राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रपतींच्या हस्ते 70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे वितरण


ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्काराने केले सन्मानित

समाजात बदल घडवून आणण्यासाठी चित्रपट आणि समाज माध्यमे ही सर्वात ताकदवान माध्यमे आहेत : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Posted On: 08 OCT 2024 9:53PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 8 ऑक्टोबर 2024


राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे आज, 08 ऑक्टोबर 2024 रोजी 70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या अंतर्गत विविध विभागांतील पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.राष्ट्रपतींनी 2022 या वर्षासाठीचा दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना प्रदान केला.

याप्रसंगी बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या की, आपल्या चित्रपटांमधून आपल्या समाजाच्या कलात्मक जाणिवेचे दर्शन घडते. आता जीवन बदलत आहे.कलांचे मापदंड देखील बदलत आहेत.नव्या आकांक्षा उदयाला येत आहेत. नवनवीन समस्या समोर उभ्या ठाकत आहेत. नव्या जाणीवा देखील निर्माण होत आहेत. या सर्व बदलांमध्ये, प्रेम, कनवाळूपणा आणि सेवाभावी वृत्तीची न बदलणारी मूल्ये अजूनही आपले वैयक्तिक आणि सामुहिक जीवन अर्थपूर्ण बनवत आहेत.आज पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेल्या चित्रपटांमध्ये आपण ही सर्व मूल्ये पाहू शकतो. 

भारतीय चित्रपटसृष्टी हा जगातील सर्वात मोठा चित्रपट निर्मिती उद्योग असून आपल्या देशात विविध भाषांतील चित्रपट तयार होत आहेत आणि ते देशाच्या प्रत्येक भागात निर्माण होत आहेत असे त्या म्हणाल्या. चित्रपट हा सर्वाधिक वैविध्यपूर्ण कला प्रकार आहे असे मत व्यक्त करून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्व पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले तसेच चित्रपट उद्योगाशी संबंधित सर्व लोकांचे कौतुक केले.

ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल राष्ट्रपतींनी त्यांचे अभिनंदन केले. चित्रपट क्षेत्रातील सुमारे पन्नास वर्षांच्या कारकिर्दीत मिथुनजींनी केवळ गंभीर पात्रे रंगवली नाहीत तर सामान्य जीवनाबद्दलच्या कथा सांगणाऱ्या अनेक भूमिका त्यांनी त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण उर्जेने यशस्वीपणे साकार केल्या.

राष्ट्रपती यावेळी म्हणाल्या की पारितोषिक विजेत्या चित्रपटांच्या भाषा तसेच पार्श्वभूमी वेगवेगळी असली तरीही ते सर्वच चित्रपट भारताचे प्रतिबिंब सादर करतात. हे चित्रपट म्हणजे भारतीय समाजाला आलेल्या अनुभवांचा अनमोल खजिना आहेत. भारतीय परंपरा आणि त्यातील विविधता या चित्रपटांमध्ये सजीवतेने साकारलेली दिसते असे त्यांनी सांगितले.

राष्ट्रपती म्हणाल्या  की, चित्रपट आणि समाज माध्यमे ही समाजात बदल घडवून आणण्यासाठीची सर्वात ताकदवान माध्यमे आहेत. सामान्य जनतेत जागरूकता निर्माण करण्याच्या बाबतीत इतर कोणत्याही माध्यमापेक्षा चित्रपटांचा पडणारा प्रभाव अधिक आहे. आज वितरीत झालेल्या 85 हून अधिक पुरस्कारांपैकी केवळ 15 पुरस्कार महिलांनी मिळवले आहेत याकडे उपस्थितांचे लक्ष वेधत राष्ट्रपती म्हणाल्या की, महिलांच्या नेतृत्वाखालील विकास घडवण्याच्या दिशेने चित्रपट उद्योग  अधिक प्रयत्न करू शकतो.

आशयघन चित्रपटांना बहुतेकदा प्रेक्षक मिळत नाहीत याकडे राष्ट्रपतींनी निर्देश केला.आशयघन चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जागरूक नागरिक, सामाजिक संस्था आणि सरकारने एकत्रितपणे प्रयत्न केले पाहिजेत असे मत त्यांनी व्यक्त केले.

राष्ट्रपतींच्या  संपूर्ण भाषणासाठी कृपया येथे क्लिक करा-

N.Chitale/S.Chitnis/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 



(Release ID: 2063326) Visitor Counter : 32