उपराष्ट्रपती कार्यालय
भारत ही जगातील सर्वात चैतन्यशील अर्थव्यवस्था म्हणून उदयाला आली असून आगामी दशकांमध्ये 8% दराने देशाचा विकास होण्याची अपेक्षा : उपराष्ट्रपतींचे प्रतिपादन
Posted On:
25 SEP 2024 6:18PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 सप्टेंबर 2024
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज सांगितले की भारत ही आता जगातील सर्वात चैतन्यशील अर्थव्यवस्था बनली असून जागतिक गुंतवणुकीसाठीचे पसंतीचे स्थान झाली आहे. ग्रेटर नोईडा परिसरात उत्तर प्रदेश आंतरराष्ट्रीय व्यापार प्रदर्शन 2024 च्या दुसऱ्या आवृत्तीत आज उद्घाटनपर भाषण करताना उपराष्ट्रपती म्हणाले, “आज भारत ही 4 ट्रिलीयन डॉलर्सची अर्थव्यवस्था होऊ घातली असून आगामी दशकांमध्ये 8% दराने देशाचा विकास होण्याची क्षमता आहे. भारत हा आता जगाच्या दृष्टीने मोठ्या घडामोडींनी भरलेला देश असून उत्तर प्रदेश हे राज्य तर विविध उपक्रमांनी युक्त आहे.”
भारतातील पायाभूत क्षेत्रात झालेल्या लक्षणीय प्रगतीवर भर देत उपराष्ट्रपती धनखड म्हणाले, “आपला देश आता मेट्रो रेल्वेच्या जाळ्याच्या बाबतीत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि देशात विमानतळ असलेल्या शहरांची संख्या 70 वरुन आता 140 वर पोहोचली आहे. सुमारे 800 दशलक्ष ब्रॉडबॅंड वापरकर्ते असलेला भारत आता जागतिक पातळीवर सर्वात मोठा कनेक्टेड देश झाला आहे.”
“डिजिटल आर्थिक व्यवहारांच्या बाबतीत, भारताने दरमहा 13 अब्ज व्यवहारांसह जगातील उच्चांक गाठला आहे. त्याशिवाय, आपण जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी स्टार्ट अप परिसंस्था बनलो असून, आपल्या देशात 117 युनिकॉर्न उद्योग कार्यरत आहेत तसेच भारत जगातील तिसरा सर्वाधिक क्रयशक्ती असलेला देश झाला आहे,” असे त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना उपराष्ट्रपती धनखड यांनी सेमिकंडक्टर उद्योगांचे महत्त्व देखील अधोरेखित केले. ते म्हणाले, “आपल्या विकासासाठी महत्त्वाचा असलेला हा उद्योग वर्ष 2026 पर्यंत 55 अब्ज डॉलर्सच्याही पुढे पोहोचेल अशी अपेक्षा आहे. हे शतक भारताचे शतक आहे याबाबत मला यत्किंचितही शंका नाही.”
यासोबतच, भारताने ‘मेक इन इंडिया’ उपक्रमापासून “संकल्पना, संरचना आणि मेक इन इंडिया” पर्यंत जी उल्लेखनीय झेप घेतली आहे त्यावर देखील उपराष्ट्रपतींनी अधिक भर दिला.
या व्यापार प्रदर्शनामध्ये व्हिएतनामला भागीदार देशाचे स्थान देण्याचे महत्त्व देखील त्यांनी ठळकपणे मांडले. एक नैसर्गिक भागीदारी असे या भागीदारीचे वर्णन करत उपराष्ट्रपती धनखड म्हणाले की ही भागीदारी दोन्ही देशांच्या दरम्यान सांस्कृतिक आणि आर्थिक देवाणघेवाणीला प्रोत्साहन देईल आणि जगाच्या दक्षिणेकडील देशांना आंतरराष्ट्रीय घडामोडींमध्ये अधिक सशक्त भूमिका निभावण्याच्या निर्धाराला बळकटी देईल.
* * *
S.Kane/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2058719)
Visitor Counter : 51