंत्रालय
बाल तस्करीच्या विरोधात जनजागृती करण्यासाठी रेल्वे संरक्षण दल वेदांत दिल्ली अर्ध-मॅरेथॉनमध्ये होणार सहभागी
Posted On:
19 OCT 2024 3:23PM by PIB Mumbai
20 ऑक्टोबर 2024 रोजी होणाऱ्या वेदांत दिल्ली अर्ध-मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्याची घोषणा रेल्वे संरक्षण दलाने (RPF) केली आहे. या अर्ध-मॅरेथॉन सहभागी होणाऱ्या 26 समर्पित आरपीएफ सदस्यांच्या चमूचे नेतृत्व आरपीएफ’चे महासंचालक मनोज यादव करतील. देशभरातील संपूर्ण रेल्वे मार्गावर मुलांची तस्करी रोखण्याचे प्रयत्न अधोरेखित करत या संदर्भात जागरूकता निर्माण करण्याच्या हेतूने आरपीएफ’चा चमू या मॅरेथॉनमध्ये सहभागी होणार आहे.
बाल तस्करी रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांबद्दल लोकांना अवगत करणे आणि नागरिकांना या धोक्याविरुद्धच्या लढ्यात सामील होण्याचे आवाहन करणे हे आरपीएफ च्या या अर्ध-मॅरेथॉनमधील सहभागाचे मुख्य उद्दिष्ट आहे. "आमचे ध्येय: रेल्वे द्वारे होणारी बाल तस्करी रोखणे" या घोषवाक्यासह, मुलांचे शोषण आणि अत्याचारापासून संरक्षण करण्यासाठी सामूहिक कारवाईची गरज यावर भर देण्याचे आरपीएफ’चे उद्दिष्ट आहे.
आरपीएफ’ची ताकद, एकता आणि वचनबद्धतेचे प्रतीक असलेल्या या कार्यक्रमात सर्व संघ सदस्य या उदात्त हेतूने अर्ध-मॅरेथॉनमध्ये धावतील. सार्वजनिक सहभाग वाढवण्यासाठी, रेल्वे भवनाजवळ मॅरेथॉन मार्ग परिसरात आरपीएफ बँड आपला कलाविष्कार सादर करेल. यामुळे मॅरेथॉनमधील धावक तसेच प्रेक्षकांसाठी परस्परसंवादी आणि आश्वासक वातावरण तयार होईल.
या महत्त्वपूर्ण उपक्रमाला पाठिंबा देण्याचे आणि मुलांच्या तस्करीविरुद्ध सक्रिय भूमिका घेण्याचे आवाहन आरपीएफ’ने जनतेला केले आहे. आपण एकत्र येऊन मुलांसाठी सुरक्षित वातावरण सुनिश्चित करू शकतो तसेच देशातील रेल्वेमार्ग जाळ्याच्या माध्यमातून होणारी तस्करी नष्ट करण्यासाठी काम करू शकतो, असेही आरपीएफ’ने म्हटले आहे.
***
M.Pange/S.Mukhedkar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2066309)
Visitor Counter : 56