गृह मंत्रालय
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज नवी दिल्ली येथे पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री च्या 119 व्या वार्षिक सत्राला प्रमुख पाहुणे म्हणून केले संबोधित
Posted On:
10 OCT 2024 8:04PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 ऑक्टोबर 2024
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह आज नवी दिल्ली येथे पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या 119 व्या वार्षिक सत्राला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले आणि या कार्यक्रमाला संबोधित केले. ‘विकसित भारत @ 2047: प्रगतीच्या शिखराकडे आगेकूच’, ही यंदाच्या वार्षिक सत्राची संकल्पना होती. सुमारे 1500 व्यावसायिक, सनदी लेखापाल, बँकर्स, वकिल इत्यादी उद्योग क्षेत्रातील सदस्य या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
प्रसिद्ध उद्योगपती दिवंगत रतन टाटा यांना श्रद्धांजली अर्पण करून केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी भाषणाला सुरुवात केली. रतन टाटा यांचे काल रात्री मुंबईत निधन झाले.

केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की, हे वर्ष भारतीय उद्योगांसाठी निर्णायक ठरणार असून, याच वेळी पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे 119 वे वार्षिक सत्र आयोजित केले जात आहे. ते म्हणाले की, आज जगभरातील देश ‘विश्वासा’च्या संकटाला तोंड देत आहेत. या पार्श्वभूमीवर, नरेंद्र मोदी हे आधी मुख्यमंत्री आणि नंतर देशाचे पंतप्रधान म्हणून गेली 23 वर्षे सातत्याने लोकशाही मार्गाने जनतेचा विश्वास जिंकत आहेत. केंद्रीय मंत्री अमीत शाह म्हणाले की, स्थैर्याशिवाय धोरणांची प्रभावीपणे अंमलबजावणी होऊ शकत नाही आणि सुरक्षा आणि विकासाची हमी देता येत नाही.
केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की, पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री हा उद्योग आणि सरकार यांच्यातील सेतू आहे. आगामी काळात पीएचडी चेंबरने शासनाची धोरणे, योजना व दृष्टीकोन राबवायला हवा, आणि उद्योग क्षेत्राचे प्रश्न शासनापर्यंत पोहोचवायला हवेत, असे ते म्हणाले.

केंद्रीय मंत्री अमित शाह म्हणाले की भारतीय उद्योगांनी आता त्यांचा आकार आणि व्याप्ती दोन्ही मध्ये बदल घडवण्यासाठी काम करायला हवे. कंपन्यांनी जागतिक स्तरावर प्रवेश करून जगभरात भारताचे वर्चस्व प्रस्थापित करायला हवे, यासाठी आपले चेंबर्स आणि उद्योगांनी निर्णायक हालचाली करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
* * *
S.Kane/R.Agashe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2063964)