आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
राष्ट्रपतींनी अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या 10 व्या पदवीदान समारंभाला केले संबोधित
Posted On:
30 SEP 2024 8:18PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 सप्टेंबर 2024
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज नवी दिल्ली येथे अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या (एबीव्हीआयएमएस) 10 व्या पदवीदान समारंभाला संबोधित केले. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे.पी.नड्डा आणि नीती आयोगातील आरोग्य विभागाचे सदस्य डॉ.व्ही.के.पॉल यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
या समारंभात उपस्थितांना संबोधित करताना, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या, “डॉ.राम मनोहर लोहिया आणि अटल बिहारी वाजपेयी ही दोन सन्माननीय आणि महान व्यक्तिमत्त्वे या रुग्णालयाशी आणि संस्थेशी जोडलेली आहेत. या दोघांनी नेहमीच देशाला सर्वाधिक प्राधान्य दिले. त्यांनी आपला समाज तसेच देशाला नवे आयाम दिले. सदर संस्था आणि रुग्णालय यांच्याशी संबंधित लोकांनी या महान व्यक्तींनी दाखवलेला मार्ग आणि त्यांची पदचिन्हे अनुसरली पाहिजेत.”
डॉक्टर्स आजारी पडलेल्या रुग्णांना रोगमुक्त करतात आणि केवळ तेच जीवन आणि मृत्यू यामधे फरक करू शकतात असे राष्ट्रपती म्हणाल्या. “तुम्ही सर्वांनी एक मोठी जबाबदारी स्वीकारली आहे. आपल्या देशात डॉक्टरांना देवासमान वागणूक मिळते कारण ते लोकांच्या तब्येतीची काळजी घेत असतात. तेव्हा तुम्ही लिहून दिलेल्या औषधांतून रुग्णांना तोच रोगमुक्तीकारक स्पर्श मिळेल याची काळजी घ्या,” असे राष्ट्रपतींनी सांगितले.
डॉक्टर्स आणि वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत इतर कर्मचारी यांच्या विरुध्द होणाऱ्या हिंसाचाराच्या घटनांकडे उपस्थितांचे लक्ष वेधत राष्ट्रपती मुर्मू यांनी कोणत्याही डॉक्टरला त्याच्या रुग्णांना त्रास व्हावा असे वाटत नाही असे ठाम प्रतिपादन केले. कठीण परिस्थतीत रुग्ण आणि त्यांची काळजी घेणाऱ्या व्यक्तींनी संयम बाळगण्याची गरज आहे ही बाब देखील त्यांनी ठळकपणे मांडली.
महिलांच्या आरोग्याच्या मुद्द्याला प्राधान्य देण्याचे आवाहन त्यांनी वैद्यकीय समुदाय आणि संबंधित संस्थांना केले.पंतप्रधान जन आरोग्य योजनेने महिलांना आरोग्यसुविधा विषयक सोयी मिळवून देण्यात मदत केली आहे याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला.
राष्ट्रपतींच्या हस्ते यावेळी 36 सुपर स्पेश्यालिटी विद्यार्थ्यांसह एबीव्हीआयएमएस मधील अनेक विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान करण्यात आल्या.
याप्रसंगी बोलताना, केंद्रीय मंत्री जे.पी.नड्डा यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.वैद्यकीय शिक्षणाची गुणवत्ता उत्तम राखण्याला सरकारने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे यावर त्यांनी अधिक भर दिला. “येथे उपस्थित विद्यार्थी आणि विद्वान मान्यवर हे अधिक उत्तम भविष्य उभारणीच्या कार्यातील आमचे मानवी साधन संपत्तीरुपी भांडवल आहेत.” असे ते म्हणाले.
* * *
S.Kane/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2060434)
Visitor Counter : 40