उपराष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

पंडित दीनदयाल उपाध्याय यांचे तत्त्वज्ञान आणि विचारांचे कालातीत महत्त्व उपराष्ट्रपतींनी केले अधोरेखित

Posted On: 25 SEP 2024 8:52PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 25 सप्‍टेंबर 2024

 

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज पंडित दीनदयाल उपाध्याय शेखावटी विद्यापीठ, सीकर इथे पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या 108 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. भारताच्या दूरदर्शी नेत्यांपैकी एक असलेल्या या नेत्याचा वारसा पुढे चालवण्याप्रती वचनबद्धता दर्शवत या प्रसंगी “पंडित दीनदयाल उपाध्याय समिती उद्याना”चे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी आपल्या भाषणात उपराष्ट्रपती धनखड यांनी पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या तत्त्वज्ञानाचे समकालीन महत्त्व अधोरेखित करताना सांगितले, “मला इथे अत्यंत प्रसन्न वाटत आहे. मला इथे येण्याचे आमंत्रण मिळाले तेव्हा साहजिकच माझ्या मनात फक्त त्या महान माणसाचे नाव होते, या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाचा साक्षीदार म्हणून मी जे पाहतो आहे त्याची कल्पनाही मी केली नव्हती.”

पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या तत्त्वज्ञानाबाबतच्या आपल्या विचारांना उजाळा देताना उपराष्ट्रपतींनी त्यांच्या शिकवणीमुळे प्रभावित झाल्याबद्दल कृतज्ञतेची भावना व्यक्त केली. ते म्हणाले, “त्यांची तत्त्वे आणि विचार खोलवर प्रभावित करणारे आहेत. पंडितजीं बद्दल आपण अधिकाधिक जाणून घ्यायला हवे आणि त्यांचे तत्त्वज्ञान आपल्या जीवनात आचरणात आणण्याचे प्रयत्न करायला हवेत.”

उपाध्याय यांच्या परिवर्तनशील प्रभावशाली शिकवणीवर भर देत उपराष्ट्रपतींनी सांगितले, “त्यांचे लक्ष्य वैयक्तिक  विकास, समाजाचा एकात्मिक भाग बनण्यासाठी व्यक्तींना सक्षम करणे होते.” समाजातील शेवटच्या व्यक्तीच्या गरजांची दखल घेण्याचे महत्त्व अधोरेखित करून ते पुढे म्हणाले की अंत्योदयाच्या संकल्पनेचे उद्दीष्ट सर्वाधिक वंचित व्यक्तींच्या उत्थानाचे आहे.

उपराष्ट्रपतींनी युवकांना  पारंपरिक चौकटीबाहेरील संधी स्वीकारण्यास प्रोत्साहन दिले. ते म्हणाले, “अपयशाची भीती कधीही बाळगू नका; ते कोणत्याही प्रयासाचा नैसर्गिक भाग आहे. तुमच्या संधींची उपलब्धता विस्तारत आहे.”

“आज भारताकडे गुंतवणूक आणि संधीचे पसंतीचे गंतव्यस्थान म्हणून पाहिले जात आहे ते केवळ सरकारी नोकऱ्यांमुळे नव्हे; तर संधींची  क्षितीजे विस्तारत असल्यामुळे देखील  आहे,” असे त्यांनी सांगितले.

 

* * *

S.Kane/R.Bedekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2058833) Visitor Counter : 28