दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आंतरराष्ट्रीय मानकांबाबत सहयोगाचे जीएसएस 2024 चे आवाहन, मानवजातीसाठी सकारात्मक परिणामांवर लक्ष केंद्रित करण्याकरिता उदयोन्मुख डिजिटल तंत्रज्ञान मानकांच्या शाश्वत विकासासाठी मार्ग प्रशस्त


"आपण स्थापित केलेली मानके केवळ तांत्रिक मानके नसून नैतिक दिशादर्शक आहेत," डॉ. पेम्मासानी चंद्रशेखर, दूरसंवाद आणि ग्रामविकास राज्यमंत्री

Posted On: 15 OCT 2024 3:00PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 15 ऑक्‍टोबर 2024

 

आशिया-प्रशांत क्षेत्रात प्रथमच आयोजित पाचव्या जागतिक मानके परिसंवादाचा  (जीएसएस-24) नवी दिल्ली येथे समारोप झाला. आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाद्वारे आयोजित या ऐतिहासिक परिसंवादाचे यजमानपद भारत सरकारच्या दूरसंचार विभागाने भूषवले. या परिसंवादात जगभरातून विक्रमी 1500 अग्रणी धोरणकर्ते, नवोन्मेषक आणि तज्ज्ञ सहभागी झाले. डिजिटल तंत्रज्ञानाचे भविष्य आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानातील पुढच्या लाटेसाठी सक्षम आंतरराष्ट्रीय मानकांची महत्त्वपूर्ण भूमिका यावर चर्चा करणे, हा या परिसंवादाचा उद्देश होता. 

दूरसंवाद  आणि ग्रामविकास राज्यमंत्री डॉ. चंद्रशेखर पेम्मासानी यांनी समारोप सत्राला संबोधित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने अभूतपूर्व परिवर्तन घडवून आणले असून त्याची दखल आता जागतिक स्तरावर घेतली गेली  आहे. आंतरराष्ट्रीय मानकांचा विकास हा सर्वसमावेशक आणि लोकशाहीवादी असला पाहिजे, जो सर्व क्षेत्रांच्या गरजा प्रतिबिंबित करणारा आणि विकसनशील देशांच्या सक्रिय सहभागास प्रोत्साहित करणारा असावा, असे डॉ. चंद्रशेखर पेम्मासानी यांनी सांगितले.  आपण स्थापित केलेली मानके केवळ तांत्रिक मानके नसून नैतिक दिशादर्शक आहेत, असा विश्वास  या ऐतिहासिक परिसंवादाचा समारोप करत असताना त्यांनी व्यक्त केला. ही मानके भविष्यातील सामायिक जागतिक प्रगतीसाठी आपल्याला मार्गदर्शन करतील. भारताला केवळ एकट्याला हा प्रवास करायचा नसून आपल्या सर्वांसोबत भागीदार म्हणून भारताला हा प्रवास करायचा आहे, असे त्यांनी सांगितले. 

'चार्टिंग द नेक्स्ट डिजिटल वेव्ह: इमर्जिंग टेक्नॉलॉजीज, इनोव्हेशन अँड  इंटरनॅशनल स्टँडर्ड्स' (पुढील डिजिटल लाटेची रूपरेषा : उदयोन्मुख तंत्रज्ञान, नवोन्मेष आणि आंतरराष्ट्रीय मानके) अशी या परिसंवादाची रूपरेषा होती. उदयोन्मुख तंत्रज्ञानाचे नियमन आणि मानकीकरण यासाठी एकत्रित आणि दूरगामी दृष्टिकोनाची महत्त्वपूर्ण गरज या परिसंवादातून अधोरेखित करण्यात आली. जीएसएस हा उच्चस्तरीय मंच असून तंत्रज्ञान आणि मानकीकरण या सर्वात महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा आणि समन्वयासाठी व्यासपीठ पुरवतो. 

केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सकाळी या कार्यक्रमाचे उदघाटन केले. आपल्या भाषणात त्यांनी दूरसंवाद आणि डिजिटल नवोन्मेषासाठी जागतिक केंद्र म्हणून भारताची भूमिका अधोरेखित केली आणि विज्ञान, नवोन्मेष आणि जगाच्या समृद्धीमध्ये साहाय्य करणारी  भूमी म्हणून भारताचा इतिहास याविषयी त्यांनी सांगितले. 

या परिसंवादात एक उच्च-स्तरीय सत्र होते ज्यात उद्योगधुरीण आणि मंत्री यांच्यातील सहकार्य सुलभ केले, नवोन्मेष  आणि डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या भविष्यावर लक्ष केंद्रित केले. एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता नियमनात आंतरराष्ट्रीय मानकांची आवश्यकता यात प्रतिपादित करण्यात आली. सर्वांसाठी तंत्रज्ञानाचा समान प्रवेश सुनिश्चित करून विकसित आणि विकसनशील राष्ट्रांमधील मानकांमधील अंतर कमी करण्याच्या गरजेवर या परिसंवादाने भर दिला.

मुख्य सत्रांमध्ये मुक्त - स्त्रोत (ओपन सोर्स) तंत्रज्ञानाची भूमिका, ब्लॉकचेन - आधारित प्रमाणीकरण आणि सार्वजनिक सेवा आणि उद्योगावर कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मेटाव्हर्सचा प्रभाव यावर सविस्तर चर्चा केली गेली. तंत्रज्ञानविषयक अधिक समावेशक परिसंस्था निर्माण करण्यासाठी विकसकांसोबत भागिदारी करण्यावरही या चर्चांमध्ये भर दिला गेला.  या कार्यक्रमाचा भाग म्हणून कृत्रिम बुद्धिमत्ता मानकाविषयी शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. परस्पर सहमतीने मानकांची आखणी केली गेल्यास त्यामुळे विविध क्षेत्रांमध्ये नवोन्मेषाला कशा रितीने मोठ्या प्रमाणात चालना मिळेल, आणि पर्यायाने तंत्रज्ञान विषयक प्रगती कशी वाढू शकेल या संबंधीचे मुद्दे या परिषदेत झालेल्या चर्चांमध्ये ठळकपणे मांडण्यात आले. सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमॅटिक्सचे C-DoT) मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजकुमार उपाध्याय हे GSS2024 यांनी या परिसंवादाचे अध्यक्षस्थान भूषवले. भारत पहिल्यांदाच या परिसंवादाचे यजमानपद भूषवत आहे. जागतिक पातळीवर डिजिटल परिवर्तन घडवून आणण्यासाठी आंतरराष्ट्रीय मानकांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर भर देणाऱ्या सशक्त निर्णायक दस्तऐवजांच्या आखणीने या परिसंवादाची सांगता झाली. डॉ. उपाध्याय यांनी या परिसंवादातील निर्णायक मुद्दे उपस्थितांसमोर मांडले. यात पुढे नमूद मुद्द्यांचा अंतर्भाव होता :

  1. डिजिटल परिवर्तनाला गती देणे: आंतरराष्ट्रीय स्तरावरील मानके ही डिजिटल परिवर्तनाचे मुख्य आधारस्तंभ असतील ही बाब या परिसंवादाच्या निर्णायक दस्तऐवजांमध्ये ठळकपणे अधोरेखित केली गेली आहे.
  2. जागतिक पटलावरील दिग्गजांना एकत्र आणणे : GSS-24 या परिसंवादाच्या निमित्ताने अत्याधुनिक तंत्रज्ञाच्या बाबतीत मानकांमुळे घडून येणाऱ्या परिणामावर चर्चा करण्यासाठी या उद्योग क्षेत्रातील उद्योगातील आघाडीवर असलेल्या दिग्गज आणि धोरणकर्त्यांना एकाच व्यासपीठावर आणले.
  3. मानकांच्या माध्यमातून नवोन्मेषता: कृत्रिम बुद्धिमत्ता मानकांविषयी झालेल्या शिखर परिषदेतील चर्चांमधून परस्पर सहमतीने मानकांची आखणी केली गेल्यास, त्यामुळे विविध क्षेत्रांमध्ये नवोन्मेषाला कशा रितीने मोठ्या प्रमाणात चालना मिळेल, आणि पर्यायाने तंत्रज्ञान विषयक प्रगती कशी वाढू शकेल ही बाब ठळकपणे अधोरेखित झाली.
  4. दरी भरून काढणे : सर्वांना तंत्रज्ञानाची समान उपलब्धता सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने विकसित आणि विकसनशील राष्ट्रांमधील मानकांच्या आखणीतील दरी भरून काढण्यावर या परिसंवादात भर देण्यात आला.
  5. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मेटाव्हर्सचा प्रभावी वापर: GSS-24 या परिसंवातील चर्चांमधून सार्वजनिक सेवा आणि शहरी नियोजनात परिवर्तन घडवून आणण्याच्या बाबतीत कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मेटाव्हर्सची क्षमता अधोरेखित केली गेली. त्याचवेळी  आंतरराष्ट्रीय दूरसंवाद महासंघाने (International Telecommunication Union - ITU)  आभासी जगाशी संबंधित जागतिक उपक्रमांचे सक्षमीकरण करण्याची आवाहनवजा गरजही या परिसंवादात व्यक्त केली गेली.
  6. शाश्वत विकासाच्या ध्येय उद्दिष्टांना गती देणे : संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास ध्येय उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी आंतरराष्ट्रीय मानकांची भूमिका किती महत्त्वाची असणार आहे, ही बाबही या परिसंवादात ठळकपणे अधोरेखित केली गेली, आणि त्या अनुषंगाने झालेल्या चर्चांमधून शाश्वत डिजिटल परिवर्तनाचा मार्गही प्रशस्त केला गेला.
  7. उच्च स्तरीय संवाद: या परिसंवादाच्या निमित्ताने उद्योग क्षेत्रातली दिग्गज व्यक्तिमत्वे आणि मंत्र्यांमधील एक अभूतपूर्व उच्च स्तरीय संवाद पाहायला मिळाला आणि त्यातून विविध क्षेत्रांमधील परस्पर सहकार्य वाढवण्यालाही चालना मिळाली. या नवोन्मेष आणि डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या भविष्यावर भर दिला गेला.
  8. कृत्रिम बुद्धिमत्ता विषयक प्रशासनाची / गव्हर्नन्सची स्थापना: या परिसंवादात झालेल्या चर्चांमधून कृत्रिम बुद्धिमत्ता विषयक प्रशासनासाठी सशक्त आंतरराष्ट्रीय मानके आखली जाण्याची गरज ठळकपणे व्यक्त गेली गेली. कल्याणासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि कौशल्य विषयक आघाडीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता या आणि अशा प्रकारच्या उपक्रमांना प्रोत्साहित करण्याची गरजही यानिमित्ताने व्यक्त केली गेली.
  9. ओपन सोर्स सॉफ्टवेअरचे सक्षमीकरण: परिसंवादामध्ये नवोन्मेषाला चालना देण्यात ओपन सोर्स सॉफ्टवेअरच्या भूमिकेचे महत्त्व मान्य करण्यात आले तसेच अधिक समावेशक तंत्रज्ञान परिसंस्था निर्माण करण्यासाठी विकासकांसोबतच्या सहयोगाचा पुरस्कार करण्यात आला. 
  10. स्मार्ट शहरे: आयटीयू, यूएनईसीएफ आणि यूएन हॅबिटॅट यांच्या नेतृत्वातील स्मार्ट शाश्वत शहरांसाठीच्या  'युनायटेड फॉर स्मार्ट सस्टेनेबल सिटीज (U4SSC)' पुढाकारासाठी प्रतिबद्धता मजबूत करत जीएसएस 24 मधून स्मार्ट आणि शाश्वत उपक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शहरांची दखल घेण्यात आली. 

जागतिक मानके परिसंवाद 2024 द्वारे उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या भविष्यासाठी यशस्वीरित्या पाया घातला गेला. तसेच सर्वसमावेशक विकास सुनिश्चित करताना आंतरराष्ट्रीय सहयोग आणि मानकीकरण नवोन्मेषाला कशी चालना देऊ शकतो, याचे प्रात्यक्षिक परिसंवादातून पाहायला मिळाले.   परिसंवादाच्या फलनिष्पत्ती दस्तऐवजातून  जागतिक दूरसंवाद मानकीकरण सभेच्या चर्चेसाठी पाया रचला गेला आहे. ही सभा 15-24 ऑक्टोबर 2024 दरम्यान नवी दिल्ली येथे होत आहे.

 

* * *

JPS/Sonali/Tushar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2065027) Visitor Counter : 42