आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिन आणि टेली मानस उपक्रमाची दुसरी वर्षपूर्ती साजरी

Posted On: 10 OCT 2024 5:51PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 10 ऑक्‍टोबर 2024

 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज जागतिक मानसिक आरोग्य दिनी, राष्ट्रीय टेली मानसिक आरोग्य कार्यक्रम, राज्यांमध्ये टेली मानसिक आरोग्यविषयक सहाय्य आणि  नेटवर्किंग (टेली मानस) उपक्रमाची दुसरी वर्षपूर्ती साजरी केली. “कार्यस्थळी मानसिक आरोग्याला प्राधान्य देण्याची हीच योग्य वेळ आहे” ही यावर्षीच्या जागतिक मानसिक आरोग्य दिनाची संकल्पना आहे.

  

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब  कल्याण मंत्रालयातील अतिरिक्त सचिव आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या व्यवस्थापकीय संचालक आराधना पटनाईक यांनी जागतिक आरोग्य संघटनेचे भारतातील प्रतिनिधी डॉ.रॉडरिको एच.ऑफ्रीन आणि मंत्रालयातील इतर ज्येष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत टेली मानस अॅप आणि टेली मानस व्हिडिओ कॉल सुविधेची सुरुवात केली.

टेली मानस अॅप हा सर्वसमावेशक मोबाईल मंच असून मानसिक आरोग्याशी संबंधित समस्यांच्या संदर्भात मदत करण्यासाठी हे अॅप विकसित करण्यात आले आहे. या अॅपमध्ये स्वतःची काळजी घेण्यासंदर्भात सूचना, मानसिक त्रास होत असल्याची लक्षणे ओळखणे, अगदी सुरुवातीला दिसणाऱ्या ताणाच्या लक्षणांचे व्यवस्थापन, चिंता आणि भावनिक संघर्षासह इतर अनेक समस्यांबाबत माहिती उपलब्ध आहे. हे अॅप वापरकर्त्याला भारतभरात कुठेही प्रशिक्षित मानसिक आरोग्य व्यावसायिकांशी संपर्क साधण्यात मोफत मदत करेल आणि त्याला/तिला अहोरात्र केव्हाही गरज भासेल तेव्हा तातडीने समुपदेशन उपलब्ध करून देईल.

टेली मानस मधील व्हिडिओ कन्सल्टेशन म्हणजेच दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून समुपदेशनाची  सेवा उपलब्ध करून देणे हे सध्या अस्तित्वात असलेल्या ऑडीओ कॉलिंग सुविधेचे अद्ययावत स्वरूप आहे. ऑडीओ कॉलिंगची सुविधा वापरणाऱ्या व्यक्तीच्या पूर्वायुष्याचा इतिहास जाणून घेण्यासाठी किंवा काही बाबतीत स्पष्टीकरण घेऊन अधिक माहिती मिळवण्यासाठी ऑडीओ कॉलिंगचा विस्तार म्हणून मानसिक आरोग्य व्यावसायिक व्हिडिओ कन्सल्टेशन सुविधेचा वापर करू शकतील.

उद्घाटनपर भाषणात अतिरिक्त सचिव आराधना पटनाईक म्हणाल्या की, “मानसिक आरोग्य हा आरोग्याचा मुलभूत घटक असून व्यक्ती, कुटुंबे आणि समुदायांना त्यांच्या सर्वोच्च क्षमतेसह कार्य करण्यात, उत्पादकतेसह आपापले काम करण्यात आणि समाजाप्रती योगदान देण्यात सक्षम बनवण्यामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतो. कामाच्या ठिकाणचे रोगट वातावरण आणि इतर प्रतिकूल कार्य स्थितींचा व्यक्तीच्या एकंदर आरोग्यावर, स्वास्थ्यावर, मानसिक आरोग्यावर आणि कामाच्या ठिकाणचा सहभाग किंवा उत्पादकतेवर प्रभाव पडत असतो. कार्यस्थळी अधिक उत्पादक परिणाम साधण्यासाठी कामाच्या ठिकाणचे चांगले वातावरण तसेच काम आणि व्यक्तिगत आयुष्य यांच्यात उत्तम समतोल साधण्याची गरज आहे.”

“टेली मानस उपक्रमाने महत्त्वाचा टप्पा गाठला असून या उपक्रमाला सुरुवात झाल्यापासून साडेचौदा लाख कॉल्स आले असून त्यांना सेवा पुरवण्यात आली आहे” अशी माहिती त्यांनी दिली.

टेली मानस उपक्रमातून सरकारची देशाचे मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील याकडे लक्ष देण्याप्रती वचनबद्धता दिसून येते. टेली मानसचे 14416 or 1-800-891-4416  हे टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक एकूण 20 भाषांमधून बहुभाषिक सहाय्य  पुरवतात आणि कॉलर्स आणि मानसिक आरोग्य व्यावसायिक यांच्यात सुलभ संपर्क शक्य करून देतात.

 

* * *

S.Kane/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2063897) Visitor Counter : 24