सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय
आय. एन. ए. दिल्ली हाट येथे 'खादी महोत्सव' अंतर्गत विशेष खादी प्रदर्शनाचे उद्घाटन
Posted On:
19 OCT 2024 9:14AM by PIB Mumbai
केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री जीतन राम मांझी यांनी खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे (केव्हीआयसी) अध्यक्ष मनोज कुमार यांच्या उपस्थितीत शुक्रवारी आय. एन. ए. दिल्ली हाट येथे विशेष खादी प्रदर्शनाचे उद्घाटन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'व्होकल फॉर लोकल' आणि 'आत्मनिर्भर भारत' या अभियानांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच खादी कारागिरांचे उत्पन्न वाढवण्यासाठी देशव्यापी 'खादी महोत्सवा'चा एक भाग म्हणून सणासुदीच्या काळात हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. केव्हीआयसी, नवी दिल्लीच्या राज्य कार्यालयाद्वारे आयोजित हे विशेष खादी प्रदर्शन 31 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे.
या प्रदर्शनात महाराष्ट्र, दिल्ली, राजस्थान, बिहार, तामिळनाडू, गुजरात, ओडिशा, मध्य प्रदेश, बंगाल, हरियाणा आणि जम्मूसह विविध राज्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 55 खादी संस्था आणि 102 ग्रामोद्योगांचे 157 स्टॉल्स आहेत. साड्या, तयार कपडे, हस्तकला, हर्बल आणि आयुर्वेदिक उत्पादने, चामड्याच्या वस्तू, हाताने तयार केलेली कागदी उत्पादने, लोणची, मसाले, साबण, शॅम्पू, मध यांसह खादी आणि ग्रामोद्योग उत्पादनांची विस्तृत श्रेणी प्रदर्शनात विविध स्टॉल्सवर खरेदीसाठी उपलब्ध आहेत. प्रदर्शनात सहभागी होणारे कारागीर आणि शिल्पकार त्यांच्या विविध खादी आणि ग्रामोद्योग उत्पादनांचे थेट प्रात्यक्षिक देखील सादर करतील.
उद्घाटन कार्यक्रमात माध्यमांना संबोधित करताना, प्रमुख पाहुणे केंद्रीय एमएसएमई मंत्री जीतन राम मांझी यांनी सर्व नागरिकांना खादी आणि स्थानिक उत्पादनांची जास्तीत जास्त खरेदी करण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी दिल्लीतील लोकांना त्यांच्या सणासुदीच्या खरेदीसाठी खादी प्रदर्शनाला भेट देण्याची आणि स्वदेशी खादी उत्पादने खरेदी करण्याची विशेष विनंती केली, ज्यामुळे पंतप्रधानांच्या 'व्होकल फॉर लोकल' आणि 'आत्मनिर्भर भारत' अभियानाला बळ मिळेल. ते पुढे म्हणाले की ग्रामीण कारागीर आणि पारंपारिक शिल्पकारांची आर्थिक स्थिती मजबूत करणे, त्यांचे सक्षमीकरण करणे आणि भारतीय शिल्पकलेचा वारसा जतन करणे हा या प्रदर्शनाचा व्यापक उद्देश आहे. या प्रदर्शनामुळे देशातील कारागिरांना त्यांची कला प्रदर्शित करण्यासाठी एक उत्कृष्ट व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.
अभ्यागतांना सुंदर अनुभव देण्यासाठी, प्रदर्शनात भारताच्या समृद्ध पारंपारिक कला आणि शिल्पकला यांचे थेट प्रात्यक्षिक तसेच आकर्षक सांस्कृतिक कार्यक्रम देखील सादर केले जाणार आहेत. हे केवळ एक प्रदर्शन नाही तर ग्रामीण कारागिरांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून आणि त्यांना त्यांचे हस्तकौशल्य प्रदर्शित करण्याची संधी देऊन भारताच्या स्वदेशी शिल्पकलेचे जतन करण्यात योगदान देणारे व्यासपीठ आहे.
***
M.Pange/S.Kane/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2066291)
Visitor Counter : 49